चीनचा डोळा अण्वस्त्रांवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2021   
Total Views |

China_1  H x W:
दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका आणि रशिया या दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले. दोन्ही महासत्तांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आणि ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज शस्त्रास्त्रांपासून ते अंतराळापर्यंत पोहोचली. या सगळ्याच वर्चस्ववादाच्या लढाईला ‘शीतयुद्ध’ म्हणतात आणि याचवेळी अमेरिका व रशियाने आपल्याकडील अण्वस्त्रांतही मोठी वाढ केली होती. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे युद्धाला तोंड फुटल्यास समोरच्याला संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याएवढी शक्ती बाळगणे, हाच यामागचा त्यांचा उद्देश होता. पण, नंतरच्या काळात रशियाने उभे केलेले सोव्हिएत संघराज्य कोसळले आणि जागतिक महासत्तापदी केवळ अमेरिकाच उरली. अर्थात, तसे झाले तरी रशियाची लष्करी ताकद कमी झालेली नव्हती. अमेरिका आणि रशिया दोघांकडेही अण्वस्त्रांचा प्रचंड साठा जसाच्या तसाच होता. नंतरच्या काळात अण्वस्त्रांचा धोका लक्षात आल्याने या दोन्ही देशांनी आपल्याकडील शस्त्रे कमी करण्यावर विचार करायला हवा, या दिशेने काही पावलेही उचलली. अर्थात, कोणत्याही देशाने शस्त्रसाठा कमी करायचा म्हणजे स्वतःची लष्करी क्षमता किमान पातळीवर आणायची आणि असे करताना संबंधित देशांत विश्वास असेल तर ठीक; अन्यथा केवळ करार-मदार व्हायचे. पण, प्रत्यक्षात निराळेच काही असायचे. तरीही अशा सर्व वातावरणात अमेरिका आणि रशियाने तशी पावले उचलली व ती प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.
 
 
नुकतीच अमेरिका आणि रशियादरम्यान नवा शस्त्रसाठा घटवण्यासंबंधीचा करार-‘न्यू स्टार्ट’ करण्यात आला. पण, यामुळे तिसऱ्याच देशाला म्हणजे चीनला तीव्र आनंद झाल्याचे दिसून आले. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, करारात सामील नसताना चीनचा या करारामुळे नेमका काय फायदा होऊ शकतो? चीनच्या प्रसन्नतेमागचे गुपित नेमके काय? त्याआधी ‘न्यू स्टार्ट’ म्हणजे काय हे जाणून घेऊ. सदर करारानुसार २०२६ पर्यंत आपल्या अण्वस्त्रांच्या विस्तारासह स्पर्धेवरही लगाम कसण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. या करारातून चीन संपूर्णपणे बाहेर आहे. या करारामुळे चीनच्या लष्करी वा आण्विक क्षमतेच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही. पण, चीनला असे वाटते की, येत्या पाच वर्षांत आपण आपल्या लष्करी क्षमतांचा विस्तार करू. तथापि, चीनने अजूनही आपल्याकडे किती अण्वस्त्रे आहेत याचा खुलासा केलेला नाही. पण, ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अंदाजानुसार त्यांची संख्या ३२० इतकी असावी. अशा परिस्थितीत अमेरिकेला पछाडून महासत्तापदाची स्वप्ने पाहणाऱ्या चीनने आपल्या मनसुब्यांवर वेगाने काम सुरू केले आहे. चिनी लष्कराच्या निकटच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळात अण्वस्त्रांमध्ये एक हजारपर्यंत वाढ झाली आहे. पण, त्यापैकी १०० वापरण्यायोग्य स्थितीत आहेत.
 
 
दरम्यान, चीन लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचीही निर्मिती करत असून, त्याच्या टप्प्यात अमेरिकेचा बहुतांश भाग येईल. अमेरिका व रशियातील कराराने चीनच्या या लक्ष्यमार्गाला अधिकच सुलभ केल्याचे इथे दिसते. हाँगकाँगचे एक लष्करी विशेषज्ज्ञ आणि चिनी लष्करात काम केलेल्या झोंगपिंग यांच्या मते, चीनकडे सध्या फक्त १०० सक्रिय अण्वस्त्रे आहेत. पण, ती अमेरिकेला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी नाहीत. चीनने २०१८ साली खुलासा केला होता की, आपल्याकडील ‘सीजे-२०’ क्रूझ क्षेपणास्त्रे अण्वस्त्रहल्ला करण्यास सक्षम आहेत, त्याचा पल्ला २० हजार किमी इतका आहे. आता तर अमेरिका आणि रशियातील करारानंतर चीनला आपल्याकडील अण्वस्त्रांचा साठा वाढविण्याची संधीच मिळाली आहे. १९८०च्या दशकात अमेरिका आणि सोव्हिएत संघाकडे प्रत्येकी दहा हजार अण्वस्त्रे होती. नंतर दोन्ही देशांत अण्वस्त्रसंख्या घटवण्यावर एकमत झाले. १९९१ साली दोन्ही देशांत ‘स्टार्ट-१’ आणि २००२ साली ‘स्ट्रॅटेजिक रिडक्शन’ करार झाला व त्यानुसार अमेरिकेने आपला शस्त्रसाठा एक हजार ७०० व रशियाने दोन हजार २०० केला. २००९ साली ‘स्टार्ट-१’ करार संपला व त्यानंतर ‘न्यू स्टार्ट’ नावाने आणखी एक करार झाला. त्यानुसार पाच हजार ते ६,५०० पर्यंत अण्वस्त्रे हटवण्याचे निश्चित झाले.
 
सदर करारानुसार दोन्ही देशांनी स्वतःवर एक हजार ६०० सामरिक वितरण वाहने आणि सहा हजार लष्करी शस्त्रांची मर्यादा घातली. पण, दोन्ही देश एकमेकांकडील शस्त्रसाठ्याची संख्या कमी करत असतानाच चीन दबा धरून बसलेला होता व आहे आणि तो आता आपली शस्त्रे वाढवत आहे, हे विचार करण्याजोगे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@