मुंबई : भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना हा अनिर्णीत राहिला. शेवटच्या दिवशी अवघ्या एका विकेटसाठी भारतीय संघाला झगडावे लागले. मात्र, कानपूर कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने हरभजन सिंगचा सर्वाधिक ४१७ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडीत काढला.
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे हा ६१९ विकेट्स घेत पहिल्या स्थानी तर, कपिल देव यांच्या नावावर ४३४ विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानी आहेत. यानंतर आता आर अश्विनच्या नावावर ४१८ विकेट्स जमा आहेत. तर आता हरभजन सिंगच्या नावावर ४१७ विकेट्स आहेत. टॉम लॅथमची विकेट घेत आर अश्विनने हा विक्रम आपल्या नावावर केला. ८० सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम केला आहे. अश्विनने २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली होती. १० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने टीम इंडियाला अनेक मोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.