मुंबई : विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) भारतात तबलिगी जमातवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांना पाठिंबा देणार्या दारुल उलूम देवबंद आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. विहिंपने जारी केलेल्या पत्रकात तबलीगी, तबलिगी जमात आणि इज्तिमावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनीही सौदी अरेबियाने तबलिगी जमातवर घातलेल्या बंदीचे समर्थनदेखील केले.
तबलिगी जमात आणि निजामुद्दीनचा मरकझ हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी संकट असल्याचेही आलोक कुमार यांनी म्हंटले आहे. त्यांना इस्लामिक कट्टरतावादाचा कारखाना आणि दहशतवादाचे पुरस्कर्ते असल्याचे सांगत त्यांच्यावर भारतात संपूर्ण बंदी घालण्याची मागणीही केली.
पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, "रशियानेही तबलिगी जमातच्या कृत्यांमुळे त्यांच्यावर बंदी घातली. दारुल उलूम हे देवबंदमधील तबलीगी जमातचे जन्मस्थान आहे. १९२६मध्ये निजामुद्दीनपासून सुरू झालेल्या तबलिगी जमातने मेवात प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्यात यश मिळवले. सध्या १०० देश आणि करोडो लोकांना याची लागण झाली आहे. भारताच्या सर्व भागात मशिदी आणि मदरशांमध्ये सापडलेली शस्त्रे आणि दहशतवादी हे कुठेतरी तबलिगी जमातच्या पसरलेल्या विचारसरणीचे परिणाम आहेत."
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "निजामुद्दीन मरकझमध्ये वहाबी विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते. निजामुद्दीनमधून निघून गेल्यावर अनेकांनी जगभर कट्टरता पसरवली. इज्तिमा, मशिदी आणि मदरशांमध्ये या बैठका होतात. जगातील सर्व दहशतवादी पक्ष तबलिगी जमातशी संबंधित लोकांनी सुरू केल्या आहेत. मरकझ निजामुद्दीनचा संबंध भारतातील स्वामी श्रद्धानंद यांच्या हत्येशी, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापासून गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेशी आहे."