पाकी-अफगाणी दहशतवाद्यांची पिलावळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |
pak _1  H x W:



‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे ह १३वे वर्ष. या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही मुंबई विसरलेली नाही. कट्टरतावादाला खतपाणी घालून दहशतवाद्यांची फौज जन्माला घालणार्‍या पाकिस्तानवर मात्र आजही जरब बसलेली नाही.
 
 
यावेळी निमित्त आहे ते म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे पुन्हा सक्रिय होणे. याला कारणही तालिबानच! तालिबानने बळकावलेला अफगाणिस्तान आता दहशतवादाला आंदण असेल. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या खैबरपख्तुनख्वामध्ये दहशतवाद्यांनी आपले अड्डे तयार केले आहेत.
 
 
हजारो दहशतवाद्यांना तिथे प्रशिक्षण दिले जाते. आता त्यांना ‘हक्कानी नेटवर्क’ आणि ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान’ यांचीही मदत मिळताना दिसते. त्यामुळे या पुढील कारवाया अधिक गंभीर स्वरुपाच्या आणि तितक्याच ताकदीच्या असतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याला जबाबदार असणार्‍या ‘लष्कर-ए-तोयबा’लाही अधिक जोर चढला आहे. ‘२६/११’ चा दहशतवादी हल्ला आजही देश विसरू शकलेला नाही.
 
 
शेकडो निरपराधांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. कित्येकांना ओलीस ठेवले. त्या जखमा मुंबई विसरू शकत नाही. आज याच संघटनेचे दहशतवादी खैबरपख्तुनख्वा येथे तळ ठोकून आहेत. अफगाणिस्तानात तालिबानराज प्रस्थापित होईल आणि दहशतवाद्यांचे मनोबल वाढेल, याला आता दुजोरा मिळाला आहे. दहशतवाद्यांच्या या शिबिरांना पाठबळ देण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
 
 
पूर्वी या केवळ पाकिस्तानातील ‘नेटवर्क’चा वापर करून चालविल्या जात. हाफिझ सईद जो आज पाकिस्तानात स्वतःच्याच घरात नजरबंद असल्याचे सांगितले जाते, पण घडलेल्या घटनांची तर्कसंगत मांडणी केली तर लक्षात येईल की, तो गप्प बसलेला नाही. अफगाणिस्तानातील सरकारला हुसकावून लावून ते तालिबान्यांकडे सुपूर्द करण्यात अशाच दहशतवादी संघटनांचा हात असण्याची दाट शक्यता आहे.
 
 
याच गोष्टींचा मोबदला म्हणून अफगाणिस्तानातील भूमी दहशतवाद्यांच्या तुकड्या तयार करण्यासाठी वापरली जात आहे. इस्लामिक दहशतवाद किंवा कट्टरतावाद्यांचे मनसुबे आणि तालिबान्यांचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. तालिबान्यांना जगाच्या पाठीवर राज्य गाजवताना तो उघडपणे राबविता येत नाही. उलट ‘हक्कानी नेटवर्क’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांच्यातील संबंध अधिक घट्ट करुन दिले की, बंदुकीच्या धाकावर हव्या त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण मोकळे, असा त्यांचा समज.
 
 
 
तालिबानला पाकिस्तानातही ‘शरिया कायदा’ लागू करायचा आहे आणि तशी उघड उघड धमकीही पाकिस्तानला तालिबानी देत असतात. एक भिकेला लागलेला देश आणि दुसरे बंदुकीच्या धाकावर सत्ता काबीज केलेले तालिबानी यांच्या एकत्रित येण्याने आणखी काय वेगळी खिचडी तयार होण्याची अपेक्षाही नाही. मात्र, भीती आहे ती म्हणजे, भारताच्या सीमावर्ती भागांना. पाकिस्तानच्या दिशेने होणार्‍या दहशतवादी कारवाया थांबवण्यात खुद्द तेथील सरकार अपयशी ठरत आहे, हे वारंवार निदर्शनात आले.
 
 
मुंबई हल्ल्याच्या १३ वर्षांनंतरही ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी येईल. कठोर कारवाई होईल, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार दबाव टाकला. परंतु, तरीही जगाच्या डोळ्यात धुळफेकीचे काम पाकिस्तानची ही दहशतवादी संघटना आजही करत आहे हे एका कृतीतून दिसून आले. एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही की, तालिबान आता अमेरिकेच्या मालकीचा उर्वरित फौजफाटा, हत्यारे भरून पाठविलेल्या गाड्या अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जात आहेत.

मोठमोठे ट्रक भरून हत्यारे पाकिस्तानात का पाठविली जात आहेत, याचा सुगावा लागलेला नाही. पण, ही रसद जर का तेथील दहशतवाद्यांच्या हाती लागली, तर एक मोठी चूक पाकिस्तान आणि तालिबानच्या हातून घडण्याची शक्यता आहे. ‘आमच्या हद्दीचा वापर, आमच्या जमिनींचा वापर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी होणार नाही,’ असा ‘कबुलीनामा’ तालिबानने दिला असला तरीही तिथे एकत्र होणार्‍या दहशतवाद्यांची ही पिलावळ चिंतेचा विषय ठरणार आहे, हे नक्की!



@@AUTHORINFO_V1@@