वंचितांचा ‘संतोष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2021   
Total Views |

santosh raut_1  
अडथळ्यांवर कात्री मारून, संधीला कंगव्याने आपल्याकडे वळवणारा हरहुन्नरी केशकर्तनकार तरुण संतोष राऊत यांच्याविषयी...

आम्ही वारीक वारीक।
करू हजामत बारीक॥
विवेक दर्पण आयना दाऊ।
वैराग्य चिमटा हालऊ॥
उदक शांती डोई घोळू।
अहंकाराची शेंडी पिळू॥
भावार्थाच्या बगला झाडू।
काम क्रोध नखे काढू॥
 
या संतसेना महाराजांच्या अभंगातील ओळींप्रमाणे स्वतःसह समाजबांधव व वंचितांची चिंता वाहणाऱ्या संतोष राऊत याचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील चिखली या दुष्काळी गावात झाला. आई-वडील वारकरी संप्रदायाचे असून ते गावीच असतात, भाऊ असून त्याचा आता विवाह ठरला आहे. संतोष याचाही विवाह झाला असून त्याला एक अपत्य आहे. या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी संतोष नेटाने सांभाळतो आहे.
 
गावाकडे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे संतोषने २००३ साली रोजगाराच्या शोधार्थ ठाण्याची वाट धरली. गावाकडे शेतकरी असलले आई-वडील, भावंडं यांची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या संतोषनं ठाण्यात आल्याबरोबर काही केशकर्तनालयांमध्ये कामे केली. आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याची धडपड अपरिहार्य होतीच, पण शिक्षण घेण्याची जिद्दही त्याच्यात त्याहून अधिक होती. म्हणूनच मुलुंड येथील वझे-केळकरसारख्या नामांकित महाविद्यालयातून त्याने ‘राज्यशास्त्र’ या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे करत असतानाच आपल्या पिढीजात व्यवसायकलेत काही तरी करून दाखवण्याची ईर्षा त्याच्या मनात उफाळून आली. केशकर्तनकलेतील नवनवीन तंत्र शिकण्याकडे त्याचा ओढा होताच. त्यामुळेच पदवी शिक्षण झाल्यानंतर संतोषने केशकर्तन कलेतील भारतातील प्रसिद्ध तज्ज्ञ जावेद हबीब यांच्या संस्थेतील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. केशकर्तनातील अंगभूत कौशल्ये असणाऱ्या संतोषने या संस्थेत या कलेतील आधुनिक तंत्रे आत्मसात केली. अल्पावधीत जावेद हबीब यांचा अत्यंत लाडका शिष्य बनल्याचे संतोष सांगतो. पुढे त्याने या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आणि अथक कष्टाने स्वत:चे अत्याधुनिक सेवा पुरविणारे केशकर्तनालय ठाण्यात सुरु केले. कामातील उत्तमता आणि सर्जनशीलता यांमुळे त्याचे केशकर्तनालय आज ठाण्यातील कला सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज तसेच शहरातील अनेक नामवंतांसाठी एक हक्काचे, परवलीचे ठिकाण ठरले आहे.केशकर्तनासारख्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नावीन्य पूर्णत्वाला आणणारा संतोष व्यवसायात स्थिरस्थावर होत ठाण्यातील सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांतही सक्रिय असतो. व्यवसाय करता करता कायद्याचं उच्चशिक्षणही घेत संतोष ‘संवाद फाऊंडेशन’च्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन, नागरी चळवळ आणि समाजसेवेच्या क्षेत्रात हिरीरीने कार्यरत आहेत.
 
व्यवसायात उत्तुंग भरारी घेत असताना संवेदनशील असलेला संतोष समाजातील उपेक्षित घटकांच्या न्याय-हक्कांसाठी सदैव जागरूक असतो. कोरोनाकाळात सर्व काही ठप्प झालेले असताना हातावर पोट असणाऱ्या नाभिक बांधवांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती. अशा आणीबाणीच्या स्थितीत संतोषने विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने, प्रसंगी स्वखर्चातून गरजूंना अन्नधान्य तसेच अन्य जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. टाळेबंदीत स्थलांतरित कामगार आपापल्या राज्यांकडे परतत होते, तेव्हा त्यांचा प्रवास बिनधोक व्हावा यासाठीही तो सक्रिय होता. मागे कुलभूषण जाधव या पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय नागरिकाच्या सुटकेच्या अनुषंगाने आतंरराष्ट्रीय न्यायालयात एक खटला सुरू होता. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्या युक्तिवादामुळे भारताची बाजू तेव्हा न्यायालयाने मान्य केल्यानंतर संतोषने ठाणे शहरातील वकिलांसाठी निव्वळ एक रुपयात केशकर्तन सेवा उपलब्ध करून दिली होती. हे त्याच्या सामाजिक जाणिवेचे उत्तम उदाहरण ठरावे.
 
गेल्या पाच वर्षांपासून ‘संवाद फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष म्हणूनही तो सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांत पुढाकार घेत असतो. तसेच नाभिक समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तो मोलाचे योगदान देत असून समाजाच्या विविध कार्यक्रमांत कार्यरत असतो. वारकरी संप्रदायाचं आकर्षण असलेला संतोष तबलावादक म्हणून भजन- कीर्तनातही तल्लीन होताना दिसतो. संतोष हा राजकीय महत्त्वाकांक्षी असून २०१८ साली झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही त्याने नशीब आजमावल्याचे तो सांगतो. सध्या संतोष कायद्याचे शिक्षण घेत असून या ज्ञानाचा उपयोग त्याला समाजसेवेसाठी करण्याची इच्छा आहे. शहरातील नागरी चळवळीत सक्रिय राहून माहिती अधिकार कायद्याचा सदुपयोग करत तो सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडतो. सेवादलाच्या कला पथकातील राम नगरकरांचा संतोषवर प्रभाव असून ‘रामनगरी’तील नगरकरांचा मिश्कीलपणाही त्याच्यात उतरला आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून आलेल्या संतोषने आजवर समोर आलेल्या अडथळ्यांवर हातातील कात्रीने मात केली, तर कंगव्याने संधीला आपल्याकडे फिरवत स्वकर्तृत्वाने जीवनाला आकार दिला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वतःसह इतरांच्या दु:खाला कात्री लावत सतत झटत असलेल्या संतोषला आगामी वाटचालीसाठी ’दै. मुंबई तरुण भारत’च्या प्रेरणादायी शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@