अलीकडेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकनमध्ये भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण लक्षात घेऊन, पोप जेव्हा भारतभेटीवर येतील, त्यावेळी त्यांनी, ख्रिस्ती धर्मगुरू आणि त्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वर्तन करणार्या पोर्तुगीज राजवटीने ३५० वर्षे हिंदू समाजावर जे अत्याचार केले, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
सध्या ख्रिस्तीजगत नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यात गर्क आहे. भारतातही गोव्यासह विविध ठिकाणी नाताळनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण,गोव्यामध्ये आपला अंमल प्रस्थापित केलेल्या पोर्तुगीज राजवटीने पोपच्या संगनमताने जे अनन्वित अत्याचार तेथील हिंदू समाजावर केले, त्याबद्दल पोर्तुगीजांनाही खंत वाटत नाही आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण कार्यरत असल्याचा आव आणणार्या ख्रिस्ती धर्ममार्तंडांनाही त्याचे सोयरसुतक नाही! असत्य, अन्याय याविरुद्ध उभे असल्याचा दावा करणारे ‘व्हॅटिकन’ हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठही गोव्यातील हिंदू जनतेवर २५० वर्षांहून अधिक काळ जे अनन्वित अत्याचार केले, त्याबद्दल मौन बाळगून आहे.
गोव्यातील हिंदू समाजावर ख्रिस्ती धर्मगुरूंनी आणि पोर्तुगीज राजवटीने अनन्वित अत्याचार केले. भारतात अन्यत्रही ख्रिस्ती समाजाने हिंदू समाजावर अत्याचार केले आहेत आणि अजूनही केले जात आहेत! हे अमानुष अत्याचार लक्षात घेता, ‘व्हॅटिकन’च्या पीठाचे प्रमुख असलेल्या पोपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तसेच केवळ माफी पुरेशी नाही, तर यापुढे ख्रिस्ती धर्मगुरुंकडून धर्मांतराचे कोणतेही प्रयत्न केले जाणार नाहीत, असेही ‘व्हॅटिकन’ने घोषित करावे, अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
गोव्यातील पोर्तुगीज राजवट आणि ख्रिस्ती धर्मपीठ यांनी गोव्यामध्ये तेथील जनतेचे धर्मांतर करण्याची मोहीम उघडली होती. एक तर धर्मांतर करा किंवा आमच्या प्रदेशातून निघून जा, असा इशारा पोर्तुगीज राजवटीने दिल्याने हिंदू जनतेने आपला जमीनजुमला, घरेदारे सोडून पलायन केले. पोर्तुगीजांच्या हातून आपल्या देवदेवतांची विटंबना होऊ नये, म्हणून तेथील मंदिरांमधील मूळ मूर्ती अन्यत्र हलविण्यात आल्या. पोर्तुगीज राजवट नसलेल्या ठिकाणी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेथे भव्य मंदिरे उभारण्यात आली. पण, ज्या हिंदू समाजास आपले गाव, घरदार सोडणे शक्य झाले नाही, त्यांनी पोर्तुगीज जाचास घाबरून धर्मांतर केले.
पण, असे धर्मांतरित आपल्या मूळ हिंदू धर्मास विसरलेले नव्हते. परंपरागत वेशभूषा, रितीरिवाज, विवाहानिमित्ताने होणारे कार्यक्रम, श्राद्ध यासारखे विधी, पानसुपारीचे कार्यक्रम अशा गोष्टी सुरूच होत्या. तसेच ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला अशा गोवेकर जनतेने घरापुढे तुळशीचे वृंदावन कायम ठेवले होते. हिंदूंची घरे शेणाने सारवली जात होती. विहिरीत, तलावात पाव टाकून ज्या हिंदू जनतेला बसविण्यात आले होते, ती जनता आपले मूळ रितीरिवाज विसरली नव्हती. सक्तीने धर्मांतर केलेला हिंदू समाज पूर्णपणे ख्रिस्ती होत नसल्याचे लक्षात आल्यावर पोर्तुगीज राजाने रोमच्या धर्मपीठाच्या मदतीने गोव्यात ‘कोर्ट ऑफ इनक्विझिशन’ची निर्मिती केली.
जे नवख्रिस्ती झाले आहेत.पण, ते अजूनही जुने रिवाज पाळत आहेत त्यांच्याबद्दल न्यायनिवाडा करण्याचे कार्य या ‘कोर्ट ऑफ इनक्विझिशन’च्या माध्यमातून सुरु झाले. लहानसहान शिक्षा करण्याबरोबरच जीवंत जाळण्याचा असंख्य घटना या ‘इनक्विझिशन’च्या काळात घडल्या. ज्या झेवियरचा संत म्हणून ‘उदो उदो’ केला जातो, त्याच्या कारकीर्दीत तर धर्मांतरासाठी जनतेवर अपार अन्याय करण्यात आले. पोर्तुगीज राजवटीच्या काळात असंख्य हिंदू मंदिरे नष्ट करण्यात आली. गोव्यामध्ये नवख्रिस्ती जनतेकडून हिंदू रितीरिवाज पाळले जात होते, असे रिवाज पाळणार्या गुन्हेगारांना शासन केले जाई.
शिखा राखणार्यांना, परंपरागत भारतीय वेशभूषा करणार्यांना, पानसुपारीचे कार्यक्रम योजणार्यांना, श्राद्धकर्म करणार्यांना, दारासमोर तुळशी वृंदावनाची उभारणी करणार्यांना त्यांच्या अशा गुन्ह्यांबद्दल कठोर शासन केले जाई. कोणकोणत्या गोष्टी करता कामा नयेत, याची एक लांबलचक यादीच पोर्तुगीज राजवटीने तयार केली होती. एखादी व्यक्ती आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आल्यास किंवा कोणी तशी तक्रार केल्यास, कसलीही शहानिशा न करता संबंधित व्यक्तीस कठोर शासन केले जाई.
