चिपळूणमधील तीन आरोपींना अटक
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकणातून खवले मांजराच्या तस्करीचे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. रोहा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलादूरमधून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरुन खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चिपळूणमधील तीन इसमांना अटक केली. त्यांच्याकडून मादी खवले मांजर आणि तिचे पिल्लू ताब्यात घेण्यात आले आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभलेल्या खवले मांजराची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कोकणात आजही या प्राण्याची छुप्या मार्गाने शिकार होऊन त्याची खरेदी-विक्री होते. पालादपूर तालुक्यामधून अशाच एक खवले मांजर विक्रीचा व्यवहार रोहा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. या कारवाईमधून चिपळूणमध्ये राहणाऱ्या तीन इसमांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून खवले मांजराची मादी आणि तिचे पिल्लू ताब्यात घेण्यात आले. झाले असे की, सोमवारी सायंकाळी चिपळूमधील काही इसम पोलादपूरमधून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर खवले मांजराची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांना मिळाली.
माहितीनुसार वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख आणि वाहन चालक राजेश लोखंडे यांनी कशेडी घाटातील भोगाव खुर्द गावाच्या हद्दीत सापळा लावला. रिक्षातून आलेल्या तीघांना यावेळी अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ असलेल्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये खवले मांजराची मादी आणि तिचे पिल्लू आढळून आले. या प्रकरणी चिपळूणमधील कालुस्ते गावातील आरोपी नरेश कदम, चिवेलमधील सागर शिर्के आणि वाघिवरे येथील सिकंदर भाई साबळे यांना अटक केल्याची माहिती विश्वजित जाधव यांनी दिली. या तिन्ही आरोपींनी चिपळूणमधील गावामधून खवले मांजराची शिकारी केल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आरोपींकडून खवले मांजराची खरेदी करण्यांसाठी आलेल्या इसमांचा वन विभागाकडून शोध सुरू आहे. तिन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केली असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय वन्यजीव बाजारपेठेत खवले मांजरांना मोठी मागणी असल्यामुळे राज्यातून छुप्यामार्गाने या प्राण्यांची तस्करी होते. या तस्करीला चाप लावण्याकरिता त्यामागील कारणे, उपाय आणि योजना अंमलात आणण्यासाठी 'कृती आराखडा' तयार करण्यात आला आहे. यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी हा कृती आराखडा पूर्ण केला असून त्याच्या पुनरावलोकनाचे काम सुरू असल्याची माहिती समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ संशोधक डाॅ. वरद गिरी यांनी दिली.