वैदिक सणांचे योग रहस्य भाग-१४

    10-Feb-2021
Total Views |

मत्स्यजयंती_1  



मत्स्यजयंती
 
चैत्र मासात येणार्‍या ‘मत्स्यजयंती’च्या दिवशी भगवंतांनी समुद्रात लोप पावणार्‍या वेदांचे रक्षण करून मानवी सृष्टीच्या पैलतीराला ते नेऊन पोहोचविले. भगवान वेदव्यासांचा ‘पैल’ नावाचा शिष्य होता. व्यासांची माता मत्स्योदरी हीसुद्धा मत्स्याचाच अवतार. याच मत्स्योदरीच्या पोटी वेदव्यासांनी जन्म घेतला. त्यांचे पिता पराशर-परासृष्टीला शर मारून वेध घेणारे ते पराशर. सात वर्षांच्या लहानशा मत्स्योदरीवर ते भाळले होते. सप्तचक्रांकित मानवी देहपिंडावरच तर साधकाची सारी मदार असते.
 
 
 
भगवंतांनी मत्स्याचाच अवतार का घेतला? तर समुद्रातून तरून जाण्यास मत्स्यासारखे साधन नाही. बुडणार्‍या वेदांचे रक्षण समुद्रातूनच का व्हावे आणि वेद समुद्रात का बुडावे?त्याच्याकरिता शब्दापलीकडील हे अत्यंत गूढ रहस्य शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. आकाशतत्त्वाच्या नादातून सृष्टीचा क्रम सुरू होतो. आकाशतत्त्वानंतर वायुतत्त्व येते. वायूचा स्पर्श सर्व वस्तुजगतात कंप उत्पन्न करून जगात प्राण उत्पन्न करतो. ‘अनीदवातं स्वधया तदेकं तस्माध्दान्यन्न परः किं चनास।’ वेद सांगतात. तो प्राण प्रकाशवेगाने सर्व जगभर पसरतो, या अवस्थेला ‘तेजस्तत्त्व’ म्हणतात. तेजस्तत्त्वातून प्राणाचे प्रसारण होते, पण ज्या ज्या स्थानी ते प्रसरण गुंतविले जाते, तेथे तेथे त्या प्रसरणातून वैयक्तिक अस्तित्वाभोवताली स्वतंत्र स्पंदनाचे एक वर्तुळ वा वृत्ती उत्पन्न होते.
 
 
आकाशतत्त्वातून जे नाद, वायू आणि तेजसातून साकारण्याकरिता प्रसरण पावतात, त्यांच्या विश्वलहरीतून वैयक्तिक जीवनाकरिता ज्या वृत्ती साकारतात आणि ज्या वैयक्तिक वृत्तीतून स्वतंत्र असे जीवन प्राप्त होते, त्या जीवन प्राप्त करून देणार्‍या तत्त्वाला ‘आपतत्त्व’ असे म्हणतात. ’आप’ म्हणजेच प्राप्त करणे. हे आपतत्त्व, म्हणजे ज्याला कोणी ‘जलतत्त्व’ म्हणतात, समुद्राप्रमाणे सर्वत्र पसरले आहे. ते सर्वत्र आहे म्हणून सर्वदूर अनंत विश्वे प्रस्थापित आहेत आणि सतत प्रस्थापित होतात. साधकाला या आपतत्त्वाचे दर्शन एखाद्या जलात पडलेल्या छायेप्रमाणे किंवा मृगजलाप्रमाणे दिसते. या आपतत्त्वात कोणतीही निर्मिती फक्त स्पंदन करेल, तर ती निर्मिती स्वतंत्रपणे पलीकडील पृथ्वीतत्त्वात प्रत्यक्ष प्राप्त होत असते.
 
 
’पृथु’ म्हणजे स्वतंत्र ’वि’ म्हणजे जन्म देणे. वेदापासून सर्व सृष्टी निर्माण झाली असा वैदिकांचा दावा आणि अनुभव आहे. मग या आपतत्त्वातून म्हणजेच जलरूपी समुद्रातून वेदांचे वहन जर योग्य रूपाने झाले नाही, तर ते पैलतीरावर म्हणजे पृथ्वीतत्त्वातील मानवांना आणि सृष्टीला प्राप्त होऊन सृष्टीधारणा होईल काय? मग या जलतत्त्वरूपी प्रचंड सागरातून वेद पैल करण्यास मत्स्याशिवाय कोणते योग्य साधन आहे? म्हणून आज द्वितीयेला मत्स्यजयंती साजरी करतात. आजच भगवंतानी मत्स्यावतार धारण केला.
आजच वेदाध्ययन सुरू करण्याची तिथी असते. कारण, ’अष्टमे गुरुहंताच शिष्यहंता चतुर्दशी। अमापूर्वा द्वौ हंताच प्रतिपदा पाठनाशिनी॥’ अष्टमीला वेदाध्ययन सुरू केल्यास गुरूंना हानी तर चतुर्दशीला सुरू केल्यास शिष्याला हानी आणि अमावस्या-पौर्णिमेला सुरुवात केल्यास दोघेही मरतात. प्रतिपदेला सुरुवात केल्यास पाठाचाच नाश होतो. म्हणून द्वितीयेला मत्स्यांनी वेदाचे पैलतीरावर वहन केल्यामुळे जे वेद म्हणजे ज्ञान प्राप्त झाले, त्यांचे अध्ययन सुरू करायचे असते. प्राप्त झाल्याशिवाय अध्ययन कसे करायचे? मत्स्यजंयती आणि वेदाध्ययनाची सुरुवात करण्याच्या तिथीतील हे रहस्य आहे.
 
