चिन्यांना भारताचा तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |

india and china_1 &n


काही आठवड्यांपूर्वी भारतीय आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच ‘एलएसी’वर कित्येक तास एकमेकांविरोधात आमने-सामने उभे ठाकले होते. दोन्ही देशांतील वादाचा मुद्दा, १७ हजार फूट उंचावरील शिखरावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. कारण, या शिखरावर जो देश नियंत्रण प्राप्त करेल, त्या देशाच्या लष्कराला सीमेच्या दोन्ही बाजूला ‘कमांडिंग व्ह्यू’ मिळेल. मात्र, भारतीय लष्कराने अगदी सुरुवातीपासूनच या शिखरावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे.




दरम्यान, सीमेच्या दोन्ही बाजूला ‘कमांडिंग व्ह्यू’चा अर्थ, भारतीय लष्कर या शिखरावरून चिनी लष्कराचे अतिक्रमण उधळून लावेलच. पण, ते काम वेळेआधीच फत्ते करू शकेल. उंचावरील ठिकाणांवर नियंत्रणाचे सामरिक महत्त्व भारताला १९८४ सालच्या सियाचिन युद्धात आणि १९९९ च्या कारगील युद्धात समजले होते. तर एका बड्या लष्करी अधिकार्‍याच्या मतानुसार, हजारो फूट उंचावरील ठिकाणांवर बसलेल्या शत्रूने खाली एखादा दगड जरी फेकला, तरी तो बंदुकीच्या गोळीप्रमाणेच काम करेल.




उंचावरील ठिकाणांचे हेच महत्त्व ओळखून अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चिनी लष्कराचा या शिखरावर कब्जा करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला, तसेच त्या शिखरावरील आपले नियंत्रण अधिक मजबूतही केले. चिन्यांच्या अशा कुरापतींमुळे भारतीय लष्कराचा कोणत्याही व्यापक संघर्षाआधीच सराव होतो, असे म्हणता येते. तसेच यामुळे चिनी लष्करातील जवान मारच खात नाहीत, तर भारतीय लष्कर आपल्या सुरक्षा आणि व्यूहात्मक रचनेला अधिकच प्रभावी करतात. गलवान संघर्षावेळीही भारतीय लष्कराने व्यूहात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या ‘ब्लॅक टॉप’वर नियंत्रण मिळवले होते. दरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) अरुणाचल प्रदेशातील ‘एलएसी’जवळील १७ हजार फूट उंचावरील शिखरावर ताबा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आताच्या तणावावेळी ‘पीएलए’ने तवांगपासून ३५ किमी उत्तर-पूर्वेतील यांग्त्सेनामक परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाने त्यांना तोंडघशी पाडले. चिनी जवान शिखरावर पोहोचणार्‍या मार्गांपैकी एकाच्या जवळ आले होते. परंतु, भारतीय लष्कराने चिन्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. आता हिवाळ्यामुळे हा प्रदेश बर्फाने आच्छादला असून मार्चपर्यंत याच स्थितीत राहील.







दरम्यान, या शिखरस्थानाचे व्यूहात्मक महत्त्व इतके आहे की, भारतीय लष्कर आणि ‘पीएलए’, दोघांनीही यांग्त्से परिसरातील दोन्ही बाजूला तीन हजार ते ३ हजार ५०० जवानांना सुरक्षेसाठी तैनात केले आहे. या परिसरावर ड्रोनने लक्ष ठेवले जात असून सेन्सरद्वारे वास्तव प्रतिमाही मिळवल्या जातात. तसेच गस्ती पथकांचा सामना करण्यासाठी दोन्ही बाजूकडे ‘एलएसी’जवळ रस्ते आणि अन्य मार्गांचे जाळेही आहे. १७ हजार फुटांवरील हे शिखर ‘एलएसी’च्या पलीकडे तिबेटचे ‘कमांडिंग’ दृश्य प्रदान करते. भारतीय लष्कराने शिखराच्या शीर्षस्थानी आणि चिनी जवानांच्या तिथे पोहोचण्याजोग्या मार्गांवर नियंत्रण मिळवलेले आहे. यांग्त्से परिसरदेखील या शिखराच्या व्यापक ‘कमांडिंग व्ह्यू’चा भाग असून त्याला लष्करी भाषेत ‘मागो-चुना’ म्हणतात. तिबेटमधून भारतात वाहणारी नूरानांग नदीदेखील या पर्वताच्या जवळच आहे.





दरम्यान, गस्ती पथके वर्षभर अनेकदा एकमेकांसमोर येतात. कारण, चीनमधील साम्यवादी आणि साम्राज्यवादी शासनप्रणाली या ठिकाणाचे व्यूहात्मक महत्त्व पाहता ते बळकावण्याचे आदेश देत असते. पण, भारतीय लष्कराच्या शौर्यासमोर त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागते. शिवाय चोप मिळतो तो वेगळाच! या शिखराचे इतके महत्त्व आहे की, हे शिखर चीनच्या संदर्भाने भारतासाठी लडाखमधील सियाचिन शिखराप्रमाणे काम करू शकते. चीनलादेखील याची जाणीव आहे आणि म्हणूनच तो देश १७ हजार फुटांवरील हे शिखर मिळवण्याकडे डोळे लावून असतो. मात्र, इथले समीकरण भारताच्या बाजूने झुकलेले राहण्यासाठी भारतीय लष्कर सदैव तत्पर आहे. परंतु, चीनच्या निरंकुश सत्ता, वर्चस्व आणि साम्राज्यवादी लष्कराला धडा शिकवण्याचीदेखील नितांत आवश्यकता आहे.






- महेश पुराणिक




@@AUTHORINFO_V1@@