संमेलन नगरीस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी
नाशिक: नाशिक ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्यासंदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरीस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केली होती. मात्र, नाव देण्याबाबतची संपूर्ण भूमिका निवेदनात विशद करण्यात आलेली असतानाही संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळले. त्यामुळे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्यावतीने भगूरमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
मात्र, यामध्येदेखील काहीजण बुद्धिभेद करून कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध असल्याचे भासवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने म्हटले आहे की, वस्तुतः सावरकर, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, गोविंदाग्रज, रामदास स्वामी या सर्वांचेच कार्य हे असामान्यच आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो, त्यांच्या नावाला विरोध केला जातो, या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. म्हणून हा निषेध नोंदविण्यात आलेला आहे.
दि. १ फेब्रुवारी, १९६६ मध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपले कार्य समाप्त झाले म्हणून ‘प्रायोपवेशन’ सुरू केले होते. त्यांच्या जन्मभूमी भगूर येथे साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, मृत्युंजय कापसे, प्रमोद आंबेकर, निलेश हासे, भूपेश जोशी, श्याम देशमुख, गणेश राठोड, रामदास गाढवे, प्रवीण वाघ, सुनील जोरे, रतन वाघचौरे, शांताराम करंजकर, मधुकर कापसे, चेतन आंबेकर, रमेश नाईकवाडे, चेतन आंबेकर आदी उपस्थित होते.