नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी दावा केला होता की, त्यांच्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा हाही दावा खोटा ठरला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसते आहे. कारण, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलांचे अकाउंट हॅक झाले असल्यचे कोणतेही पुरावे प्राथमिक तपासात सापडलेले नाहीत असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
हा तपास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) कडे सोपवण्यात आला होता. विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांबाबत विचारले असता प्रियंका गांधी वाड्रा यांनी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांना सांगितले होते की, “फोन टॅपिंग थांबवा, माझ्या मुलांचे इंस्टाग्राम खाते देखील हॅक केले जात आहेत. सरकारला दुसरे काही करायचे नाही का?" विशेष म्हणजे, प्रियांका गांधी यांचा दावा खोटा किंवा निराधार ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारला बदनाम करण्यासाठी प्रियांका गांधी यांनी सतत खोटे आरोप केले आहेत. २०२० मधला पाकिस्तानचा एक फोटो शेअर करत त्याचा संबध उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांशी जोडला होता. त्याचप्रमाणे उन्नावमधील बलात्कार प्रकरणांबाबतही त्यांनी खोटे दावे केले होते. तर एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मोदी सरकारवर भारतीय रेल्वे ही अदानी समूहाकडे सोपवल्याचा आरोप केला होता. फेसबुकने या पोस्टला 'भ्रामक' कंटेंट म्हटल्यानंतर ही पोस्ट हटवली होती. एवढेच नाही तर एकदा त्यांनी एका महिला अधिकाऱ्यावर गळा दाबून खाली ढकलल्याचा आरोप केला होता. जेव्हा यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला तेव्हा त्यांचे हे दावे खोटे निघाले.