नवी दिल्ली : भारत - न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात १० विकेट्स घेणाऱ्या एजाज पटेलने न्यूझीलंडमधील मस्जिदवर झालेल्या हल्ल्यानंतरचा अनुभव सांगितला. तो म्हणतो, "जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा न्यूझीलंडमधील सर्व मुस्लीम समाजावर चांगलाच परिणाम झाला होता. त्यावेळी आम्हा सर्वांमध्ये भीतीचे वातावरण होते. अजूनही आठवते की, जुम्माचा दिवस होता. नमाज वाचून आम्ही घरी आलो. त्यानंतर बातमी आली की, एका दहशतवाद्याने मस्जिदमध्ये हल्ला केला. मात्र, यावेळी पंतप्रधानांपासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि सोबत जोडले."
पुढे तो म्हणतो की, "माझी आई जर घरातून बुरखा घालून बाहेर पडली तर त्यात काही हरकत नव्हती. ती मुक्तपणे फिरू शकते. कोणीही काही बोलणार नाही. जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आमच्या घराचे बांधकाम सुरु होते. बुरख्यामध्ये पाहून आमच्या नवीन शेजाऱ्यांना वाटले की मुस्लीम असतील. तेव्हा त्यांनी एक रोपटे पायऱ्यांवर ठेवले. त्याचसोबत एका पत्रही होते की ज्यामध्ये 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' असा संदेश लिहिला होता. तेथील लोक ज्याप्रकारे मिळून मिसळून राहतात, ते पाहता जाणीव होते की आपण सर्व एकाच समाजाचा भाग आहोत." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
शुक्रवारच्या दिवशी क्राइस्टचर्चमधील एका मशिदींवर एका बंदूकधाऱ्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ५१ लोकांचा मृत्यू झाला होता तर ४० लोक जखमी झाले होते. २८ वर्षीय त्या हल्लेखोराचे माध्यमांनी 'व्हाइट सुप्रिमीसिस्ट' असा उल्लेख केला होता. त्या इसमाने संपूर्ण गोळीबाराचा व्हिडियो फेसबुकवर लाईव्ह केला होता. हे हल्ले 'अल नूर' मशीद आणि 'लीनवूड इस्लामिक सेंटर'वर करण्यात आले.