श्रीरामजन्म
नवमीला राम जन्म घेतात. प्रतिपदेला पिंडातील घटात ज्यांची स्थापना केली ते रामनवमीच्या दिवशी ऐन मध्यान्हाच्या वेळी पूर्ण जन्माला येतात. याच श्रीरामांनी भूमीतून म्हणजे पृथ्वीतून वर आलेल्या सीतेशी स्वयंवररूपाने लग्न केले. स्वयंवराकरिता श्रीरामांनी ज्या शिवधनुष्याचा भंग केला ते शिवधनुष्य म्हणजे साधकाचा मेरूदंड होय. ते शिवधनुष्य दोन ठिकाणी भंग पावून त्याचे तीन तुकडे झाले होते. अतिशय उच्च अशा योगसाधकांना शिवधुनष्याच्या या तीन तुकड्यांचा अनुभव येत असतो.
 
 
याच श्रीरामांनी, आरडाओरडा करून आपले ज्ञान सर्वश्रुत करून इतरांवर कुरघोडी करणार्‍या रावणावर विजयादशमीच्या दिवशी विजय मिळविला होता. याच आकाशतत्त्वीय श्रीरामांचे वाहन वायुतत्त्वातील वायुसुत हनुमंत बनले आणि त्यांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध केला. याच श्रीरामांनी राज्याभिषेक झाल्यावर पुन्हा सीतारूपी पृथ्वीतत्त्वाचा त्याग करून स्वतःला आत्मरूप निर्वाण शरयूत समाविष्ट केले. रामविरहाने तप्त झालेल्या सीतेचे ग्रहण पृथ्वीतत्त्वाने पुन्हा केले. साधक जरी उच्चतत्त्वात गेला तरी त्याला त्याची कायारूपीसीता या पृथ्वीवरच ठेवावी लागते. श्रीरामांनी सीतेला आयुष्यभर सुख दिले नाही. सीतारुपी काया शरीरोपभोगात मग्न झाल्यास साधनेचे कष्ट कोण घेणार व रामप्राप्ती कशी होणार?
 
 
साधक आपल्या सीतारूपी जडशरीराला सुख देईल, तर तो भगवान राम होऊ शकेल का? आत्मारामाने सीतेला (जड शरीराला) राबवूनच घ्यायचे आणि सीतेने रामाशी अत्यंत एकनिष्ठ राहायचे असते. ती साधनारूप कष्टमय जीवन असणार्‍या वनवासातसुद्धा रामाबरोबर हवीच. साधक थोडा क्रीडा वा मृगया करायला लागला की, त्याचेच अहंकारी स्वरूप म्हणजे रावण, सीतारूपी जडशरीराचे हरण करणार, पण सीता श्रीरामालाच एकनिष्ठ होती. पण अहंकारी साधक काय शिवधनुष्य उचलू शकेल? सीतेने श्रीरामांना माळ घातली, पण रावणाने तिचा पिच्छा सोडला नाही. त्याने पंचकर्मेन्द्रियांच्या पंचवटीतून तिला पळविले आणि श्रीरामाला रावणाशी युद्ध करणे भाग पडले.
 
रावण दशमुखी होता. त्याला आपल्या दशग्रंथी मुखोद्गतपणाचा म्हणजेच पांडित्याचा अहंकार होता. परंतु, श्रीराम काही कमी नव्हते. ते दशेन्द्रियांच्या रथावर आरूढ होऊन ब्रह्माकडे धाव घेणारे दाशरथी होते. रावणाची दशमुखे कापली गेली आणि रावण मारला गेला. परंतु, मेल्यावर रावणाची प्राणज्योती श्रीरामात विलीन झाली. जडशरीराची प्राणशक्ती रामात नाही तर कोणात प्रविष्ट होणार? अशा या दाशरथी श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला मध्यान्हाच्या वेळी झाला. आज पुन्हा श्रीरामांसारख्या आदर्श चरित्राची आवश्यकता आहे. (क्रमशः)

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357/9594737357
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121