काशी शहर हे युगानुयुगे ‘मुक्ती देणारे शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. मुक्तीच्या शोधात असणारे सर्वजण काशीकडे आकर्षित होतात. खरेतर काशिविश्वनाथ धाम हा प्रकल्प म्हणजे काशीच्या मुक्तीचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दृष्टिकोनामुळे आणि प्रयत्नांमुळेच काशिविश्वनाथ मंदिराला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ डिसेंबर रोजी भव्य-दिव्य काशिविश्वनाथ धामचे उद्घाटन केले. प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असणार्या काशी शहर तसेच ऐतिहासिक काशिविश्वनाथ मंदिर यासाठी हा अनोखा प्रकल्प अगदी अनुरूप आहे. काशीचे महत्त्व आणि प्राचीनत्व याबद्दल मार्क ट्वेनने लिहिले होते की, “वाराणसी हे शहर इतिहासापेक्षा जुने आहे, प्रथा-परंपरांपेक्षाही जुने आहे. पौराणिक कथांपेक्षाही जुने आहे आणि या सर्व गोष्टी एकत्र विचारात घेतल्यानंतर जे प्राचीनत्व जाणवेल, त्यापेक्षा दुपटीनेही हे शहर प्राचीन असू शकेल.”
पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि त्याचबरोबर जगातील सर्वात जुन्या जीवंत शहरांपैकी एक असणारे, तसेच हिंदू धर्माचे आणि शतकानुशतकांच्या प्राचीन संस्कृतीचे हे केंद्र. अर्थात, काशी तथा वाराणसी शहर अवघ्या जगाला पुन्हा एकदा समर्पित केले. प्राचीनत्व आणि निरंतरतेचा अद्भुत मिलाफ असणारे काशी शहर हा संपूर्ण मानवजातीसाठी एक अनमोल वारसा आहे.
वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन शहर मानले जाते. गेली अनेक शतके या शहरात लोकांनी सातत्याने वास्तव्य केले आहे. जगातील इतर अनेक प्राचीन शहरे साम्राज्यवादी आणि वसाहतवादी आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झाली असताना, काशी शहराने मात्र एका विशिष्ट ऊर्जेसह आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. आपल्या याच वैशिष्ट्यामुळे हे शहर खरोखर महत्त्वाचे आणि अद्वितीय ठरले आहे. या शहरावर अनेक रानटी हल्ले आणि आक्रमणे झाली. मात्र, आपला समर्थ वारसा जपणार्या या शहराने आपली सांस्कृतिक, कलात्मक आणि शैक्षणिक वैशिष्ट्यांसाठीची ओळख टिकवून सौहार्दाचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.
काशिविश्वनाथ धाम प्रकल्प हे अन्यायकारक भूतकाळातून तावून-सुलाखून अधिक समर्थ होण्याच्या पवित्र प्रतिज्ञेचे द्योतक आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर हा प्रकल्प म्हणजे या भूमीच्या प्राचीन आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सर्जनशील वारशाचे पुनरुज्जीवन करण्याचा एक विनम्र प्रयत्न आहे. या धामाच्या निमित्ताने इतिहासाने एक नवे वळण घेतले. हजारो वर्षे होत राहिलेला अन्याय कोणत्याही विनाशाशिवाय, लुटीशिवाय, सूड भावनेशिवाय दूर करून एखादे शहर पूर्ववत होण्याचा हा आजवरच्या इतिहासातील बहुतेक पहिलाच प्रसंग आहे. केवळ बांधकाम आणि निर्मितीच्या माध्यमातून हे साध्य झाले आहे.काशी शहर हे युगानुयुगे ‘मुक्ती देणारे शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. मुक्तीच्या शोधात असणारे सर्वजण काशीकडे आकर्षित होतात. खरेतर काशिविश्वनाथ धाम हा प्रकल्प म्हणजे काशीच्या मुक्तीचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दृष्टिकोनामुळे आणि प्रयत्नांमुळेच काशिविश्वनाथ मंदिराला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाले आहे.
काशिविश्वनाथ धाम हा अखिल मानवजातीसाठी उपयुक्त असा प्रकल्प आहे. कारण, तो संस्कृतीच्या निरंतरतेचा उत्सव आहे. या दृष्टिकोनातून पाहता, हा संपूर्ण जगासाठीचा प्रकल्प आहे, असे म्हणावे लागेल. या हिंदू मंदिरात भगवान ब्रह्मा-विश्वाचा निर्माता, भगवान विष्णू-विश्वाचा रक्षक आणि भगवान शिव-विश्वाचा मुक्तिदाता या त्रिमूर्तीचे अर्थात साक्षात ब्रह्ममूर्तीचे पूजन केले जाते. काशी हे भगवान शिवशंकराच्या विविध निवासस्थानांपैकी एक आहे. त्यामुळेही ते आदरास पात्र ठरते. हेच काशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महात्म्य आहे.
यावर्षीच्या संविधान दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “पिढ्यान्पिढ्या वसाहतवादाच्या बंधनात राहणे, ही भारतासाठी आणि जगातील अनेक देशांसाठी विवशता होती, अपरिहार्यता होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर जगभरात वसाहतोत्तर काळ सुरू झाला. अनेक देश स्वतंत्र झाले. आज जगातील कोणताही देश इतर कोणत्याही देशाची वसाहत म्हणून अस्तित्वात नाही. पण, यावरून वसाहतवादाची मानसिकता संपली, असा अर्थ काढता येणार नाही.”
हे लक्षात घेता, कित्येक पिढ्यांपासून वसाहतवादाला समर्थपणे तोंड देणार्या मानवतेने वसाहतवादाला झुगारणे, स्वतंत्र होणे आणि नव्या जोमाने आगेकूच करणे गरजेचे आहे.इतिहासावर एक नजर टाकली, तर इतर अनेक कारणांबरोबर लूट आणि विध्वंस ही वसाहतवादाची मुख्य उपकरणे आणि उद्दिष्टे, साधने आणि त्याबरोबर अंताची कारणे असल्याचे लक्षात येते. साहजिकच संपत्ती, ज्ञान आणि प्राचीनत्वाने समृद्ध असणार्या संस्कृती, हे अशा प्रकारच्या रानटी, विध्वंसक वृत्तीसाठी मोठेच आकर्षण होते.असो. तर आपण पुन्हा एकदा काशीमध्ये परतूया. पौराणिक आणि प्राचीन असे हे शहर सतत लुटीला बळी पडले. या शहरात झालेला विध्वंस आणि विनाश लक्षात घेतला, तर एकेकाळी हे शहर किती भव्य असेल, याची कल्पना येते. जगभरातील संग्रहालये आणि खासगी संग्रहांमध्ये विखुरलेल्या काशीच्या वैभवशाली पुरातन वास्तूंच्या नमुन्यांवरूनसुद्धा या शहराची भव्यता लक्षात येते.
काशी शहर, विशेषतः श्री काशिविश्वनाथ मंदिर भूतकाळात अनेकदा उद्ध्वस्त करण्यात आले आणि ते पुन्हा बांधले गेले. अगदी सुरुवातीच्या काळात घुरीद तुर्क सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने श्री काशिविश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते आणि गुजरातमधील एका व्यापार्याने ते पुन्हा उभारले.
१७८० सालापर्यंत या मंदिराचा विध्वंस आणि फेरउभारणी याचे चक्र सुरू राहिले. एका आख्यायिकेनुसार थोर मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांना स्वप्नात भगवान शिवशंकराचे दर्शन झाले आणि त्या भगवान शिवाच्या निस्सीम भक्त झाल्या. त्यानंतर त्यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. आणखी एका आख्यायिकेनुसार, या शहरावर झालेल्या हल्ल्याने महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार उचलण्यास भाग पाडले होते. असे म्हटले जाते की, औरंगजेबाने काशिविश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केल्याचे समजताच शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना इतका संताप आला की, त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सिंहगड हा किल्ला काबीज करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर काय झाले, ते सर्वश्रुत आहे.
मंदिर परिसराचे पुनर्निर्माण हे वसाहतवादाच्या प्रभावातून बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. इतकेच नाही, तर विध्वंसकतेच्या जागी सभ्यता जागृत करण्याचे, ज्ञानाच्या केंद्राची पुनर्स्थापना करण्याचे आणि क्रौर्याच्या जागी श्रद्धेची भावना जागृत करण्याचे हे मूर्तिमंत प्रतीक आहे. हा प्रकल्प म्हणजे सर्वतोपरी सुसंवाद निर्माण करून सर्जनशील दृष्टिकोनातून ही कौतुकास्पद उद्दिष्टे साध्य करण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. अखिल मानवजातीसाठी सखोल चिंतन-मनन आणि शक्य असल्यास अनुसरण करण्याचेही हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्या काशी शहराची अशीच भरभराट होत राहो, हे शहर समृद्ध होत राहो, हीच माझी सदिच्छा आहे. भगवान शिवशंकराचे दिव्य आणि तेजोमय आशीर्वाद आपणा सर्वांना लाभत राहो, अशी मंगलमय मनोकामना मी व्यक्त करतो.
अनुराग सिंह ठाकूर
(लेखक हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री आहेत.)