
न्यूझीलंडविरूद्ध ‘टी-२०’ मालिकेत निर्भेळ यश मिळविल्यानंतर भारताने कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी केली. मालिकेतील दोन्ही सामन्यांवर भारतीय संघाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. कानपूर येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ एका गड्याने न्यूझीलंडचा पराभव टळला. अन्यथा कसोटी मालिकेतही भारताला जवळपास निर्भेळ यश मिळविता आले असते. हा सामना जरी अनिर्णित राहिला असला, तरी भारतीय संघाने मुंबईत पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ३७२ धावांनी विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. न्यूझीलंडविरूद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारतीय संघाचे मनोधैर्य यामुळे बळावणार, हे मात्र नक्की. याचा फायदा भारताला आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान होणार, यात शंका नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धरतीवर नुकत्याच पार पडलेल्या ‘टी-२०’ आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीही न गाठू शकल्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य खालावले होते. त्यामुळे भारतीय संघाला या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांचे मनोधैर्य बळावणे गरजेचे होते. नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मनोबल वाढविण्यात यशस्वी ठरले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण, दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचेच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघातील खेळाडू संपूर्ण आत्मविश्वासाने कामगिरी करत होते. नव्या आणि जुन्या खेळाडूंचा योग्य ताळमेळही संघात यावेळी दिसून आला. ‘टी-२०’ असो वा कसोटी संघ दोन्ही ठिकाणी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या संधीचे खेळाडूंनी सोने केल्याने भारतीय संघाला न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरोधात खेळतानाही घवघवीत यश संपादन करता आले. याच न्यूझीलंडच्या संघाने भारताला जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत नमवले होते. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य फेरीच्या सामन्यात याच न्यूझीलंडने भारताला नमवले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळविणे, हे भारतासाठी आवश्यक होते. नुकत्याच पार पडलेल्या ‘टी-२०’ आणि कसोटी मालिकेतील दमदार विजयानंतर भारतीय संघाने आपल्या जुन्या पराभवांचा वचपा काढण्यात यश मिळविले आहे.
एक पाऊल पुढे...
न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका जिंकत भारताने मायदेशात सलग १४वी मालिका जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. भारताचा हा विक्रम म्हणजे भारतीय संघ सध्या इतर देशांच्या संघाच्या तुलनेत एक पाऊल पुढे वाटचाल करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशानेही आत्तापर्यंत मायदेशात सलग दहा मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने दोनवेळेस हा विक्रम केला असला, तरी सलग दहा मालिका जिंकण्याच्या पलीकडे ते पोहोचू शकले नव्हते. परंतु, भारताने मात्र सलग १४वी मालिका मायदेशात जिंकत भारतीय खेळपट्टीवरील राजे आम्हीच हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघानंतर वेस्ट इंडिज संघाने मायदेशात सलग आठ वेळा मालिका जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वेस्ट इंडिजसोबतच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनीदेखील मायदेशात सलग सात वेळा मालिका विजय साकारण्याच्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केल्याचा इतिहास आहे. परंतु, भारतीय संघ या सर्वांपेक्षाही एक पाऊल पुढे असल्याचे आकडेवारीच स्पष्ट करते. कोणत्याही बलाढ्य संघाला मायदेशात सलग १४ मालिकाविजय साकारता आले नव्हते. परंतु, भारतीय संघाने सलग १४ मालिकाविजय साकारत मोठे यश संपादन केले. त्यामुळे भारतीय संघ कौतुकास नक्कीच पात्र आहे. १४ मालिकाविजयामध्ये भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदींसारख्या बलाढ्य देशांना ‘४-०’ अशा फरकाने नमवण्याचीही कामगिरी केली आहे. २०१२पासून ते आत्तापर्यंत म्हणजेच जवळपास नऊ वर्षांच्या कालावधीत एकही संघ भारताला मायदेशात मालिका पराभूत करू शकलेला नाही. अनेक संघ आले आणि गेले. मात्र, कोणत्याही संघाला भारतात मालिका जिंकता आलेली नाही. या नऊ वर्षांच्या कालावधीत कर्णधार, प्रशिक्षक, खेळाडू बदलण्यात आले. परंतु, मायदेशात भारतीय संघाला नमवण्याची किमया कोणत्याही देशाला साधता आली नाही. त्यामुळे मायदेशात कसोटीमध्ये केवळ भारतीय संघाचाच बोलबाला असून हा संघ इतर संघांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.