मुंबई : “महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने गेल्या दहा वर्षांमध्ये सुमारे ३९ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली. त्यामधील २१ हजार झाडे हे खासगी विकासकाच्या प्रकल्पांकरता तोडण्याची परवानगी देण्यात आली. ३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. बिल्डरांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडलीत, मग ‘मेट्रो कारशेड’ला विरोध कशासाठी?,” असा थेट सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
आ. साटम यांनी मुंबईतील वृक्षतोड आणि मेट्रोबाबत आदित्य ठाकरेंना नुकतेच एक पत्र लिहित त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या पत्रात ते म्हणाले की, “आपल्याकडे पर्यावरण खाते आल्यापासून महाराष्ट्राने अनेक वादळे, अतिवृष्टी, महापुराला तोंड दिले आहे. हा निसर्गाचा प्रकोप पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे झाला आहे. आपल्या स्वार्थी कृतीमुळे आपण मुंबईलाही अशाच निसर्ग प्रकोपात ढकलण्याची तयारी करत आहात. आपण राज्य करीत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मागील दहा वर्षांमध्ये सुमारे ३९ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिलेली आहे व त्यामधील २१ हजार झाडे ही खासगी विकासकाच्या प्रकल्पाकरता तोडण्याची परवानगी दिलेली आहे, असे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
एका बाजूला ज्या मेट्रोमुळे कितीतरी ‘कार्बन फ्रुटपिंट’ वाचणार आहेत हे वैज्ञानिक तथ्यांनुसार सिद्ध झाले आहे आणि तीच बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली. म्हणूनच ‘मेट्रो कारशेड’साठी २,७०० वृक्षांच्या तोडणीला मान्यता दिली गेली होती. कारण त्याच्या बदल्यामध्ये तीन पट नवीन झाडे लावण्यात येणार होती. मेट्रोचा प्रश्न मार्गी लागत असतानाच त्यात फक्त राजकीय इर्षेपोटी आपण मेट्रोला विरोध केला आणि मुंबईकरांचा सोयीस्कर होणारा प्रवास हा मुंबईच्या खड्ड्यात असणार्या रस्त्यांत ढकलला,” असा आरोप अमित साटम यांनी केला.
मेट्रोचा मार्ग लवकर सुकर करावा
“आपण पर्यावरण मंत्री आहात, तेव्हा ३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कारवाई करावी, अन्यथा महापालिकेतील सत्ताधार्यांमुळे मुंबई बुडल्याशिवाय राहणार नाही,” असे आपले लाडके बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीच म्हटलेले आहे. “कारशेडसाठी आपण मुंबईची मेट्रो थांबवली. मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे. बालहट्टासाठी अन् राजकीय स्वार्थासाठी आपण मेट्रोही थांबवली आहे. तरी या आपण मेट्रोचा मार्ग लवकर सुकर करावा,” अशी मागणी अमित साटम यांनी या पत्राद्वारे केली आहे.