‘इचिबान’- परभाषेच्या पुरस्कर्त्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2021   
Total Views |

Nashik_1  H x W
 
 
नाशिकमध्ये सर्वप्रथम जपानी भाषेची कवाडे खुली करून देणाऱ्या चारुता संगमनेरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
एखाद्या क्षेत्राकडे आपण कधीकधी अगदी योगायोगाने वळतो आणि नंतर आयुष्यातला तोच सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ठरतो. असेच काहीसे घडले जपानी भाषेचे शिक्षण नाशिकमध्येसर्वप्रथम सुरू करणाऱ्या चारुता संगमनेरकर नायर यांच्याबाबतीत...
मूळच्या विज्ञान शाखेच्या पदवीधर व एमबीए असणाऱ्या चारुता यांचा त्यांच्या आईसोबत ‘नताशा इंडस्ट्रीज’ या नावाने एक लघुउद्योग होता. या उद्योगासाठी लागणारी मशिनरी जपानची, त्यासोबत आलेले माहितीपत्रक वाचणे व तिथल्या सूचना समजून घेण्यासाठी जपानी भाषेचे जुजबी शिक्षण घ्यावे, असा विचार त्यांनी केला आणि तिथूनच नव्या भाषेचं एक नवीन दालन त्यांच्यासाठी समोर आलं. प्रारंभी केवळ स्वतःसाठी म्हणून जपानी भाषा शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. पण, मुळातच शालेय शिक्षणात असलेल्या भाषांव्यतिरिक्त फ्रेंच भाषेचे देखील शिक्षण घेतलेले असल्यामुळे भाषा शिक्षणाविषयी त्यांना गोडी होतीच. जपानी भाषेने चारुतांचे लक्ष वेधून घेतले व त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. आजपासून साधारण २०-२२ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये जपानी भाषेचे शिक्षण देणारे कोणी नव्हते. तसेच ही भाषा शिकण्यासाठी पुणे-मुंबईला जाणे दरवेळी प्रत्येकालाच शक्य होणारे नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेऊन जपानी भाषेच्या शिक्षणासाठी चारुतांकडे विचारणा होऊ लागली. शिक्षणासाठी येणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या कायमच अधिक होती.
 
जपानी माणूस त्याच्या भाषेसाठी विलक्षण आग्रही असतो. त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने जपानला जाणाऱ्यांसाठी देखील या भाषेचा अभ्यास आवश्यक ठरतो. कार्यालयीन स्थळी संभाषण साधताना दुभाषांची मदत होत असली, तरी बाजारपेठांमध्ये किंवा सामान्य जपानी माणसाशी दैनंदिन व्यवहारा-दरम्यान संवाद साधणे चारुतांनी आखलेल्या संभाषणासाठीच्या विशेष कोर्समुळे सहज शक्य होत गेले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे.
 
फ्रेंच भाषेच्या शिक्षणासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कल अधिक असला, तरी जपानी भाषेसाठी सहसा असे होताना दिसून येत नाही. इतर भाषांपेक्षा ही भाषा तुलनेने क्लिष्ट आहे. तिची लिपी वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे जपानी भाषा शिकायला सुरुवात केली, तरी सगळेच या भाषेचे शिक्षण पूर्ण करत नाहीत. चिकाटी, ध्यास, ध्येयाप्रती निष्ठा हे गुण कुठल्याही शिक्षणासाठी आवश्यक असतात. परकीय भाषा आत्मसात करताना मात्र त्यांच्यासोबतीने भाषेवर, शब्दांवर प्रेम असणे, हाही गुण उपयुक्त ठरतो, असे चारुता आवर्जून सांगतात.
 
नव्या प्रदेशात जाताना तिथल्या भाषेचे ज्ञान असेल, तर मुळात परकेपणा न वाटता आपला वावर आत्मविश्वास पूर्ण होतो. नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढत जातात. आपल्या व त्यांच्या संस्कृतीतील फरक व साम्य स्थळे लक्षात येतात. मूल्यांविषयीची देवाणघेवाण करणे सोपे होत जाते. नव्या प्रांतातील, देशातील भौगोलिक-सामाजिक जडणघडणीचे पैलू अधिक आत्मीयतेने उलगडतात आणि त्याचबरोबरीने आपल्यालासुद्धा देशाकडे अधिक समजुतीने व प्रगल्भपणे पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. ही मते व्यक्त करताना चारुता त्यांना जपानमधील वास्तव्यादरम्यान आलेले अनेक सुखद अनुभव सांगतात. निसर्गाला, ऋतूंना, बुद्धाला, गणपतीला दैवत मानणारा जपानी माणूस ऋतू बदलताना त्याचा सोहळा साजरा करतो. स्वच्छतेप्रती अतिशय जागरूक, संयमी, तसेच आपल्या देशात येणाऱ्या पाहुण्यांसाठी ’अतिथी देवो भव’ केवळ शब्दात न म्हणता, तशी कृती करणाऱ्या, संपूर्ण देशालाच आपले घर मानणाऱ्या व देशाप्रती असणाऱ्या कर्तव्यांबाबतीत सजग असणाऱ्या जपानी लोकांविषयी त्या भरभरून बोलतात. २००३ पासून चारुता नाशिकमध्ये ’इचिबान’ या नावाने त्या जपानी व फ्रेंच भाषेचे शिकवणी वर्ग चालवतात. ‘इचिबान’ म्हणजे ’सर्वप्रथम.’ नाशिकमध्ये अशा पद्धतीने जपानी भाषेचे प्रशिक्षण देणारी पहिली महिला म्हणून त्यांचे कौतुक होतेच व चारुता यांना त्यांच्या या कार्यासाठी सन्मानित देखील करण्यात आले आहे. जिद्द, एकाग्रता, समजूतदारपणा हे गुण एक महिला म्हणून आपल्यात होते. त्यामुळे परक्या देशात, परक्या भाषेतील बारकावे आत्मसात करणे आपल्याला सहज साध्य झाले, तसेच भाषा शिकवण्यासाठी देखील हे गुण महत्त्वाचे आहेत, असे त्या सांगतात.तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच जग जवळ येत असून भाषांतराच्या क्षेत्रात देखील अनेक नवनव्या संधी निर्माण होत आहेत. संवादाची आवश्यकता कायमच असली, तरी बदलत्या जगानुसार तिची परिमाणे बदलत आहेत. भाषांतरकार किंवा दुभाषी म्हणून असणाऱ्या कार्याची व्याप्ती आता विस्तारली आहे.
 
‘गुगल’सारख्या सर्च इंजिनने कुठलीही भाषा, त्यातले शब्द, परिच्छेद क्षणार्धात आपल्याला हव्या त्या भाषेत भाषांतरित करून देण्याची सोय केलेली आहे. तरीही दुभाषांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. कारण, तंत्रज्ञान पर्यायी शब्द देऊ शकले तरी वाक्यरचना, व्याकरण समजून घेत भावनांपर्यंत पोहोचण्यासाठी शब्दांना मानवी स्पर्श आवश्यक ठरतो. याच भावनेतून चारुता यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@