मिलिंद तेलतुंबडे हा शेकडो वनवासींच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेला कुख्यात माओवादी होता. त्यामुळे ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमावर्ती भागातील माओवादी संघटनेच्या प्रभुत्वाला एक मोठा धक्का आहे. मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने माओवादी संघटनेवर काय परिणाम होतील, हे समजून घ्यायचे असेल, तर त्याची माओवादी संघटनेत काय भूमिका राहिलेली आहे, हे समजून घ्यावे लागेल.
दि. १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेलगतच्या ग्यारापत्ती जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने तब्बल २६ माओवाद्यांचा खात्मा केला. अशाचप्रकारे एप्रिल २०१८ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बोरिया-कसणासूर या गावाच्या परिसरात ‘सी-६०’ पथकाच्यावतीने तब्बल ४० माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ‘सी-६०’ पथकांची ही कारवाई विशेष अभिनंदनीय याकरितादेखील आहे की, यामध्ये माओवाद्यांचा एक प्रमुख नेता आणि ६० हून अधिक हिंसक घटनांमध्ये सहभागी असल्याकारणाने एक प्रमुख ‘वॉन्टेड’ दहशतवादी असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ ‘ज्योतिबा’ उर्फ ‘दीपक’ उर्फ ‘सह्याद्री’ हा मारला गेला.
मिलिंद तेलतुंबडे हा शेकडो वनवासींच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेला कुख्यात माओवादी होता. त्यामुळे ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमावर्ती भागातील माओवादी संघटनेच्या प्रभुत्वाला एक मोठा धक्का आहे. मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने माओवादी संघटनेवर काय परिणाम होतील, हे समजून घ्यायचे असेल, तर त्याची माओवादी संघटनेत काय भूमिका राहिलेली आहे, हे समजून घ्यावे लागेल.
जंगल भागामध्ये सक्रिय होण्यापूर्वी मिलिंद तेलतुंबडे हा नागरी भागामध्ये ‘भारत नौजवान सभा’ या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘भारत नौजवान सभा’ ही एक माओवादी फ्रंट संघटना असल्याचे घोषित केले आहे. तो जेव्हा जंगल भागातील माओवादी सैन्यात सामील झाला, तेव्हा सुरुवातीला तो चंद्रपूर, वणी, उमरेड या भागात सक्रिय होता. २००४ मध्ये जेव्हा विविध माओवादी गट एकत्रित येऊन भाकप (माओवादी) या संघटनेचीही स्थापना झाली, तेव्हा त्याच्याकडे माओवाद्यांच्या महाराष्ट्र राज्य समितीमध्ये सहभागी समावेश झाला.
त्यानंतर सन २०१५ मध्ये श्रीधर श्रीनिवासन या माओवादी नेत्याच्या मृत्यूनंतर मिलिंद तेलतुंबडे याला राज्य समितीच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. नंतर २०१६ पासून त्याच्याकडे महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) या विभागाची जबाबदारी देण्यात आली आणि त्याचा केंद्रीय समितीमध्येदेखील समावेश करण्यात आला. मिलिंद हा गडचिरोली, गोंदिया, बालाघाट, राजनांदगाव या भागामध्ये नक्षलवादी संघटना मजबूत करणे, पोलिसांवर हिंसक हल्ले करणे, स्फोट घडवून पोलिसांच्या गाड्या उडवणे, अशाप्रकारच्या कारवायांचे नियोजन करीत असे.
केवळ जंगल भागामध्येच नाही, तर माओवाद्यांच्या शहरी भागातील कारवायांमध्ये देखील मिलिंद तेलतुंबडे याची मोठी भूमिका होती. पुणे-ठाणे-मुंबई-नाशिक-सुरत-अहमदाबाद हा जो देशाचा पश्चिम भाग आहे, त्याला माओवाद्यांनी ’गोल्डन कॅरिडॉर’ असे नाव दिले आहे आणि या भागातील तरुणांची माओवादी संघटनेत भरती करण्याचे कामदेखील मिलिंद तेलतुंबडे करीत होता. याच पश्चिम भागात सक्रिय असलेली माओवादी फ्रंट संघटना- ‘कबीर कला मंचा’चं कामदेखील मिलिंद तेलतुंबडे पाहत असे.
या ‘कबीर कला मंचा’च्या माध्यमातून अनेक तरुणांना माओवादी संघटनेत भरती करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी अँजेला सोनटक्के हिलादेखील माओवादी संघटनेत सक्रिय असल्याकारणाने एप्रिल २०११ मध्ये ठाणे शहरातील साईकृपा हॉटेल, तलाव पाळी येथून दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. २०१६ मध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला. मिलिंद तेलतुंबडे आणि त्याची पत्नी अँजेला यांनी २०१० मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात काही तरुणांचे १५ दिवसांचे शिबीर घेतले होते, ज्यामध्ये त्यांना माओवादाशी संबंधित प्रशिक्षण देऊन भरती करण्यात आले होते.
गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी जबाब नोंदवला आहे की, ‘कबीर कला मंचा’शी संबंधित काही तरुण-तरुणी, ज्यामध्ये शीतल साठे, सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांचा समावेश होता, ते जंगल भागामध्ये प्रशिक्षणास हजर राहिले होते आणि मिलिंद तेलतुंबडेने त्या सर्वांना मार्गदर्शन केले होते. तसेच पुण्यातील कासेवाडी भागातील संतोष शेलार व प्रशांत कांबळे या तरुणांनादेखील माओवादी संघटनेत भरती करण्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे आणि त्याच्या पत्नीची मुख्य भूमिका राहिलेली आहे.
२०१४ मध्ये एका विक्रम नावाच्या माओवाद्याने आत्मसमर्पण केले होते. तेव्हा त्यांने कबुलीजबाब दिला होता की, मिलिंद तेलतुंबडे याने त्याला पुण्यातील खडकी येथील दारुगोळा फॅक्टरी येथून नगर येथे दारुगोळ्याची वाहतूक करणार्या ट्रकची माहिती काढण्यास सांगितली होती, जेणेकरून तो दारुगोळा लुटता येईल. त्याचप्रमाणे वर्ध्याजवळील पुलगाव येथील ‘सेंट्रल अॅम्युनिशन डेपो’ येथून जाणार्या ट्रकचीदेखील माहिती काढण्यास सांगितली होती. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील देवडी गावाजवळ दारुगोळ्याची ट्रक लुटण्याचीदेखील मिलिंद तेलतुंबडे याची योजना होती.
मिलिंद तेलतुंबडे याने विक्रमला जंगल आणि शहरी भागातील माओवाद्यांचा ‘कुरिअर’ म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली होती. इतकेच नाही, तर ‘देशभक्ती युवा मंच’ या ‘माओवादी फ्रंट संघटने’चे काम करणार्या अरुण भेलके व कांचन नन्नावरे यांना मार्गदर्शन करण्याचे कामदेखील मिलिंद तेलतुंबडे हाच करायचा. या ‘देशभक्ती युवा मंचा’च्या माध्यमातूनदेखील अनेक तरुणांची भरती करण्यात आलेली आहे. अरुण भेलके व कांचन नन्नावरे यांना अटक करण्यात आली. कांचन नन्नावरेचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असून अरुण भेलके हा सध्या कारागृहात आहे.
माओवाद्यांनी रचलेले षड्यंत्र ‘एल्गार परिषद’ आणि कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार यामध्येदेखील मिलिंद तेलतुंबडेचा सहभाग असून तो एल्गार परिषद खटल्यात एक आरोपी होता. माओवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडे व सुरेंद्र गडलिंग यांच्या माध्यमातून ‘रिपब्लिकन पँथर’ व ‘कबीर कला मंचा’ला एल्गार परिषदेच्या आयोजनाकरिता निधी पुरवला गेला होता. एल्गार परिषद खटल्यातील एक आरोपी रोना विल्सन यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ‘कॉम्रेड एम’, म्हणजेच मिलिंद तेलतुंबडे याने लिहिलेलं एक पत्र आहे. त्यात असे म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा येथील आंदोलन प्रभावी ठरले आहे.
मिलिंद तेलतुंबडेचा सख्खा भाऊ आनंद तेलतुंबडे हादेखील एल्गार परिषद खटल्यातील एक प्रमुख आरोपी असून सध्या कारागृहात आहे. आनंद तेलतुंबडे हा शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची माओवादी संघटनेत भरती करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कडव्या डाव्या सशस्त्र संघटनांशी समन्वय साधणे, शहरी भागातील कारवायांचे व्यवस्थापन करणे यामध्ये सहभागी असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांच्यावतीने माओवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर अशा घटनांचे सत्यशोधन करण्याच्या नावाखाली सुरक्षा यंत्रणांच्या बदनामीची मोहीम राबवण्यातदेखील आनंद तेलतुंबडे याची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मिलिंद तेलतुंबडे, त्याची पत्नी अँजेला आणि भाऊ आनंद तेलतुंबडे हे सर्वजण माओवादी संघटनेत सक्रिय राहिलेले आहेत.
त्यामुळे मिलिंद तेलतुंबडे हा जंगल भागामध्ये शेकडो वनवासींच्या हत्यांसाठी कारणीभूत तर होताच, पण त्यासोबतच शहरी भागातदेखील माओवाद्यांचं मजबूत नेटवर्क उभं करण्यात त्याची मोठी भूमिका होती. चंद्रपूर, गोंदिया, राजुरा, भंडारा आणि पुण्यासह पश्चिम भागातील तरुणांची माओवादी संघटनेत भरती करण्यात त्याचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने निश्चितच माओवादी संघटनेला मोठा धक्का बसलेला असून महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) या सीमावर्ती भागातील माओवाद्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने खूप मोठी कामगिरी आहे.
या चकमकीनंतर माओवाद्यांची पीछेहाट झाल्यामुळे आता शासनाने त्या ठिकाणची विकासाची पोकळी भरून काढण्यावर भर दिला पाहिजे. माओवाद्यांचा प्रभाव असताना विकासकामे करता येत नाहीत, पण ज्या ठिकाणी त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे तेथे लोकाभिमुख विकासाच्या योजना राबवून माओवादमुक्त क्षेत्रात शासन विकास करू शकते, हे दाखवून द्यावे लागेल. तरच या कारवाईचे यश तात्कालिक न राहता कायमस्वरूपी होईल.
(लेखक ‘विवेक विचार मंच’चे समन्वयक आहेत.)