ठाण्याचे दि.बा.!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2021   
Total Views |

manse_1  H x W:

नोकरी, संसार करत निवृत्ती गाठणारे आणि ‘साठी बुद्धी नाठी’ म्हणत निवृत्तीमार्ग कंठणारे अनेकजण दिसतात. पण यास अपवाद ठरले आहेत ते ‘ठाण्याचे दि. बा.’! शासकीय नोकरीत असतानाही आणि आता निवृत्तीनंतरही समाजोपयोगी कामांचा, आध्यात्मिक उन्नतीचा वसा न सोडलेल्या चिरतरुण दि.बां.विषयी...



साठी बुद्धी नाठी’ असं म्हणतात. तसे होतेही अनेकांच्या बाबतीत. त्यात या वयात शारीरिक व्याधींनी डोके वर काढायला नव्हे, चांगलेच वेडावून दाखवायला सुरुवातही केलेली असते. मात्र, समाजात काही अशाही असामी असतात, ज्यांचे शरीर थकले, तरी मन सचेत किंबहुना चिरतरुण असते. असेच वयाच्या ६६व्या वर्षीदेखील तरुणाईच्या उत्साहाने समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले वारकरी संप्रदायातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे दिनकर बाबुराव पाचंगे, अर्थात ‘ठाण्याचे दि.बा.’ हे होत!सातारा जिल्ह्यातील पाटणमधील मरळी गावात जन्मलेले दिनकरराव, १९७४ साली ‘एसएससी’ उत्तीर्ण होताच टपाल खात्यात पोस्टमास्तरपदी रुजू झाले. या पहिल्याच नोकरीतून त्यांनी कुटुंबाच्या रहाटगाडग्याला हातभार लावण्यास प्रारंभ केला खरा, पण जेमतेम तीन वर्षच ते या नोकरीत रमले. मात्र, मेहनतीसाठी मागेपुढे न पाहणार्‍या आणि कुठलेही काम सचोटीने करणार्‍या दिनकररावांना लवकरच शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी मिळाली. १९७७च्या सप्टेंबरात ते शासकीय सेवेत लिपिक म्हणून रुजू झाले. पण दिनकररावांची ‘युयुत्सु वृत्ती’ त्यांना स्वस्थ बसू देईना. सरकारी नोकरी, तीही त्याकाळात स्थिरता देणारी अशी असतानाही, दिनकररावांना आणखी शिक्षण घेऊन प्रगती करण्याची इच्छा होती. त्यामुळे नोकरी करत करत त्यांनी बाहेरून शिक्षणही सुरूच ठेवले. तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून त्यांनी प्री-डिग्री म्हणजे आताच्या प्रथम वर्ष बीएपर्यंत शैक्षणिक मजल मारली. सोबत कर्तव्यातील समर्पण भावनेमुळे आणि जे काम करायचे ते निष्ठेने व प्रामाणिकपणे करायचे, असा आदर्श बाळगलेल्या दिनकररावांना काही वर्षांतच यश मिळाले. १९८६ साली विक्रीकर (सेल्स टॅक्स) विभागात विक्रीकर निरीक्षकपदी त्यांना बढती मिळाली. या पदावर राहून त्यांनी तब्बल २२ वर्षे सेवा केली. कार्यक्षमता दाखवत सचोटीने केलेल्या कामातून दिनकररावांनी विक्रीकर निरीक्षक या पदाला न्याय दिला. त्यामुळेच २००५ साली विक्रीकर अधिकारी वर्ग-२ पदी त्यांना बढती मिळाली. २०१३ साली ते निवृत्त झाले.






 
मात्र, इतर शासकीय कर्मचार्‍यांसारखे फाईलींमध्ये तोंड खुपसून सुशेगाद राहणार्‍यांपैकी दिनकरराव नव्हते. नोकरी करत असताना गरजू आणि वंचितांच्या मदतीसाठी धावणार्‍या दिनकररावांना बेरोजगारीत खितपत पडलेल्यांच्या रोजीरोटीची चिंता सतावत असे. अशा युवकांना चांगली नोकरी मिळावी, त्यांनी आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे, यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न दिनकररावांनी केला. त्याच ऊर्मीतून कित्येकांना एसटी (राज्य परिवहन), ‘पोलीस दल’ यांसारख्या सरकारी नोकरीत शिरकाव करण्यासाठी आवश्यक ती मदत केली, त्याचबरोबर अनेकांना खासगी बँकांमध्येही नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिनकरराव आवर्जून सांगतात.ठाण्यातील वर्तकनगर येथील म्हाडा इमारतीतील छोटेखानी सदनिकेत पत्नी रेखा व तीन मुलांसह दिनकररावांनी मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा हाकला. दिनकररावांची सचिन, संदीप आणि प्रशांत ही तिन्ही मुले उच्चशिक्षित असून तिघेही आपापल्या क्षेत्रांत मानमरातब टिकवून आहेत. पाचंगे कुटुंबात दोनाचे चार हात झाल्याने राहती जागा अपुरी पडू लागली, म्हणून पुढे वसंतविहार येथील भाड्याच्या प्रशस्त घरात दिनकररावांनी संसाराचा बाडबिस्तरा हलवला. सध्या इथेच दिनकररावांचा वावर असला, तरी त्यांनी आपल्या अध्यात्म व समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे. सर्वांना मदतीचा हात पुढे करणारे दिनकरराव येथे विविध शिबिरे राबवण्यात नेहमीच अग्रेसर असतात. गरीब, गरजवंत, होतकरू विद्यार्थ्यांना साहाय्य असो अथवा नवीन पिढीला मार्गदर्शन असो, त्यात हिरीरीने पुढे असणारे दिनकरराव अखंड हरिनाम सप्ताहातही देहभान विसरून रममाण होतात. यामुळे ठाण्यात त्यांना ‘दिनकर पाचंगे महाराज’ असेही संबोधले जाते. याच ऊर्जेमुळे दिनकररावांनी लोकसहभागातून वर्तकनगर भागात संत ज्ञानेश्वरांचे मंदिरदेखील उभारले आहे. १९८४ सालापासून वारकरी संप्रदायाच्या सेवेत झोकून देणारे दिनकरराव दरवर्षी आषाढी वारीला पायी जातात. वारीतही त्यांची समाजसेवा सुरूच असते. या सेवेचे फळ म्हणा वा त्यांच्या परोपकारी वृत्तीचे फलित म्हणा, पण ठाण्यात उभारण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या वारकरी भवनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिनकररावांवरच सोपवण्यात आली आहे.




 
 
 
नवरात्रौत्सवातील सन २०११ व २०१२चे नवरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या दिनकररावांना ठाणे महापालिकेनेही २०१३ साली ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने गौरवले आहे.शासकीय नोकरीतून निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचा वसा सोडलेला नाही. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह सांप्रदायिक दायित्वामध्ये दिनकरराव नेहमीच अग्रस्थानी असतात. त्यांच्या या योगदानाचे महत्त्व ओळखून केंद्रीय परशुराम संघटनेने यंदाच्या ऑक्टोबरमध्ये त्यांना सन्मानित केले. अशा या ठाण्याच्या समाजसेवी दि.बा. यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!




 
@@AUTHORINFO_V1@@