मूठभर आंदोलकांना हाताशी धरुन खलिस्तानी कारवाया सुरू ठेवायच्या आणि मग कुणी आवाज उठवला की त्याला शेतकरी आंदोलकांची ढाल करून स्वतः नामनिराळे राहायचे, ही काँग्रेसी नेत्याच्या सुपीक डोक्यातून आलेली नापाक क्लृप्ती आता फार काळ टिकणारी नाही.
कृषी आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवणे, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अवमान करणार्या स्वतःला कथित डाव्या; परंतु विद्रोही विघातकी विचारधारेचे पाईक म्हणवणार्यांनी, आता लाज-शरमेच्या सर्व मर्यादा सोडल्या आहेत. मोदी सरकारला ‘हिटलरशाही’ आणि ‘फॅसिस्ट’ म्हणणार्या काँग्रेसी नेत्यांनी, त्यांच्या नेत्यांनी ‘इंडियन ओवरसिस काँग्रेस’ या गोड नावाखाली चालवलेला नापाक खेळ भाजप प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी उघड केला आहे. कृषी कायद्यांना विरोध करण्याच्या नादात काँग्रेसी कार्यकर्त्यांना गहिवरून येऊ लागले. त्यांच्या मनातील भावनांची वाट मोकळी होऊ लागली, अखेर देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू झाले. इतके करूनही त्यांच्या काळजाला थंडावा मिळाला नाही म्हणून की काय, त्यांनी थेट पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकावला. तोही मागे तिरंगा असतानाच?
अर्थात, पाकी विचारांचे प्रेम उफाळून येण्याचे हे काही नवे उदाहरण नाही. परंतु, देशाच्या ऐक्याचा, सार्वभौमत्वाचा विचार नावापुरता उरलेला विरोधी पक्ष करतो याचे उत्तम उदाहरण जगाला दिसून आले. अर्थात, या संतापजनक प्रकारानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, तो मी नव्हेच, अशी सारवासारव करत तसा कुठलाही कार्यक्रम आम्ही घेतलाच नाही, अशी प्रतिक्रिया ‘आयओसी’ने दिली. त्याचे झाले असे की, मोदीविरोधी वक्तव्य केल्याविना बातम्या होत नाहीत किंवा कुणी दखल घेत नाही. मोदीविरोध आता कुणी करत नाही?, सगळ्या विरोधकांचा तोच अजेंडा; पण या शर्यतीत पुढे कसे यायचे बरे, हा प्रश्न या जर्मनीत बर्लिनमध्ये आंदोलनकर्त्यांना पडला असेल. मग पाकिस्तानचाच झेंडा का नको, अशी सुपीक कल्पना त्यांना सुचली असावी आणि त्यांनी तसे केलेही.
पाकिस्तानचा झेंडा फडकावला, तोही तिरंगा मागील बाजूस असताना. हा झेंडा फडकवणारा अन्य कुणीही नव्हे, तर काँग्रेस पदाधिकारीच होता. एका युवक काँग्रेसच्या पदाधिकार्याचे नाव चरण कुमार आहे, दुसरा कार्यालय पदाधिकारी राज शर्मा याच्या हातात पाकिस्तानी झेंडा. ‘इंडियन ओवरसिस काँग्रेस’, जर्मनी अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी दिलेले स्पष्टीकरणही त्यापासून पळ काढणारे होते. हा दावाच त्यांनी फेटाळून लावला. “आम्ही असा कुठलाही कार्यक्रमच आयोजित केला नाही,” असा खुलासा काँग्रेस नेत्याने केला. मात्र, सुरेश यांनी त्यांच्या त्यांचे सर्व नापाक मनसुबे उघड केल्याने त्यांच्या जळफळाट झाला. काँग्रेसचे नेते चरण कुमार, राज शर्मा याचे राहुल गांधींसोबतचे फोटोही व्हायरल झाले. पाकिस्तानचा झेंडा फडकावणारेही हेच चेहरे आहेत.
त्यांच्याबद्दल मात्र, काँग्रेसने ‘ब्र’ काढला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशात दबाव निर्माण करायचा, अराजकता निर्माण करायची, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, सरकारला कुचकामी ठरवायचे, ही खेळी खेळताना काँग्रेस स्वतः तोंडघशी पडली ते बरे झाले. त्यांचा हा मूर्खपणा त्यांनी स्वतःच सिद्ध केला ; अन्यथा या कथित कृषी आंदोलकांना कुणी ‘खलिस्तानी’ म्हणाले असते, तर थेट शेतकर्यांच्या आसवांची ढाल करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत, असले सौदागर नापाक विचारांचे आहेत, ते ग्रेटा थनबर्ग प्रमाणे स्वतःच सिद्ध केले ते बरे केले. याच जर्मन काँग्रेसतर्फे शेतकरी आंदोलनाची धग कायम राहावी, सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू राहावे म्हणून एक कोटींची देणगीही देऊ केली होती.
स्वतःचे सरकार सत्तेत असताना शेतकर्यांच्या खात्यावर एक रुपया न चढवणारे काँग्रेसी आता मात्र कथित शेतकरी नेत्यांना माथी भडकावण्यासाठी रसद पुरवण्याची कामे करताहेत. कृषी कायद्यांना विरोध हा अपेक्षित आहे. लोकशाही देशात आंदोलने, मोर्चे स्वाभाविक आहेत, अशी आंदोलने लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवण्यास मदत करतात. मात्र, हिंसाचार माजवण्यासाठी अशा आंदोलनजीवींनी परकीय शक्तींचा वापर करणे कितपत योग्य? देशाच्या अखंडतेला बाधा येईल, अशा कारवाया करणे कितपत कायदेशीर? पाकिस्तानी दहशतवादी, सैनिक यांच्याशी दोन हात करत हुतात्मा होणार्या सैनिक कुटुंबाचे अश्रूही आंधळ्यांना दिसत नसतील तर ते संतापजनक आहे!