मराठी उपनिषद - मनाचे श्लोक

    23-Dec-2021
Total Views | 296

ramdas swami.jpg_1

श्रीकृष्णाने सर्व उपनिषदरूपी गाईंचे दूध काढून ते भगवद्गीतेतून आम्हाला दिले आहे, तसाच प्रकार समर्थ रामदासांनी केलेला आहे. समर्थांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे, भक्तिमार्गाचे सार काढून ते आम्हाला मनाच्या श्लोकांतून दिले आहे. यासाठी पांगारकरांनी त्यांना मराठी भाषेतील ‘उपनिषद’ म्हटले आहे. अर्थात, त्यातील विचार, उपदेश हे उपनिषदांच्या तोडीचे आहेत. तो उपदेश शिवकालीन मराठी मनाने आदराने स्वीकारला.

रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहून सदाचरणाचा, सन्मार्गाचा, भक्तिमार्गाचा ‘राघवाचा पंथ’ सामान्य जनांना दाखवला. तो सर्वांसाठी आहे. त्याकाळी लोकजीवन अतिशय धामधुमीचे होते. अशावेळी आलेल्या संकटांचा सामना करीत आपले मन डगमगू न देता सदाचरणाने वागून समाधानी जीवन कसे जगता येईल, हे मनाच्या श्लोकांनी लोकांना शिकवले आणि जगण्याची उमेद दिली. समर्थ वाड्.मयाचे गाढे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी मनाच्या श्लोकांना मराठी भाषेतील ‘उपनिषद’ म्हटले आहे. गीतेचे महान तत्त्वज्ञान उपनिषदातून काढलेले सार आहे. कारण, ‘गीताध्यान’ या स्वाध्यायात म्हटले आहे की,सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंन्दन:।



म्हणजे श्रीकृष्णाने सर्व उपनिषदरूपी गाईंचे दूध काढून ते भगवद्गीतेतून आम्हाला दिले आहे, तसाच प्रकार समर्थ रामदासांनी केलेला आहे. समर्थांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे, भक्तिमार्गाचे सार काढून ते आम्हाला मनाच्या श्लोकांतून दिले आहे. यासाठी पांगारकरांनी त्यांना मराठी भाषेतील ‘उपनिषद’ म्हटले आहे. अर्थात, त्यातील विचार, उपदेश हे उपनिषदांच्या तोडीचे आहेत. तो उपदेश शिवकालीन मराठी मनाने आदराने स्वीकारला. स्वामींचे महंत भिक्षेच्या वेळी मनाचे श्लोक म्हणत असत. त्यामुळे त्यांचा प्रसार सहजपणे लोकांत होत असे. तथापि, हे विचार महाराष्ट्राबाहेर गेले, तेव्हा तेथील विचारवंतांनी मनाच्या श्लोकांची वाहवा केली आहे. समर्थ वाड्.मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक शंकरराव देव यांनी अनेक रामदास मठांना भेटी देऊन तेथून मिळेल ते समर्थ वाड्.मय जमा केलेले आहे. धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात आजही ते पाहायला मिळते. त्यातील काही बाडे अजून प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहेत, असे ऐकले आहे. समर्थकालीन संदर्भ, महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे जमा करण्याचे प्रचंड काम देवांनी केले आहे. समर्थांनी ज्या ज्या स्थळांना भेटी दिल्याची माहिती होती किंवा शक्यता होती, त्यापैकी बर्‍याच ठिकाणांना देवांनी भेटी दिल्या होत्या व कागदपत्रे जमा केली होती. एकदा दक्षिणेकडील मौनी स्वामींच्या मठाला भेट देण्यासाठी जात असताना वाटेत त्यांना आचार्य रमण महर्षींचा आश्रम लागला. तेथे काळी वेळ थांबून ते रमण महर्षींना भेटले. त्यांच्याशी चर्चा करीत असताना समर्थ रामदास स्वामींचा विषय निघाला. आचार्यांना समर्थ रामदासांच्या वाड्.मयाविषयी उत्सुकता होती. रमण महर्षी संस्कृतचे व्यासंगी होते. त्यामुळे त्यांनी देवांना विचारले की, “समर्थ रामदासांची काही संस्कृत रचना आहे का?” योगायोगाने शंकरराव देवांजवळ त्यावेळी मनाच्या श्लोकांची संस्कृत समश्लोकी होती.



