महाराष्ट्रात प्रथमच 'रेड नॉट' पक्ष्याची नोंद; ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात दर्शन

    08-Dec-2021   
Total Views | 478
red knot 2 _1  



मुंबई (अक्षय मांडवकर) -
महाराष्ट्रातून प्रथमच 'रेड नाॅट' (लाल जलरंक) ( red knot ) या पाणपक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) संशोधकांना 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'मधील सर्वेक्षणादरम्यान या पक्ष्यांचे दर्शन घडले. भारतातून 'रेड नाॅट' ( red knot ) पक्ष्यांच्या तुरळक नोंदी असून महाराष्ट्रात प्रथमच हा पक्षी आढळून आला आहे.
 
 
 
 
राज्याच्या किनारपट्टीवर हिवाळ्यात स्थलांतर करणाऱ्या पाणपक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमधून निरनिराळ्या प्रजातींचे पाणपक्षी राज्यातील पाणथळींवर दाखल होत आहेत. अशाच पद्धतीने 'रेड नाॅट' या (red knot) पाणपक्ष्यांचे दर्शन हे प्रथमच राज्यात आणि खास करुन मुंबईतील पाणथळ क्षेत्रात झाले आहे. सध्या 'बीएनएचएस'कडून 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'मध्ये पाणथळ पक्ष्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. यावेळी फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान 'रेड नॉट' (red knot) पक्षी दिसल्याची माहिती 'बीएनएचएस'चे सहाय्यक संचालक डॉ. राहुल खोत यांनी दिली. 'बीएनएचएस'चे रिसर्च स्कॉलर शशांक सकपाळ आणि प्रणय खडंगा यांनी हा पक्षी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. महाराष्ट्रात हा पक्षी प्रथमच दिसल्याची माहिती तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक आदेश शिवकर यांनी दिली.
 
 
 
 
भारतामधून या पक्ष्याच्या हाताच्या बोटावर नोजण्याइतक्याच नोंदी असून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केवळ गुजरातमधून एक आणि केरळमधून 'रेड नाॅट'च्या (red knot) दोन नोंद असल्याचे शिवकर यांनी सांगितले. या पक्ष्याचे आढळक्षेत्र हे संपूर्ण जगभरात आहे. हा पक्षी उत्तर अमेरिकेत वीण करतो, तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये हिवाळी स्थलांतर करतो. तसेच आर्टिकमध्येही या पक्ष्याची वीण होते आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते हिवाळी स्थलांतरासाठी जातात. यावेळी ते पक्षी स्थलांतराच्या एकूण आठ आकाशमार्गांपैकी 'इस्ट एशिया-आॅस्ट्रेलेशिया' या आकाशमार्गाचा वापर करतात. भारतात हिवाळी स्थलांतर करणारे पाणपक्षी हे उत्तर आशिया खंडामधून येतात. यावेळी ते 'सेंट्रल एशियन' आकाशमार्गाचा वापर करतात. 'रेड नाॅट' (red knot) पक्षी हे 'सेंट्रल एशियन फ्लायवे'चा वापर करत नाहीत. अशावेळी ठाणे खाडीत दिसलेला 'रेड नाॅट' पक्षी (red knot) हा भरकटेल्या अवस्थेत याठिकाणी आल्याची शक्यता आहे.
 
 
 
'रेड नाॅट' पक्ष्याविषयी
'रेड नाॅट' (red knot) हा २५ सेमी आकाराचा लहान पक्षी आहे. त्याचे वजन १०० ते २०० ग्रॅम एवढेचे असते. स्थलांतरादरम्यान हे मोठ्या थव्यांमध्ये दिसून येतात. या थव्यांमध्ये एकाचवेळी १० ते २० हजार 'रेड नाॅट' (red knot) पक्षी असण्याची शक्यता असते. सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत 'रेड नाॅट' (red knot) पक्ष्याचा समावेश होतो. साधारणे हे पक्षी कमीत कमी १० हजार किलोमीटरपर्यंत स्थलांतर करतात.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121