‘इंकाची देवदरी’ : हरवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2021   
Total Views |

inkachi _1  H x
जगाच्या विविध भागांमध्ये विविध कालखंडांमध्ये सुमेरियन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन, माया इत्यादी अनेक संस्कृती विकसित झाल्या आणि बघता बघता काळाच्या उदरात गडपदेखील होऊन गेल्या. रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांच्यासोबतच परकीय आक्रमणे हेदेखील अनेक संस्कृतींच्या ऱ्हासाचे कारण ठरले. स्पेनच्या ख्रिस्ती आक्रमकांमुळे पूर्णपणे नष्ट झालेली अशीच एक दुर्दैवी संस्कृती म्हणजे ‘इंका संस्कृती.’ इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत वैभवाच्या शिखरावर असलेल्या या संस्कृतीविषयी ठोस म्हणावी अशी माहिती आज फार कमी उपलब्ध आहे. ‘इंकाची देवदरी’ या पुस्तकामधूनया संस्कृतीच्या अवशेषांवर आणि त्यांच्याभोवतीच्या गूढतेच्या आवरणावर डॉ. संदीप श्रोत्री यांनी प्रकाश टाकला आहे.
 
 
डॉ. श्रोत्री यांनी आपल्या दक्षिण अमेरिकेच्या भटकंतीदरम्यान पेरू देशात असणाऱ्या ‘इंका’ संस्कृतीशी संबंधित शहरे आणि गावांना भेट दिली. त्या प्रवासाचा सविस्तर वृत्तांत प्रस्तुत पुस्तकामध्ये दिला आहे. पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये ‘इंका’ साम्राज्याची राजधानी कुझ्को शहर, दुसऱ्या विभागामध्ये ‘इंका’ संस्कृतीतील तीर्थक्षेत्र असणारे माचूपिच्चू शहर आणि तिसऱ्या विभागामध्ये ‘इंका’कालीन कला आणि जीवनशैली जपणारी काही गावे अशा ठिकाणच्या भ्रमंतीचे वर्णन आहे.
‘इंका’ संस्कृतीही दक्षिण अमेरिका खंडाच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरलेली एक अतिशय प्रगत, वैभवशाली संस्कृती होती. इथले राज्यकर्तेच नव्हे, तर सामान्यजनही अक्षरशः सोन्यामध्ये लोळणारे होते, इतके मुबलक सोने इथे होते. शिल्पकला, शेती, सिंचन, स्थापत्त्यशास्त्र अशा विषयांमध्ये त्यांनी विलक्षण प्रगती केली होती. परंतु, त्यांना चाकाचा शोध आणि लोखंडाचा शोध लागलेलाच नव्हता, ही गोष्ट विलक्षण आश्चर्यकारक आहे. या दोन्ही गोष्टी नसूनही ‘इंका’ लोकांनी केलेली प्रगती तोंडात बोटे घालायला लावणारी, तर आहेच; पण या संस्कृतीबद्दल गूढ निर्माण करणारीही आहे.
एकेश्वरवादी संस्कृतींनी जग पादाक्रांत करण्याअगोदर जगभरच्या संस्कृती प्रामुख्याने निसर्गपूजक होत्या. आपल्या दृष्टीला दिसणाऱ्या, परंतु त्यांच्या अस्तित्वाचा कार्यकारण भाव समजू न शकणाऱ्या निसर्गातल्या अनेक गोष्टींचे त्या त्या संस्कृतींमधल्या लोकांनी लावलेले अर्थ जाणून घेणे रंजक असते. चंद्रसूर्य असोत वा आजूबाजूचे प्राणीपक्षी असोत, त्यांचे अस्तित्व लोकांच्या सुखदु:खांशी, शकुन-अपशकुनांशी जोडले जाते. ‘इंका’ संस्कृतीवरही निसर्गातल्या अनेक गोष्टींचा प्रभाव आहे. राजधानी असणाऱ्या कुझ्को शहराची रचना बसलेल्या अवस्थेत असलेल्या ‘प्युमा’ या मार्जारकुळातील प्राण्याच्या आकारात केली गेली आणि त्याच्या विविध अवयवांपाशी त्या शहरातल्या प्रमुख वास्तू/जागा साकारल्या गेल्या आहेत (उदा. हृदयाच्या ठिकाणी असलेला ‘विजय चौक’). ‘काँडोर’ हा जटायूसारखा पक्षी, ‘लामा’ आणि ‘अल्पाका’ मेंढ्या यांचाही या संस्कृतीवर खोल प्रभाव आहे, हे इथल्या वास्तूंवर कोरलेली चित्रे आणि त्या वास्तूंच्या रचना यांमधून दिसते.
 