ती त्यांनी आचार्यांना दिली. (संदर्भ - के. वि. बेलसरे यांची मनाचे श्लोक या पुस्तकाची प्रस्तावना), देवांनी आचार्यांना सांगितले की, ‘मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी मराठी भाषेत केली आहे. ही त्यांची संस्कृत समश्लोकी, मूळ श्लोक मराठीत आहेत.’ काही अभ्यासकांच्या मते, शंकरराव देव यांच्या जवळ त्यावेळी मनाच्या श्लोकांचे इंग्रजी भाषांतराचे पुस्तक होते, ते त्यांनी रमण महर्षींना दिले. शंकरराव देवांनी आचार्यांना दिलेले पुस्तक संस्कृतात असो वा इंग्रजीत असो, त्याने फारसा फरक पडत नाही. एवढे मात्र नक्की की, समर्थांचे मूळ मराठीतील मनाच्या श्लोकांतील विचार रमण महर्षींकडे भाषांतराच्या स्वरूपात पोहोचले. नंतर शंकरराव देव मौनी स्वामींच्या आश्रमाकडे रवाना झाले. तेथील आश्रम, समाधी वगैरे पाहून परतीच्या प्रवासात देव पुन्हा रमण महर्षींना भेटले. त्यावेळी आचार्य, शंकरराव देवांना म्हणाले, “अहो, काय अप्रतिम ग्रंथ आहे हा! हे मनाचे श्लोक म्हणजे समर्थांच्या लेखणीतून निघालेले दिव्य रत्न आहे. हे श्लोक मुखोद्गत करून त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास सहजच कल्याण होईल. ही समर्थांची अप्रतिम वाणी आहे.” असं म्हणतात की, आचार्यांनी त्यावेळी पुढील श्लोकाचा उल्लेख केला.
देहेबद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी।
विवेके तये वस्तुची भेटि घ्यावी।
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे।
म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें॥


आणि देवांना म्हणाले, “हा श्लोक तुम्ही पाठ करून त्यावर सतत मनन-चिंतन करून तसे वागाल तर तुमचे कल्याण होईल.” आचार्य रमण महर्षींसारख्या विद्वानाने मनाच्या श्लोकांना ‘दिव्यरत्न’ म्हणून संबोधले आहे. आपण मात्र मराठी भाषा जाणत असूनही मनाचे श्लोक अभ्यासत नाही. मनाच्या श्लोकांचा अभ्यास ही तर दूरची गोष्ट, मनाच्या श्लोकांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. आजही आम्ही मनाच्या श्लोकांना एकतर धार्मिक आच्छादन लावतो किंवा ते लहान मुलांना पाठ करण्यासाठी लिहिले आहेत, असे समजतो. आम्हाला कल्पनाही नाही की, मानसशास्त्रज्ञ, मनोविकारतज्ज्ञ यांच्या संभाषणात मनाच्या श्लोकांचा उपयोग करतात. या डॉक्टरांना मनाच्या श्लोकांची उपयुक्तता कळली आहे.मनाचे श्लोक हे ‘मनोबोधाचे श्लोक’ म्हणूनही ओळखले जातात. गुरू-शिष्यांचा संवाद हा जसा ‘दासबोध’, तसा मनाने मनाशी केलेला संवाद म्हणून हा ‘मनोबोध.’ ‘मनोबोध’ या उचित शब्दाचा प्रयोग ‘मनोबोधा’च्या आरतीत केला गेला आहे. ती आरती अशी आहे-

 
वेदांचे जें गुत्य शास्त्रांचे जें सार।
प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार।
कर्म उपासना ज्ञान गंभीर।
ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर।
जयदेव जयदेव जय मनोबोधा।
पंचप्राणे आरती तुज स्वात्मशुद्धा।



मनाच्या श्लोकांच्या या आरतीत त्यांना ‘मनोबोध’ म्हटले आहे. तथापि, समर्थ रामदास मात्र त्यांना ‘मनाची शते’ असे म्हणतात. शेवटच्या फलश्रुतीच्या श्लोकात समर्थांनी हा शब्द वापरला आहे.



‘मनाची शते’ ऐकता दोष जाती। 
मतीमंद ते साधना योग्य होती।



या श्लोकांना ‘मनोबोधाचे श्लोक’, ‘मनाची शते’ अशी जरी नावे असली तरी ते ‘मनाचे श्लोक’ या नावानेच प्रसिद्ध आहेत. आतापर्यंतच्या विवेचकांनी मनाच्या श्लोकांतील आधात्म्यपर अर्थावर भर दिला आहे. आजकालच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात सर्वसाधारण माणूस आध्यात्माचा फारसा विचार करीत नाही. आध्यात्माशी आमचा संबंध नाही, असे जरी म्हटले तरी आमचा संबंध मन:शांतीशी आहे, मनाच्या एकाग्रतेशी आहे, समाधानाशी आहे, हे आपण नाकारू शकत नाही. त्याशिवाय या धकाधकीच्या जीवनात आम्हाला पुढे जाता येणार नाही. शुद्ध आचाराशिवाय आमचे समाधान टिकणार नाही. मनाच्या श्लोकातील उपदेशांचा संबंध आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. म्हणून ते श्लोक नीट समजून घेणे अगत्याचे आहे. स्वामी दासबोध अभ्यासाबाबत सांगतात-

 
वीस दशक दोनशे समास।
साधके पाहावे सावकाश।
विवरता विशेषाविशेष। कळो लागे॥


 
ते मनाच्या श्लोकांनाही लागू आहे. त्यांचा सावकाश अभ्यास करून मनन, चिंतनाने त्यातील ‘विशेषाविशेष’ समजून दैनंदिन जीवनात त्यांचा फायदा करून घेता येईल. (क्रमश:)
सुरेश जाखडी


अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121