मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने दुसरा कसोटी सामना हा ३७२ धावांनी जिंकत न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत १-० असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष ठेवले. पण, भारतीय फिरकीपटूंच्या जादूसमोर न्यूझीलंडचा संघ केवळ १६७ धावांवर सर्व बाद झाला. कसोटी क्रिकेटमधील धावांचे आकडे पाहता हा बहरतच सर्वात मोठा विजय ठरला. टी - २०चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. तसेच या विजयासह त्याने अनेक विक्रम रचले आहेत.
कर्णधार विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीन फॉमॅटमध्ये प्रत्येकी ५० विजयांचा पराक्रम केला आहे. तसेच, कोहलीचा कर्णधार म्हणून घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धचा हा सलग चौथा विजय ठरला. तसेच, वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. तर, मायदेशात भारताचा हा सलग १४वा मालिका विजय ठरला.
दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचा डोंगर उभा केला. याचा पाठलाग करताना डॅरिल मिशेलने सर्वाधिक ६० धावा केल्या. तर हेन्री निकोल्स ४४ धावांवर बाद झाला. यावेळी दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी ४ विकेट्स घेतले. तर अक्षर पटेलने १ विकेट घेत न्यूझीलंड संघाची दैना उडवली. मयंक अग्रवालला १५० धावांसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर, २ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.