मुंबई : राज्यासह मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढीसह ओमायक्रॉनचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे मुंबईत विविध निर्बंधांसह नववर्षाच्या पार्ट्यांवर रोक लावण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे शहरातील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसंख्येच्या संख्येच्या आधारे आणि लास घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे कोरोना लसीकरण होणे आवश्यक आहे. या नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट जरी पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या मात्रेबाबत अद्याप हे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. जगभरातील कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे पालिकेने लसीकरणावर भर देत असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.