श्रीफळाचा वाद अनाठायी; बैठकीतील सूचनेवर मान्यवरांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया
प्रवर देशपांडे (नाशिक): साहित्य संमेलन हे त्यातून प्रकट होणार्या विचारांपेक्षा त्यांच्या आयोजनात होणार्या वादंगांमुळे अधिक प्रसिद्ध होते असते. नाशिक येथे आयोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याला अपवाद ठरावे, अशी सर्वच नाशिककरांची मनीषा आहे. मात्र, नाशिक येथे ‘लोकहितवादी मंडळा’तर्फे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वागत आणि सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत लेखक दत्ता पाटील यांनी “प्रत्येक साहित्य संमेलनात प्रतीकांची पूजा करण्याची परंपरा पाळली जाताना दिसते. पूजन, श्रीफळ वाढवणे नेहमीच होत असते. मात्र, यावेळच्या नाशिक येथील संमेलनात विज्ञानवादी साहित्यिक जयंत नारळीकर हे संमेलनाध्यक्ष आहेत. त्यामुळे कर्मकांडे न करता थेट विचारांची देवाणघेवाण करणारे व पुरोगामित्वाकडे नेणारे हे संमेलन ठरावे, अशी सूचना मांडली. यामुळे नाशिक नगरीत या विरोधात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
श्रीफळ वाढविणे हेदेखील एक प्रतीकच !
"यावेळी संमेलनास विज्ञानवादी लेखक हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. २००५ मध्ये नाशिक येथे आयोजित संमेलनकार्याची सुरुवात ही बोकड बळी झाली होती. त्यामुळे मुक्या प्राण्यांचा बळी देणारे अघोरी कृत्य करू नये, अशी सूचना मी केली. श्रीफळ वाढविणे हेदेखील एक प्रतीकच आहे. मात्र, मंगलकार्याची गोड सुरुवात म्हणून ते श्रीफळ व खडीसाखर तेथे वाटल्यास उत्तम होईल. तसेच, श्रीफळ वाढविणे मागील वैज्ञानिक कारण हे संमेलनाच्या आयोजकांनी सांगावे, ही अपेक्षा आहे. अज्ञान दूर करणारी व ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारी संमेलन ज्योत प्रज्वलित करणे जास्त संयुक्तिक आहे."
- दत्ता पाटील, लेखक
अजून कोणताही निर्णयच झालेला नाही
"बैठकीत अनेक सूचना आमच्या समोर आल्या. तशीच श्रीफळ न वाढविण्याबाबत आलेली ती एक इतर सूचनासारखीच सूचना आहे. आम्ही त्या बैठकीतील प्राप्त सूचनांवर विचार करण्यासाठी अजून बैठकीचे आयोजन केलेले नाही. त्यामुळे अजून कोणताही निर्णयच झालेला नाही. ती पाटील यांची व्यक्तिगत सूचना होती. मात्र, बोकड बळी दिला जाणार नाही. हे आमचे धोरण आजही कायम आहे."
- जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ.
विरोध आणि विद्रोह यात फरक
“विरोध आणि विद्रोह यात फरक आहे. विरोधात कायमच ‘सत्यम शिवम सुंदरम’ असते. मात्र विद्रोहात विवेकी विचारांना तिलांजली दिली जाते. एका विशिष्ट विचारसरणीला धरून करण्यात आलेला हा विरोध आहे. कर्मकांड व अध्यात्म यावर संत तुकाराम यांनी भाष्य करताना अनिष्ट चालीरिती यावर टीका केली आहे. मात्र, मंगलप्रसंगी श्रीफळ वाढवू नये, असे संत तुकाराम यांनी कधीही म्हटले नाही. सर्वधर्म समभाव हा हिंदुत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. साहित्य संमेलनात दीप्रज्वलन करणे, पूजन करणे यात चुकीचे काही नाही. यामुळे कोणताही गदारोळ माजणार नाही. साहित्य संमेलन हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून यामुळे लोकांच्या अम्नात मांगल्य आणि पावित्र्याची ज्योत प्रज्वलित होत असते. त्यामुळे श्रीफळ वाढविण्यावर हरकत घेण्याची काही एक गरज नाही. हा वाद अनाठायी असल्याचे पाटील म्हणाले."
- प्रा. डॉ. यशवंत पाटील, लेखक व संत साहित्याचे अभ्यासक.
प्रथा व परंपरांना अध्यक्षांच्या विचारांशी जोडणे हे चुकीचे
"याबाबत बोलताना प्रकोष्ठ की, “महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी अशी नाशिकची ओळख आहे. या पुण्यभूमीत यंदाचे साहित्य संमेलन साजरे होत आहे. हिंदू संस्कृतीत प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात ही श्रीफळ वाढवून होत असते. ही परंपरा आजवरच्या साहित्य संमेलनातदेखील जोपासण्यात आली आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष कोणत्या विचारसरणीचे आहेत, याचा परंपरेशी संबंध जोडणे हे गैर आहे. संमेलनाध्यक्ष, त्यांचे विचार त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करतील. मात्र, प्रथा व परंपरांना अध्यक्षांच्या विचारांशी जोडणे, हे चुकीचे आहे. सदरची सूचना ही खोडसाळपणाची असून यातून उगीचच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ”
- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र.
लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रकार
"नाशिक येथे होणारे साहित्य संमलेन हे सर्वच नागरिकांसाठी आनंददायी आहे. या आनंदाच्या वेळी संमेलनाच्या उच्च परंपरेची उंची अधिकाधिक वाढावी व ती ऐतिहासिक ठरावी, अशी अपेक्षा आहे. तसेच, अनावश्यक वादंग हे टाळले जावे, अशी प्रत्येक नाशिककरांची इच्छा आहे. संमेलन कसे असावे, याबाबत जरूर सूचना करण्यात याव्यात. सरस्वतीच्या उत्सवात अंधश्रद्धा नकोच. मात्र, श्रद्धा व अंधश्रद्धा यात गल्लत करून कर्मकांड नको, श्रीफळ वाढविणे नको अशा सूचना या वैयक्तिक विचारांचा भाग होऊ शकतात. मात्र, त्या सार्वजनिक उत्सवसंबंधी आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणे म्हणजे केवळ लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रकार आहे. साहित्य संमेलनात स्वकेंद्री विषय कदापि नसावेत."
- अॅड. भानुदास शौचे, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक.