माओवादविरोधी अभियान राबविणारे एक उत्कृष्ट दल गडचिरोली पोलीसचे ‘सी-६० कमांडोज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2021   
Total Views |

C 60 _1  H x W:

‘सी-६०’ मध्ये स्थानिक वनवासी तरुण आहेत. त्याग आणि धैर्य, शौर्य याचं उदाहरण म्हणजे ‘सी-६०’ पथक म्हणता येईल. तेव्हा, माओवाद्यांची गडचिरोलीत नांगी ठेचणार्‍याया विशेष पथकाविषयी...
 
 
 
दि. १२-१३ नोव्हेंबरला माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ जवानांच्या पथकांनी नऊ तास झुंज देऊन २६ माओवाद्यांना ठार केले. ठार माओवाद्यांमध्ये केंद्रीय समितीचा सदस्य तथा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडची जबाबदारी असलेला मास्टरमाईंड मिलिंद तेलतुंबडे, विभागीय समिती सदस्य लोकेश मडकाम, कसनसूर दलम कमांडर तथा विभागीय समिती सदस्य महेश गोटा यांचा समावेश आहे. यापैकी सोळा जणांची ओळख पटली आहे.
 
 
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर मर्दिनटोला जंगलातील चकमकीत पोलिसांकडून ३०० हून अधिक कमांडो सहभागी झाले होते, तर शंभरपेक्षा अधिक माओवादी गोळीबार करीत होते. २६ माओवादी मारले गेले, तर बाकीचे पळून गेले. माओवाद्यांकडून पाच एके-४७, एक एकेएम युबिजिअल, नऊ एसएलआर रायफल, तीन ३०३ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक युवक चळवळीत भाग घेत नसल्याने चाळीस टक्के माओवादी परराज्यातून येत आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती देणार्‍या खबर्‍याला या माओवाद्यांवर राज्य सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेले बक्षीस देण्यात येणार आहे.
 
 
 
‘सी-६०’ कडून मोठं ऑपरेशन

माओवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं होतं. माओवादी जंगल परिसरातीलच राहणार्‍या लोकांना चळवळीत भरती करतात. त्यामुळे माओवाद्यांविरोधात लढण्यासाठी तेथील भाषा, रस्ते इत्यादी गोष्टीही माहिती असणारे जवान आपल्याकडे असणं गरजेचं होतं. त्यातूनच १९९० सालाच्या सुमारास ‘सी-६०’ची संकल्पना उदयास आली. ही याच जंगल परिसरातील तरुण मुले आहेत. यांचे नातेवाईक, जंगलातच राहणारे, तिथलीच भाषा बोलणारे आणि तिथले रस्ते ओळखणारे असतात. म्हणून त्यांना जंगलातील प्रत्येक कानाकोपर्‍याची माहिती असते. नक्षलग्रस्त प्रभावित क्षेत्रातील तरुणांची निवड करुन, १९९० साली ‘सी-६०’ची पहिली तुकडी तयार करण्यात आली. त्यावेळी ६० जणांचा पहिल्या तुकडीत समावेश होता, म्हणून या पोलीस पथकाला ‘सी-६०’ असे नाव पडले. पुढे तुकडीतील जवानांची संख्या वाढली, तरी नाव मात्र ‘सी-६०’ असेच कायम राहिले.

‘सी-६०’च्या जवानांना खास जंगलातील कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे जंगलातून वजनदार शस्त्र घेऊन किंवा जखमी साथीदारांना घेऊन फिरणं, हे नेहमीचंच आहे. ‘सी-६०’च्या जवानाला स्वत:चं नाव उघड न करण्याचे बंधन आहे. कारण, त्यांच्या कुटुंबीयांना कायम माओवाद्यांकडून धोका असतो.

एक ‘सी-६०’ जवान गावातून या फोर्समध्ये गेला म्हणून माओवाद्यांनी त्याचे वडील, मोठा भाऊ, काका आणि चुलत भाऊ अशा अनेकांची हत्या केली, उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवलं. शेकडो ‘सी-६०’ जवान असे आहेत, ज्यांच्या घरातील एका तरी व्यक्तीची ते या फोर्समध्ये गेले म्हणून माओवाद्यांनी हत्या केली. या फोर्समध्ये भरती तर झाले, पण त्यांच्या उरलेल्या परिवाराला आपापली गावं आणि जमिनी सोडून पलायन करावे लागले आहे.

‘सी-६०’ मध्ये स्थानिक वनवासी तरुण आहेत. त्यांचेच रक्ताचं नातं असलेले हे त्यांच्या नक्षली दलामध्ये कार्यरत असतात. त्याग आणि धैर्य, शौर्य याचं उदाहरण म्हणजे ‘सी-६०’ पथक म्हणता येईल.

कठोर परिश्रम घेऊन लढण्याची तयारी


‘सी-६०’ जवानांना जंगलातील चकमकीसाठी प्रशिक्षित केले जाते. या जवानांना हैदराबादमधील ग्रे-हाऊंड्स, मानेसरमधील एनएसजी आणि पूर्वांचलमधील आर्मीच्या जंगल वॉरऐअर स्कूलमध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यांना विशेष शस्त्रे दिली जातात.जंगलात अनेक दिवस जेवण, पाणी न घेता ते कारवाई करु शकतात. प्रत्येक जवानांकडे १५-२५ किलो वजन असते. यात जेवण, पाणी, औषध आणि अन्य साहित्य असते. १९९४ साली ‘सी-६०’च्या दुसर्‍या मुख्यालयाची स्थापनास करण्यात आली. ‘सी-६०’चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम घेताना दिसतो.

प्रशिक्षित ‘सी-६०’ पथकातील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये माओवाद्यांविरोधी अभियान राबवितात. दरम्यान माओवाद्यांच्या चळवळीमध्ये असणार्‍यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणाबाबत तसेच विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांचे मनपरिवर्तन करुन, त्यांना लोकशाहीच्या विकासप्रवाहात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते.

कट्टर माओवादी शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करुन लोकांना शासनाविरुद्ध भडकावित असतात. अशा जहाल व कट्टर माओवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जातो. तसेच दुर्गम भागात जाऊन जनसंपर्क साधून शासनाची विविध धोरणे लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ‘सी-६०’ पथक योग्यरित्या पार पाडत आहे.


माओवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम व जंगल भागात अशा ठिकाणी अनेक शासकीय अधिकारी/कर्मचारी सहसा फिरकत नाहीत. अशा गावांमध्ये ‘सी-६०’ पथके जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. जसे की, वीज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा इत्यादी. मुख्यालयात आल्यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना त्या त्या भागातील जनतेच्या गैरसोयींची माहिती देऊन संबंधित कार्यालयाकडून सदरची कामे व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.



युओटीसी - अतिशय खडतर प्रशिक्षण


‘सी-६०’ पथके ‘रिझर्व्ह’ असताना शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरिता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना माओवादविरोधी अभियान राबविण्याकरिता वेळोवेळी नक्षल्यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली जाते. तसेच त्यांचे नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर , कमांडो चित्रपटही दाखविले जातात.

‘सी-६०’ पथकाला अतिदुर्गम, संवेदनशील व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री अशा कोणत्याही क्षणी येणार्‍या आव्हानांना व समस्यांना तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचे प्रशिक्षण विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जाते.


जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी युओटीसी, नागपूर येथे पाठविले जाते. त्यांना इथे जे प्रशिक्षण दिले जाते, त्यामध्ये ‘स्मॉल टीम्स ऑपरेशन’चे प्रशिक्षण हे महत्त्वाचे होते. असे बघितले गेले आहे की, माओवादी भागात पोलीस हे रक्षात्मक पद्धतीने ऑपरेशन करतात. अर्धसैनिक दले आक्रमक कारवाई करता फारशी तयार नसतात.


‘सी-६०’ची सगळी ऑपरेशन्स ही अत्यंत आक्रमक आणि धोकादायक होती आणि आहेत. याकरिता उत्तम दर्जाचे प्रशिक्षण जरुरी आहे. स्वतःवरती, स्वतःच्या शस्त्रांवरती, सहकार्‍यांवर आणि स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तरच अशाप्रकारच्या कठीण ऑपरेशनमध्ये विजय मिळू शकतो.

शौर्य, धैर्य आणि कठीण परिस्थितीमध्ये जिंकण्याची मानसिकता

ज्या माओवादाने देशातील १०० जिल्ह्यांमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली होती, तो माओवाद आता ३० ते ४० जिल्ह्यांपुरता मर्यादित झाला आहे. ‘सी-६०’ पथकाने केलेल्या या ऑपरेशनचे नियोजन उत्तम होते, गुप्तहेर माहिती अचूक होती आणि लष्करी डावपेचदेखील उत्तमरित्या वापरले गेले. तसेच त्यांची ‘फायरिंग डिसिप्लिन’ देखील उत्कृष्ट दर्जाची होती. ‘सी-६०’ पथकाने सिद्ध केलेले आपले नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि कठीण परिस्थितीमध्ये जिंकण्याची मानसिकता खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.

कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विलंब लागतो. एखादे काम जर आपण चिकाटीने आणि सातत्याने केले, तर आज ना उद्या त्या कामात यश मिळतेच, हेच आजच्या घटनेवरून सिद्ध झाले. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये छत्तीसगढ व महाराष्ट्रातील एक कोटी ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा समावेश आहे. हे बक्षीस चकमकीत सहभागी असलेल्या ‘सी-६०’ जवानांना त्वरित मिळवून दिले पाहिजे. यापूर्वीही ‘सी-६०’ पथकाला विविध मोहिमांमध्ये यश मिळाले आहे. पण, आजचे यश त्या साखळीत सर्वात उजवे आहे, असे म्हणावे लागेल.


‘सी-६०’ कमांडोजना प्रत्येक ऑपरेशननंतर पुरेशी विश्रांती दिली जावी. त्यांचे काम उच्च दर्जाचे आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जंगलात पाठवू नये. इतर पोलीस दलांनी सुद्धा त्यांच्यावर असलेला भार सांभाळावा. त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित जागी हलवले जावे. गडचिरोलीमध्ये तैनात असलेल्या अर्धसैनिक दलांनी अधिक आक्रमक व्हावे. छत्तीसगढ, ओडिशा, झारखंडमधील सुरक्षा दलांनी सुद्धा आक्रमक कारवाई करून अबुजमाड जंगलात असलेले माओवाद्यांचे प्रशिक्षण कॅम्प उद्ध्वस्त करावेत, तरच माओदावर वादावर नियंत्रण करता येईल.

@@AUTHORINFO_V1@@