नवी दिल्ली : झारखंडची राजधानी रांचीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. मुकेश सोनी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. १५ डिसेंबरला बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मारेकरी कोण आहेत? याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
मुकेश हे विहिंपच्या खलारी विभागाचे अध्यक्ष होते. ते ३८ वर्षांचे होते. खलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅकक्लस्कीगंज येथून दागिन्यांचे दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्थानिकांनी मुकेशला डाक्रा सेंट्रल रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळी झाडल्यानंतर त्याने घरातील सदस्यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. मुकेश सोनी यांनी त्यांच्या पत्नीला फोनवरून या घटनेची माहिती दिली होती. यादरम्यान ते बोलत असताना बेशुद्ध पडले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. खलारीचे पोलिस उपअधीक्षक अनिमेश नाथानी आणि एसएचओ खलारी फरीद आलम यांनी लोकांकडून घटनेची माहिती घेतली.
भाजपचे खासदार संजय सेठ यांनी यावर चिंता व्यक्त करताना म्हंटले की, "झारखंडला केरळ आणि पश्चिम बंगालसारखे बनवण्याचे षडयंत्र आहे. येथे भाजप आणि संघ विचार परिवारातील लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे.