डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन डोंबिवली व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी-सुविधा निर्माण करणार्या प्रभाकर देसाई यांच्याविषयी जाणून घेऊया...
प्रभाकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एका जमीनदार मालवणी कुटुंबातील शेंडेफळ होते. त्यांना चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. लहान वयातही ते बराचसा वेळ आईबरोबर स्वयंपाक घरात घालवित असत. आई पाककृती करीत असताना छोटे प्रभाकर त्या पाककृती बारकाईने बघत. देसाई यांचे बालपण अत्यंत आनंदात चाललेले असताना अचानक आयुष्य बदलून टाकणारी एक घटना घडली. ती म्हणजे त्यांच्या वडिलांचे निधन. वडिलांच्या मागे जमीनजुमला असला तरी प्रभाकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयुष्य आता खडतर होऊन गेले होते. वडिलांच्या व्यावसायिक भागीदारांकडून मिळणारा आधार हळूहळू कमी होत गेला. कुडाळ परिसरातील जमीन फारशी कसदार नसल्याने उत्पादनही मर्यादित होते. प्रभाकर यांच्यावर स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी दुसरा मार्ग शोधण्यावाचून पर्याय नव्हता. परिस्थितीमुळे नशीब आजमविण्यासाठी प्रभाकर कुडाळ सोडून मुंबईला आपल्या काकांकडे आले. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत आलेल्या प्रभाकर यांनी शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला. प्रभाकर यांच्या काकांचे काळबादेवीला दुकान होते. सहा महिने ते त्याठिकाणी राहिले. पण काकांशी मतभेद झाल्याने ते गोरेगाव येथील आपल्या भावांकडे राहण्यासाठी गेले. काही दिवस त्यांनी नोकरी केली. प्रभाकर यांना नोकरी करण्यात कोणतीच रूची नव्हती. दुसर्याची नोकरी करण्यासाठी आपण मुंबई गाठलेली नाही, हे त्यांना मनोमन माहीत होते. स्वत:चा व्यवसाय स्थापन करण्याचा ध्यास त्यांना होता. त्याच्या जोरावर ‘समाधान भोजनालय’ नावाची छोटी खानावळ चालवायची संधी त्यांना मिळाली. प्रभाकर स्वत:च बाजारात जाऊन मासे खरेदी करीत असत, स्वयंपाक करण्यापासून गल्ला सांभाळण्यापर्यंत सर्व कामे ते स्वत:च करत. ते भोजनालय त्यांनी दोन वर्षे चालविले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडेही ते आपोआपच ओढले गेले. मधल्या काळात त्यांनी प्लम्बिंगचे कामही शिकून घेतले होते. प्रभाकर यांना राजकरणात रस होता.
मुंबईत आल्यावर त्यांनी समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतले. कामातून मोकळा वेळ मिळाला की, तो राजकीय सभा, चर्चासत्रांमध्ये भाग घेण्यासाठी ते सत्कारिणी लावत असत.पुढे प्रभाकर डोंबिवलीत प्लम्बर म्हणून काम करू लागले. छोट्या-मोठ्या इमारतींची कामे त्यांना हळूहळू मिळू लागली. माणूस जोडण्याची त्यांच्याकडे कला होतीच. त्यामुळे अनेक मोठ्या बिल्डर्सबरोबर त्यांच्या मैत्रीचे धागेही जुळू लागले. त्याचा परिपाक म्हणजे त्यांचा स्वत:च्या मालकीचा बांधकाम व्यवसाय सुरू झाला. डोंबिवलीत चंद्रकांत पाटील जमीनदार होते. त्यांच्या मालमत्तेची देखभाल ते करीत होते. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्यासोबत भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरू केला. डोंबिवलीमध्येच त्यांनी एका इमारतीचे बांधकाम सुरू केले. १९७० ला राजकारणाकडे पाठ फिरवून बांधकाम व्यवसायाच्या कक्षा रुंदाविण्यासाठी ते डोंबिवलीहून परत मुंबईकडे वळले. कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन नगरसेवक बाबूराव शेलार यांच्यामार्फत शिवडी येथील एक प्लॉट विकसित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. या जमिनीवर ७२ झोपड्या होत्या. या सर्वांना मोफत घरे हवी होती. देसाई यांनी त्यांची मागणी मान्य केली. ‘कामगार श्रमसाफल्य को. ऑपरेटिव्ह प्रीमायसेस सोसायटी’ या नावाने ओळखली जाणारी ही मुंबईतील पहिली झोपडपट्टी सुधारणा योजना प्रभाकर यांनी आकारला आणली. शिवाय झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देणारी ही या शहरातील पहिली योजना ठरली होती. बांधकाम व्यवसायात यश मिळूनही ते या क्षेत्रात स्थिरावले नाही.
