कल्याण : बाल विवाह संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात होता. पण आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाल विवाह केला जाईल. त्या सरपंचासह नोंदणी करणा:या रजिस्टारच्या विरोधातही गुन्हा दाखल केला जाईल. एवढेच नाही तर सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका:यांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माया कटारीया, रेखा सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांनी कल्याण डोंबिवली, ठाणे ग्रामीण ,भिवंडी परिसरातील सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याच्या तक्रारी मांडल्या.
यावेळी अध्यक्षा चाकणकर यांनी या रुग्णालयात सरप्राईज व्हीझीट केली जाईल. तसेच त्यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सांगून सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासीत केले.
चाकणकर म्हणाल्या, बाल विवाह करुन देणार आणि घेणारे आईवडील, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात होता. पण आता सरपंच पद देखील रदद करण्याची शिफारस केली जाणार आहे. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षीतेसाठीचे शक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना सूचना करण्यात आली आहे की, शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरु करण्यात आला आहे. महिलांना कोणताही त्रास असल्यास महिलांनी या नंबरवर साधवा. दहा ते पंधरा मिनिटात पोलिस त्यांच्या मदतीसाठी पोहतील.
चौकट - महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला असल्याने महापालिकेने नागरीकांना घाबरून जाऊ नका मात्र सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. असे असले तरी चाकणकर यांच्या कार्यक्रमात काही महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता. तसेच सामाजिक अंतर ही राखले गेले नव्हते. याविषयी चाकणकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही जणांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मान्य केले. मात्र मास्क वापराच्या कडक सूचना देऊ असे ही त्यांनी सांगितले.