मुंबई : भारतीय संघाने अफगानिस्तानवर विजय मिळवत आयसीसी टी २० विश्वचषकच्या उपांत्य फेरीच्या अशा अद्याप पल्लवित ठेवल्या आहेत. जरी भारताला दुसऱ्या संघांच्या सामन्यांवर अवलंबून राहावे लागतं असले तरीही भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. मात्र, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राशीद खानने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने सांगितले की, 'भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार'.
राशीद खानने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, "भारताविरुद्ध पराभवामुळे संघावर जास्त परिणाम होईल असे मला वाटत नाही. भारत हा सर्वोत्तम संघांपैकी एक आहे हे आम्हाला माहीत आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना आमच्यासाठी उपांत्यपूर्व फेरीचा ठरू शकतो. आम्ही त्याच पद्धतीने तयारी करू आणि त्याच मानसिकतेने जाऊ. आम्ही जिंकलो तर चांगल्या धावगतीच्या आधारे आम्ही उपांत्य फेरी गाठू शकतो. खेळाचा आनंद घेतला तरच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. आम्ही आमच्या खेळाचा पुरेपूर आनंद घेऊ."
सध्या ग्रुप बीमध्ये पाकिस्तान संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सलग ४ सामने जिंकून त्यांनी तिकीट पक्के केले आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी ३ संघामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. ग्रुपमधील दुसऱ्या संघासाठी न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि भारत असे ३ संघ स्पर्धेत आहे. अफगाणिस्तान हा +१.४८१ रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. +०.८१६ रनरेटसह न्यूझीलंड हा तिसऱ्या स्थानी आहे. तर, भारत +०.०७३ रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघासाठी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा विजयी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सामना भारतीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.