मुंबई (प्रतिनिधी) - आज 'जागतिक खवले मांजर दिना'च्या निमित्ताने 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. जगात दर पाचव्या मिनिटाला खवले मांजराची तस्करी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच दर पाच मिनिटांनी जंगलातून एक खवले मांजर शिकार किंवा तस्करीसाठी पकडले जाते. खवले मांजर हा जगात सर्वात जास्त तस्करी होणारा प्रथम क्रमांकाचा प्राणी आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जगभरात खवले मांजर दिवस साजरा केला जातो. जगात खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळतात. त्यापैकी चार या आफ्रिकेत आणि चार या आशियामध्ये आढळतात. यामध्ये फिलीपिन्स पॅंगोलिन, सुंदा पॅंगोलिन, चाननिज पॅंगोलिन, टेमिन्कची पॅंगोलिन, इंडियन पॅंगोलिन, वाईट बेलिड पॅंगोलिन, जायन्ट गाऊंड पॅंगोलिन, ब्लॅक बेलिड पॅंगोलिन या प्रजतींचा समावेश आहे. भारतात हिमालय आणि ईशान्य भारताचा काही भाग सोडल्यास इंडियन पॅंगोलिन ही प्रजात सर्वत्र आढळते. मात्र, या प्रजातीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात सर्वत्र खवले मांजराचा वावर आढळतो. परंतु, या वावरावर तस्कर आणि शिकारांची नजर असते. खवले मांजराचे मांस काही देशांमध्ये खात असल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे या प्राण्याच्या खवल्यांना चायनिज औषधांमध्ये मागणी असल्याने या प्राण्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. ईशान्य आशियाई देशांमध्ये या प्राण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांमधून या प्रजातीची मोठ्या संख्येने तस्करी होते. जगभरात आढळणाऱ्या आठही प्रजातींच्या खवले मांजरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे आयूसीएनच्या सर्वेक्षणातून दिसत आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाकडून खवले मांजराच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र हे खवले मांजर संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे.