महाबळेश्वर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नसून त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्रीमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी एसटीचा आजपर्यंतचा इतिहासच समोर मांडला. तसेच, "एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती", असं शरद पवार म्हणाले आहेत.
साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांच्या मागण्या याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी असलेल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर देखील शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. "विलिनीकरणाची मागणी केली जात आहे. त्यावर उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. त्या समितीने निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या समितीच्या शिफारशींचा सरकार गांभीर्याने विचार करेल", असं ते म्हणाले.
"सध्या राज्यात ९६ हजार एसटी कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या एकूण शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय अन्य आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर्स, एसटी कर्मचारी, राज्यातील इतर काही कर्मचारी आहेत जे राज्य सरकारचे कर्मचारी नसले, तरी सरकारशी संबंधित आहेत. एकदा विलिनीकरणाचं सूत्र अवलंबलं, तर ते सर्वांना लागू होईल. त्याचं आर्थिक गणित काय असेल, त्यावर सरकारला विचार करावा लागेल", असा मुद्दा देखील शरद पवार यांनी मांडला.