नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप करणार्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारविषयक उच्चायुक्तालयास (ओएचसीएचआर) भारताने प्रत्युत्तर दिले आहे. “भारतात हिंसाचाराविरोधात कारवाई केली जाते, अधिकारांविरोधात नव्हे,” अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी खडे बोल सुनावले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा ठपका नेहमीप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे ठेवण्यात आला आहे. मात्र, भारताने त्यांचे आरोप फेटाळून लावले असून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “भारतात कायद्यांचे उल्लंघन आणि हिंसाचार याविरोधात कारवाई करण्यात येते. मात्र, भारतात अधिकारांचा वैध प्रयोग केल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ‘युएपीए’सारखे कायदे अत्यंत गरजेचे आहेत. मात्र, भारतावर अशाप्रकारचे आरोप करणे हे सीमापार दहशतवादामुळे निर्माण होणार्या समस्यांची जाणीव नसल्याचे द्योतक आहे,” असा टोला भारताने संयुक्त राष्ट्रांस लगाविला आहे.