प्रभाकर यांनी ‘सिंधुदुर्ग हॉटेल’ची उभारणी केली. पहाटे ५ पासून रात्री १० वाजेपर्यंत प्रभाकर आणि त्यांचे कर्मचारी मेहनत करीत असत. नंतर प्रभाकर यांनी आडेलीत एक ‘फार्म हाऊस’ उभे केले. तिथेच त्यांनी ‘अॅलटेक कन्टेनर्स’ हा छोटेखानी कारखाना उभा केला. अॅल्युमिनीयमच्या छोट्या-मोठ्या आकारातील बाटल्या तयार होत असत. या बाटल्या कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी वापरल्या जात असत. या बाटल्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विकल्या जात असत. कोरिया, मलेशिया, तैवान, व्हिएतनाम अशा देशांना माल पाठविला जात होता. आडेली गावातील लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचे काम या कारखान्यांनी केले होते. स्वकृतीतून प्रभाकर यांनी कोकणच्या विकासाचा एक मार्गच दाखवून दिला होता.१९६५ च्या काळात प्रभाकर यांचा परिचय डॉ. उपासनी यांच्याशी झाला होता. प्रभाकर यांना त्यांच्या पडत्या काळात डोंबिवली या गावाने हात दिला होता. याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी या गावासाठी काम करण्याचे ठरविले. डोंबिवलीत शिक्षणाच्या काही सोयी नव्हत्या. यातूनच प्रभाकर यांनी आपल्या १४ सहकारी मित्रांच्या सोबतीने ‘डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना केली. जून १९७९ साली मुंबई विद्यापीठातून नवीन महाविद्यालय स्थापन करण्याची परवानगी मिळाली. बाजीप्रभू चौकात त्यांनी एका म्युनिसिपल शाळेत महाविद्यालय सुरू केले. ‘विको’चे मालक गजानन पेंढरकर यांनी काही रक्कम दिली. त्यामुळेच पेंढरकर यांच्या वडिलांच्या नावावरून या महाविद्यालयाचे ‘के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेचे पहिले अध्यक्ष यु. प्रभाकर राव होते. ते २०१० पर्यंत मंडळाचे अध्यक्ष होते. डॉ. उपासनी आणि दाजी दातार यांनी कोषाध्यक्ष आणि सचिव अशी पदे भूषविली होती. १९७४ मध्ये ‘सिस्टर निवेदिता स्कूल’ त्यांनी सुरू केले. सुरूवातीला ही मराठी माध्यमाची शाळा होती. १९९२ मध्ये एमआयडीसीकडून प्लॉट घेऊन तिथे ही मराठी माध्यमाची शाळा भरू लागली. सुरूवातीला शाळा चांगली चालत होती. पण इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढू लागला होता. त्यामुळे देसाई यांनी काळाची गरज ओळखून २०११ पासून शाळेत इंग्रजी माध्यम सुरू केले. मुंबई विभागातून यंदाच्या वर्षी १०० टक्के गुण मिळवून प्रथम आलेली विद्यार्थिनीही याच शाळेची आहे. अशाच प्रकारे प्रभाकर देसाई यांच्या संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालये कर्तृत्व गाजवत आहेत व यापुढेही गाजवत राहतीलच.
- जान्हवी मौर्ये