मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसनाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अद्यापही पूर्णतः निकाली निघालेला नाही. प्रकल्पातील विविध मुद्द्यांवर आणि तरतुदींवर स्थानिक नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कुठलीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यातच बीडीडी चाळीतील जांभोरी मैदानावर करण्यात येत असलेल्या सुशोभीकरणाला स्थानिक नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी स्थानिक नागरिक आणि भाजप वरळी विधानसभेतर्फे जांभोरी मैदानावर करण्यात येत असलेले काम बंद पाडले.
पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना स्थानिकांनी आपला रोष आणि भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. 'जांबोरी मैदानालगत असलेल्या छोट्या दुकान आणि स्टॉल्सला येत्या दोन ते तीन दिवसांत पाडण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. या विरुद्ध आम्ही आम्ही प्रशासनाकडे विचारणा केली असता पाडण्यात येणाऱ्या संबंधित स्टॉलसाठी लवकरात लवकर दुसरी जागा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र, स्टॉलसाठी जागा देण्याचे प्रशासनाचे आश्वासन हे निव्वळ पोकळ आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कामाला विरोध नाही ; पण स्थानिकांना विश्वासात घ्या
'जांबोरी मैदान येथे होत असलेल्या कामाविषयी कुठलीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. या कामाला आमचा विरोध नाही. मात्र, संबंधित कामाचा आराखडा आणि आवश्यक ती माहिती आम्हाला जोवर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद ठेवणार आहोत. हे काम कोणत्या उद्देशाने सुरु आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. मार्च महिन्याचा शिल्लक राहिलेला उर्वरित निधी कुणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न या कामाच्या आडून केला जात आहे का ? हे जनतेसमोर येणे आवश्यक आहे. स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांच्या भावना लक्षात घाव्यात, अशी आमची मागणी आहे. केवळ आश्वासने अन घोषणा न करता स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरील कामाचा आराखडा आणि इतर माहिती जनतेला मिळेपर्यंत आम्ही हे काम बंदच ठेवणार आहोत.'
- दीपक पवार , भाजप पदाधिकारी, वरळी विधानसभा