 
डॉ. श्रोत्री यांच्या लेखनातून सातत्याने येणारी गोष्ट म्हणजे ‘इंका’ संस्कृतीतल्या वास्तूंचे ग्रहताऱ्यांच्या स्थितीशी असणारे नाते. पाषाणांमध्ये घडवलेली येथील सूर्यमंदिरे, निवासस्थाने, एवढेच काय तळघरेही विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी आकाशातल्या सूर्याचा प्रकाश कसा पडतो, याचा अचूक अभ्यास करून साकारली गेलेली आहेत. त्यावरून ‘इंका’ लोकांचा ग्रहताऱ्यांच्या स्थितीशी असणारा हा अभ्यास त्यांच्या ज्ञानपरंपरेबद्दलही सांगून जातो.
दक्षिण अमेरिकेतल्या आधीच्या उज्ज्वल संस्कृतींचे संचित घेऊन उभ्या राहिलेल्या ‘इंका’ संस्कृतीने वैभवाचे सर्वोच्च शिखर गाठलेले असतानाच स्पॅनिश आक्रमकांची टोळधाड तिथे येऊन थडकली. इ. स. १५३२ मध्ये क्रूरकर्मा स्पॅनिश सरदार फ्रान्सिस्को पिझारो याने कपटाने ‘इंका’ राजाचा पराभव केला. बंदुका, घोडे यापैकी काहीही आधी न पाहिलेले ‘इंका’ सैनिक भयचकित होऊन अतिशय तुरळक स्पॅनिश सैनिकांसमोर फिके पडले. बघता बघता ‘इंका’ साम्राज्य कोसळले. कोलमडलेल्या ‘इंका’ जनतेचे सक्तीने धर्मांतर केले गेले आणि ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, त्यांच्या हत्या केल्या गेल्या. सर्वत्र नासधूस केली गेली, सोन्याची प्रचंड लूट झाली, अगदी थडगीही या तडाख्यातून सुटली नाहीत.
‘इंका’ संस्कृतीला लेखनकला अवगत नसल्याने त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नव्हते. त्यामुळे ‘इंका’ साम्राज्याचा पाडाव झाल्यावर त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रसारच खुंटला. ‘इंका’ संस्कृती जपणारे लोकच राहिले नाहीत. स्पॅनिश बखरकारांनी त्यांच्या आकलनानुसार ‘इंका’ संस्कृतीबद्दल जे काही लिहून ठेवले आहे, त्यातूनच ‘इंका’ संस्कृतीचा थोडाफार अभ्यास होऊ शकतो. अकल्पित वेगाने झालेल्या एवढ्या प्रगत संस्कृतीच्या पतनाबाद्दल वाचताना एकीकडे वाईट वाटत असताना अशा अनेक आक्रमणांना चिवटपणे तोंड देत टिकून राहिलेल्या हिंदू संस्कृतीबद्दल आदरही वाटत राहतो.
लेखनकला अवगत नसली, तरीही दोऱ्यांना त्यांना विशिष्ट प्रकारे गाठी मारून त्यामार्फत संदेशवहन करण्याची कला ‘इंकां’ना अवगत होती. ही एक प्रकारची लिपीच होती, हे कळल्यावर ‘इंका’ संस्कृतीविषयीचे कुतूहल द्विगुणित होते. दुर्दैवाने या गाठींच्या लिपीची आजही फारशी उकल होऊ शकलेली नाही. त्यामुळे ‘इंका’ संस्कृतीचे गूढ उलगडणे अवघड झाले आहे. उत्खननात मिळालेल्या या गाठीच्या दोऱ्यांचे छायाचित्र आणि आकृत्याही पुस्तकात पाहायला मिळतात.
 
पुस्तकामध्ये डॉ. श्रोत्री यांनी विविध ठिकाणांची जी वर्णने केली आहेत, त्यामध्ये अतिप्रचंड शिलाखंड वापरून केलेली बांधकामे सातत्याने डोकावतात. विशिष्ट आकारात घडवलेले पाषाणखंड एकमेकांमध्ये अडकवून केलेले हे बांधकाम अनेक शक्तिशाली भूकंपांना पुरून उरले आहे. हे प्रचंड दगड उंच डोंगरकुशीत वसलेल्या माचूपिच्चूसारख्या ठिकाणी कसे नेले असतील, हे कोडेच आहे. स्पॅनिश लोकांच्या तावडीतून हे माचूपिच्चू ‘इंकां’चे पवित्र शहर आश्चर्यकारकरित्या वाचल्याने आज तिथे ‘इंकां’नी केलेली बांधकामे सुस्थितीत बघता येतात. परंतु, बहुतांश बांधकामांचे उद्देशच आज सांगता येऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘इंका’ संस्कृतीवरचा गूढतेचा पडदा अधिकच गडद होतो.
 
डॉ. श्रोत्री यांच्या मनामध्ये जाग्या असलेल्या कुतूहलामुळे ‘इंका’ संस्कृतीतील अनेक गोष्टींबाबत त्यांनी ‘टूर गाईड’ला विचारून, तसेच स्वतः अभ्यास करून माहिती गोळा केली आहे. आपल्या अनुभवांना स्वतः काढलेल्या उत्तम छायाचित्रांची जोड दिल्याने ‘इंका’ संस्कृतीची भव्यता, गूढता वाचकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचण्यास मदत झाली आहे. पुस्तकाची मांडणीही आकर्षक आहे. एका हरवलेल्या वारशाकडे वाचकाला आकर्षित करण्यामध्ये पुस्तक यशस्वी ठरले आहे.
 
पुस्तकाचे नाव : ‘इंका’ची देवदरी
लेखकाचे नाव : डॉ. संदीप श्रोत्री
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या : १५६
मूल्य : २८० रुपये
@@AUTHORINFO_V1@@