मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणारा भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना हा अनेक विक्रमांमुळे लक्षात राहण्यासारखा आहे. सर्वात मोठा विक्रम म्हणजे न्यूझीलंड फिरकीपटू एजाज पटेलने आपल्या फिरकीची जादू दाखवत एकाच डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे एजाज पटेल याचा जन्म हादेखील मुंबईचाच आहे. त्याने भारतीय दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत परफेक्ट १० क्लबमध्ये स्वागत केले.
१९५६मध्ये इंग्लंडचे गोलंदाज जिम लेकर यांनी पहिल्यांदा एकाचा डावात १० विकेट्स घेतले होते. तर त्यानंतर १९९९मध्ये भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेने हा पराक्रम केला होता. आता यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलने हा पराक्रम करत इतिहास रचला आहे. एजाजचा जन्म हा मुंबईमध्येच झाला होता. तो ६ वर्षांचा असताना त्याचे वडील हे न्यूझीलंडमध्ये राहायला गेले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडीयम खेळणे हे त्याचे स्वप्न होते. एजाजने ४७.५ षटके टाकत १२ निर्धाव षटके टाकले. तर यादरम्यान त्याने ११९ धावा दिल्या. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.
भारतीय संघाने ३२५ धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघासमोर उभा केला आहे. यावेळी भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालने संयमी फलंदाजी करत १५० धावांची खेळी केली. तर शुभमन गिल याने ४४ तर अक्षर पटेलने ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. अक्षर पटेलने कसोटी कारकिर्दीतले आपले पहिले अर्धशतक झळकावले.