पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करून गड-किल्ल्यांवर जमावबंदीचे (कलम १४४) आदेश काढणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आता छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे सादर करण्याविरोधात सविनय कायदेभंग करणाऱ्या शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुण्यातील लाल महालाजवळ अटक केली आहे. या अटकेचा निषेध करत 'पोवाड्यांवर बंदी घालणे म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मोगलाई आली आहे का?" असा सवाल शाहीर हेमंतराज मावळे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना राज्य सरकारला केला आहे.
राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कर्यक्रमांना मनाई केली ज्यात पोवाडे कार्यक्रम करू नये याचाही समावेश करण्यात आला आहे. याविषयी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडेचे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्यसरकारला पाठविले होते.मात्र या पत्रकाला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. याचाच निषेध करत पुण्यातील लाल महाल येथे सविनय कायदेभंग करत पोवाडे सादर करणाऱ्या शाहीर हेमंतराज यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांनतर बोलताना शाहीर हेमंतराजे म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही पोवाड्याची परंपरा चालत आली आहे.आणि आज जर अशा सांस्कृतिक परंपरा सांगणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली तर पोवाडा कायमचा संपून जाईल. याच गोष्टीचा आम्ही निषेध केला." असे ते म्हणाले.
पुढे शाहीर हेमंतराजे मावळे म्हणतात,"शिवजयंतीला पोवाडा नसणं म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. शिवजयंतीचा आत्माच सरकारने कडून घेतला याचा आम्ही निषेध केला आणि पोवाडे गायले म्हणून आम्हाला अटक करण्यात आली. याबाबत आम्ही निदर्शनेही केली मात्र तरीही सरकारला जाग आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि छत्रपतींना आपलं दैवत मानणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. मात्र आता त्यांच्या मुलाकडे सत्ता असताना राज्यात छत्रपतींच्या जयंतीदिनी उत्सवाला मनाई करणं अत्यंत दुर्दैवी आणि कर्मदरिद्रीपणाचे आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री गंभीर गुन्हे करून बाहेर फिरत आहेत मात्र माझ्यासारख्या व्यक्तीला पोवाडे गायले म्हणून अटक होते. या गोष्टीचा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने निषेध करावा आणि मुख्यमंत्र्यांना जागं करावं." असे आवाहन शाहीर हेमंतराज यांनी शिवप्रेमींना केले.