प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या

    05-Dec-2021   
Total Views | 733

manse 3.jpg_1  


 


आनंदीबाई पेशवा असो किंवा आहिल्याबाई होळकर आपल्या अभिनयातून त्यांचे व्यक्तीमत्त्व हुबेहुब उभ्या करणार्‍या डोंबिवलीतील आरती मुनीश्वर यांना प्रेक्षकांकडून कायम ‘वाह क्या बात है’ अशीच दाद मिळत असते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या आरती मुनीश्वर यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.


 
आरती मुनीश्वर संत एकनाथांच्या १३व्या पिढीतील वंशज आहे. आरती यांचे बालपण मराठवाड्यात औरंगाबादजवळील पैठण या ठिकाणी गेले. त्यांचे शालेय शिक्षण महापालिकेच्या कन्या शाळेत झाले. त्यांनी ११वी सरकारी महाविद्यालयातून केले. औरंगाबादमधील महिला महाविद्यालयातून १२वी केली. १२वीला असतानाच त्यांचे लग्न ठरले. लग्न ठरल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला. १९७८ साली त्यांचे लग्न झाले आणि त्या डोंबिवलीकर झाल्या. लग्नानंतर दहा वर्षांचा त्यांनी गॅप घेतला. दहा वर्षांनी ‘एसएनडीटी महाविद्यालया’ची प्रवेश परीक्षा देऊन त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जगणे म्हणजे नुसता श्वास घेणे नाही. घरासोबतच काहीतरी केले पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या मनात होती. दोन मुलांना सांभाळून छोटे-मोठे काम करीत होते. मुलं जरा मोठी झाल्यावर त्यांनी सामाजिक कार्यातही उडी घेतली.


 
मातृमंदिर संयुक्त महिला मंडळ या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काही करता येईल का? असा विचार करून त्यासाठी काम करण्यास सुरूवात केली. मुलींच्या वसतिगृहासाठी प्रयत्न केले. त्यातून ते वसतिगृह उभे राहिले. त्यांची एक टीम होती. त्यातून सर्व कामे सुरू होती. ‘दुर्गा सेना महिला संघटना’ स्थापन केली. त्यांच्या अध्यक्षा विंदा भुस्कटे होत्या. त्यातून पथनाट्य केली. भवरीदेवी प्रकरण त्याकाळात खूप गाजले होते. तिने बालविवाह रोखल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यांचा विषय या पथनाट्यातून मांडला होता. मद्यपान करून नवरा बायकोला मारहाण करीत असत. त्या महिला मंडळाकडे गार्‍हाणे घेऊन येत असे. त्याविषयी ही त्यांनी पथनाट्यातून जागृती केली. एका रथयात्रेत आरती या नवरी साडी नेसून गेल्या होत्या. त्या रथयात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारही आले होते. त्यातील एकाने आरती यांना न्यूज अँकरींग करणार का? असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणीच मिळाली. २००० साली केबल न्यूज अँकरींगचा ब्रेक त्यांना मिळाला. नवी मुंबईत एका वृत्तवाहिनीमध्ये त्या काम करीत होत्या. त्यानंतर एक मालिका पाहत असताना दूरदर्शनवर एका स्त्रियांविषयीच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालकाची आवश्यकता आहे, अशी जाहिरात दिसली. आरती यांनी तिथे अर्ज केला. अनेक महिला या कार्यक्रमाच्या मुलाखतीसाठी आल्या होत्या. या मुलाखतीमधून आरती यांची सूत्रसंचालक म्हणून निवड झाली. या कार्यक्रमातून त्यांनी २५० लाईव्ह मुलाखती घेतल्या आहेत. ‘हॅलो सखी’ हा त्यांचा लाईव्ह कार्यक्रम फोन इनसह सुरू झाला. प्रेक्षकांना सहभाग घेता येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. तोपर्यंत फोन इन ही संकल्पना प्रत्यक्षात आली नव्हती. पण आरती यांचा अभ्यास, हजरजबाबीपणा, त्यांचे वाचन आणि वाचनातून आलेला आत्मविश्वास यामुळे त्यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलले. शिला जुन्नरकर, वंदना शर्मा आणि शैलजा पंड्या यांनी त्यांना मदत केली. तसेच त्यांच्या अधिकारी भारती गोखले यांनी मला खर्‍या अर्थाने पैलू पाडण्याचे काम केल्याचे आरती सांगतात.



 
‘हॅलो सखी’ या कार्यक्रमाने एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती. ज्यांची मुलाखत घ्यायची होती. त्या व्यक्तींना आरती जाऊन भेटत असत. गुगल त्यावेळी नव्हते. पुस्तके वाचत असत. यातून माणसांचा अभ्यास केला. मुलाखत घ्यायला आधी भेटल्यामुळे नवखेपणा जायचा. मुलाखत चांगली फुलत होती. पाळणाघर चालविणार्‍या, डोंबिवलीतील अर्थार्जन करणार्‍या महिलांनाही या कार्यक्रमातून संधी दिली. जयंत साळगावकर, शंकर अभ्यंकर, राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले अशा दिग्गज व्यक्तींची मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली. दिग्गजांसह प्रेक्षकांनीही त्यांच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली. २००७ मध्ये तरूणांना वाव द्यायचा यामुळे त्यांना वाहिनीकडून रिटायरमेंट दिली. घरगुती कारणांमुळे त्यांनी इतर सर्व कामांना स्वल्पविराम दिला होता. दिपाली काळे यांनी २०१४ मध्ये घरी बसू नको, असे सांगितले. त्यांनी आरती यांना पुन्हा सक्रीय होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ब्रेकनंतर ‘आगरी महोत्सवा’च्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी आरती यांना मिळाली. त्यांनी पुन्हा आत्मविश्वासाने काम करण्यास सुरूवात केली. अ‍ॅड. शशांक देशपांडे यांच्यासोबत ‘कायद्याचं बोलू काही’ हा कार्यक्रम अनेक ठिकाणी केला. त्यातून कथा सांगितल्यावर त्या लोकांना आवडत असल्याचे आरती यांच्या लक्षात आले. कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी केले. एकपात्री कार्यक्रमाकडे त्या वळल्या. सहवास वृद्धाश्रमात २०१६ साली त्यांनी पहिला एकपात्री कार्यक्रम केला. त्यामध्ये त्यांनी ‘आनंदीबाई पेशवा ः एक कथा आणि व्यथा’ या विषयावर एकपात्री कार्यक्रम सादर केला. आनंदी पेशवा यांना नेहमी नकारात्मक व्यक्तीमत्त्व म्हणून पाहिले जाते. त्यांनी ‘ध’ चा ‘म’ केला असे बोलले जाते. पण त्यांनी तो केला नाही. मग तिची काय बाजू आहे. त्यात पेशव्यांची गोष्टी घेत त्यांनी एक कार्यक्रम तयार केला. त्यांचे ५० प्रयोग झाले. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन लागला आणि प्रयोग थांबले. आहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित प्रयोग त्यांनी सुरू केला आहे. त्याचे तीन प्रयोग झाले आहेत. समाजासाठी जे करता येईल ते काम त्या करीत असतात. संत एकनाथांवर त्या बोलतात. असे विविध कार्यक्रम आरती या करीत असतात. या हरहुन्नरी कलाकार, निवेदकाला दै. ‘मुंबई तरूण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121