मुंबई : पूजा चव्हाण मृत्यु प्रकरण वनमंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्र्याला पायउतार व्हावे लागले. या प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. पूजाच्या मृत्यूनंतर इतक्या दिवसांनी राठोड यांचा राजीनामा घेतल्यावर त्यांना अटक कधी करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.
महाविकास आघाडीचे वनमंत्री राठोड रविवारी मंत्रीपदावरून पायउतार झाले. पूजा चव्हाण सोबतच्या कथित १३ ऑडिओ क्लिप्स आणि लॅपटॉपमधील व्हायरल छायाचित्रांच्या आधारे राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. सातत्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. एकटी वाघीण वनमंत्र्याविरोधात लढल्याची उपमा भाजपकडून देण्यात आली होती. जनतेच्या आक्रोशानंतर राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
भाजप महिला आघाडीने राठोडांनी राजीनामा न दिल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलाविली होती. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली. आपला राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी राठोड यांनी शक्तीप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल इशारा दिला होता.
नेमके प्रकरण काय होते ?
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा सोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची ऑडिओ क्लिपसह चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपने संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा मागून घेतला.
अटक करा !
पूजा चव्हाण प्रकरणात एफआयआर दाखल झालेली नाही. राठोड यांच्या चौकशीसाठी अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र, राठोड यांना इतके दिवस पाठबळ देणारे सरकार कारवाई करून दाखवणार का हा देखील प्रश्न आहे.