मुंबई, दि. २९ ( रामचंद्र नाईक ) : तब्बल ३०० वर्षे जुने मंदिर असलेल्या प्रभादेवी मंदिरासमोर अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्याचा घाट घालणार्या महापालिकेतील सत्ताधार्यांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस दीपक सावंत यांनी बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान दिला. प्रभादेवी मंदिर परिसरात धार्मिक सौख्य कायम असतानाही केवळ आपल्या मतांच्या राजकारणासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कट-कारस्थान महापालिकेतील सत्ताधार्यांकडून यामार्फत केले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्यांकडून हा घाट घालण्यात आला असून यापुढे अशा घटना घडू नये, तसेच दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांना शिक्षा घडावी, यासाठी आम्ही न्यायालाचा दरवाजा ठोठावणार आहोत, असे दीपक सावंत यावेळी म्हणाले.
ख्रिस्ती स्मृतिस्तंभाचा नेमका विषय काय?
माहिम विधानसभा मतदारसंघात ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून विविध योजना आखल्या जात आहेत. प्रभादेवी मंदिरासमोर अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्याचा घाट घालणे हा त्यापैकीच एक भाग, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, प्रभादेवी मंदिर हे ३००वर्षे जुने मंदिर आहे. प्रभादेवी मातेच्या मंदिराच्या नावाने हा परिसर ओळखला जातो. प्रभादेवी मंदिरामुळेच रेल्वे स्थानकालाही ‘प्रभादेवी स्थानक’ असे नाव देण्यात आले. मात्र, असे असतानाही ख्रिश्चन समाजातील मते मिळविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी या प्राचीन मंदिरासमोर अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्याचा घाट घालत आहेत. काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मगुरु हे प्रभादेवी मंदिर परिसरात आले होते. त्याची आठवण म्हणून या परिसरात ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या विरुद्ध दिशेच्या फुटपाथवर हा स्मृतिस्तंभ होता. मात्र, तो चोरी झाल्याचे सांगितले जाते. तो पुनःप्रस्थापित करण्यासाठी तसाच एक स्मृतिस्तंभ बनवून घेण्यात आला. परंतु, एका, विकासकाला मदत व्हावी म्हणून हा स्मृतिस्तंभ पूर्वीच्या ठिकाणी न बसवता मंदिराच्या दारात बसवण्याचा घाट शिवसेनेने घातला. याला भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांसह स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविल्यानंतर हा अनधिकृत स्मृतिस्तंभ तेथून हटविण्यात आला.
याठिकाणी नेमके काय घडले?
मंदिराच्या दारासमोरच हा अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. ज्यावर ‘फ्रॉम सेंट थॉमस चर्च’ असा उल्लेख होता. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्याकडून याचे अनावरण करण्यासाठी बॅनरबाजीही करण्यात आली. हा अनधिकृत स्मृतिस्तंभ हटविण्यासाठी भाजपसह, विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक एकत्र आले. सुरुवातीला महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, याविरोधात कारवाई झाली नाही. त्यानंतर महापालिका प्रशासनाला ‘अल्टिमेटम’ देण्यात आल्यावर हा स्मृतिस्तंभ हटविण्याचे आश्वासन देण्यात आले. ख्रिस्ती मतदारांना खूश करण्याच्या प्रयत्नांत हिंदू धर्मीय मतदार आपल्यावर नाराज होत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी तो स्मृतिस्तंभ हटविण्याचा आणि यामाध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारताना हिंदू धर्मीयांच्या भावनांचा विचार शिवसेनेकडून करण्यात आला नाही. परंतु, याला विरोध होऊ लागताच सत्ताधार्यांकडून अनधिकृत स्मृतिस्तंभ हटविण्यासाठी प्रयत्न करण्याचा कांगावा करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये केवळ मतांसाठी हे राजकारण करण्यात येत आहे. जाणून-बुजून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे.
पोलिसांची भूमिका नेमकी काय होती?
अनधिकृत स्मृतिस्तंभाविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक नागरिकांनी मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी मंदिरात महाआरती करण्याचे ठरविले. परंतु, सायंकाळी महाआरतीसाठी सर्व जण जमा झालेले असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी या सर्वांना मंदिरात जाण्यापासून रोखले. मंदिरात जाऊन देवदर्शन करण्यासही मज्जाव करण्यात आला. ‘जय श्रीराम’चे नारेही देण्यापासूनही रोखले. तसेच यावेळी काही जणांना ताब्यातही घेण्यात आले. मंदिरात जाऊन देवदर्शन करण्यापासून रोखणे, आरती करू न देणे म्हणजे घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांची पायमल्ली आहे.
याविरोधात आपली पुढील भूमिका काय?
जेथून या प्रकाराची सुरुवात झाली, हे कट-कारस्थान ज्यांनी रचले, अशा गुन्हेगारांना आम्ही शोधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या परिसरात धार्मिक सौख्य कायम असतानाही दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले. तसेच, हा मुद्दा पेटवण्यासाठी ज्यांनी खतपाणी घातले, त्या सर्वांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. आगामी काळात अशा घटना घडू नये, यासाठी आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत.
- रामचंद्र नाईक