गोव्यामध्ये ‘इनक्विझिशन’च्या काळात झालेल्या अत्याचारांची नुसती रेखाचित्रे जरी गुगलवर शोध घेऊन पाहिली तरी पोर्तुगीज राजवटीने आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी गोव्यातील हिंदू समाजावर किती अत्याचार केले त्याची कल्पना येते. ‘इनक्विझिशन’ संदर्भातील पोर्तुगीज कागदपत्रांमध्येही ही सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व अतिरंजित घटना आहेत, असे समजण्याचे काही कारण नाही. तसेच ज्या ख्रिस्ती धर्मपीठाच्या आशीर्वादाने हिंदू समाजावर ३५० वर्षे अत्याचार झाले, त्याबद्दल त्या धर्मपीठाने विनाअट माफी मागायलाच हवी. विश्व हिंदू परिषदेने ही जी मागणी केली आहे, ती रास्तच आहे.
अलीकडेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकनमध्ये भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण लक्षात घेऊन, पोप जेव्हा भारतभेटीवर येतील, त्यावेळी त्यांनी, ख्रिस्ती धर्मगुरू आणि त्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वर्तन करणार्या पोर्तुगीज राजवटीने ३५० वर्षे हिंदू समाजावर जे अत्याचार केले, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख पदाधिकार्यांची तीन दिवसांची एक बैठक अलीकडेच जुनागढ येथे संपन्न झाली. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी ही मागणी केली. तसेच भारतभेटीवर येणार्या पोपने अन्य धर्मांबद्दल आदर व्यक्त करावा आणि समांतर धर्मांतराचे कार्यक्रम थांबविण्यात येत असल्याची घोषणा करावी, अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
पोर्तुगीज राजवटीने गोव्यातील जनतेवर प्रचंड अन्याय केला, हा इतिहास भारतीयांनी कदापि विसरता कामा नये. त्यावेळची पोर्तुगीज राजवट आणि ख्रिस्ती धर्मपीठ यांनी मिळून गोव्यातील हिंदू समाजावर अमानुष अत्याचार केले आहेत. चुकीला माफी नाही, हा न्याय रोमच्या धर्मपीठासही लावावयास हवा. आपल्या हातून जे घोर पातक घडले, त्याचे परिमार्जन व्हॅटिकनने करायलाच हवे!
फारूख अब्दुल्ला यांची बदललेली भाषा!
जम्मू-काश्मीर राज्य म्हणजे आपल्या बापाची जहागीर असल्याचे समजून चालणार्या फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आदी नेत्यांच्या नाकावर टिच्चून जम्मू -काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेने घेतल्यानंतर आणि त्या आधीही, त्या राज्यातील वर उल्लेखित नेत्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी एकच थयथयाट केला होता. भारताने असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलले, तर भारतासमवेत राहायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल, अशी बंडखोरीची भाषा या नेत्यांकडून बोलली गेली होती. अजूनही या ‘गुपकार’ नेत्यांची ती भाषा कायम असली तरी फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्याने आपली भाषा बदलली असल्याचे दिसून येत आहे.
ज्या फारूख अब्दुल्ला यांनी एकेकाळी देश सोडून जाण्याची भाषा केली होती, तेच फारूख अब्दुल्ला आता देश वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करीत सुटले आहेत. फारूख अब्दुल्ला यांचा ९७ सेकंदांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी देश वाचविण्यासाठी आपण एक झाले पाहिजे, अशी भाषा वापरली आहे. हिंदू आणि मुस्लीम नावाखाली देशात फूट पाडण्याची संधी साधूंना देऊ नका, असे आवाहनही त्यांनी सदर व्हिडिओमध्ये केले आहे. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर फारूख अब्दुल्ला यांनी ही भाषा वापरली आहे. ‘कलम ३७०’ रद्द होण्यापूर्वी फारूख अब्दुल्ला यांनी जी वक्तव्ये केली होती, त्यांच्या क्लीपही या व्हिडिओमध्ये आहेत. याआधी फारूख अब्दुल्ला यांनी, अन्य राज्यातील जनतेला येथे बसवून सरकारला तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याचा लोकसंख्येचा समतोल बिघडवायचा आहे, असा आरोपही केला होता.
दि. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी जम्मू- काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ निकालात काढण्यात आले. त्यांनतर तेथील परिस्थितीत खूप सुधारणा झाली आहे. दहशतवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. दि. ५ ऑगस्ट, २०१९ ते दि. २२ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत दहशतवादाशी संबंधित ४९६ घटना घडल्या. ज्यावेळी विशेषाधिकार देणारी कलमे राज्यात लागू होती, त्या काळात तेवढ्याच म्हणजे ८४१ दिवसांच्या कालावधीत अशा घटनांची संख्या होती ८४३!
दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य सरकारच्या सेवेतील काही कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची कृती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत असल्याने फारूख अब्दुल्ला आणि कंपनीने देश वाचविण्यासाठी एक होण्याची भाषा वापरण्यास आरंभ केला आहे. पण, काश्मीरमधील ‘गुपकार’ आघाडीच्या नेत्यांमागे धावण्यातून काही साधणार नाही, हे तेथील जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळेच आता फारूख अब्दुल्ला यांच्यासारखे नेते देश वाचविण्यासाठी एक होण्याची भाषा बोलू लागले आहेत!