जगभरात वर्चस्व गाजवण्यासाठी आटापिटा करणार्या व त्यासाठी इतर औषधशास्त्रांना कमी लेखण्याचे काम करणार्या औषधशास्त्राच्या जगात होमियोपॅथीलाही त्याचे चटके सहन करावेच लागत आहेत. देशभरातूनही होमियोपॅथीला राजकीय पाठबळ मिळत नाही. परंतु, यामुळे होमियोपॅथीक औषधशास्त्र मागे पडलेले नाही, कोट्यवधी लोक होमियोपॅथीक उपचार घेऊन बरे होत आहेत. इतर औषधशास्त्रांनी कितीही आगपाखड केली, तरी होमियोपॅथीचे रिझल्ट्स सकारात्मकरीत्या सर्व लोकांच्या समोर येत आहेत. ना खास अर्थसाहाय्य, ना अॅलोपॅथीसारख्या फार्मा कंपन्यांची लॉबी, ना राजकीय पाठबळ, ना होमियोपॅथीक कॉलेजेसचा सकारात्मक पाठिंबा अशा प्रतिकूल परिस्थितीतही होमियोपॅथी उभी आहे. कारण, हे निसर्ग नियमांवर आधारित विज्ञान आहे व या विज्ञानाची मुळे निसर्गामध्ये असल्यामुळे ते अजूनही प्रगतिपथावरच आहे.प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. हॅनेमान यांनी जी आदर्शतत्त्वे 'Organon of Medicine’मध्ये घालून दिली आहेत, ती नीट अभ्यासून व त्याचा होमियोपॅथीक प्रॅक्टिसमध्ये वापर करून होमियोपॅथीला प्रगतिपथावर नेण्यासाठी आज अनेक होमियोपॅथीक डॉक्टर्स झटत आहेत.
कुठल्याही सरकारी अर्थसाहाय्य व पाठिंबा नसतानाही अनेक होमियोपॅथीक संस्था संशोधनाचे कार्य करत आहेत.
उदाहरणादाखल पालघरचे एम. एल. ढवळे ट्रस्टचे ’'Institute of Clinical Research' (ICR) चे उदाहरण आपल्याला घेता येईल. ‘आयसीआर’ गेले अनेक वर्षे होमियोपॅथीक सिस्टीमच्या संशोधनाचे व प्रबंधाचे काम करत आलेले आहे. पालघरला फार मोठे होमियोपॅथीचे रुग्णालय उभारून ते रुग्णांना होमियोपॅथीक औषधांचे उपचार केले जात आहेत. होमियोपॅथी आणि मानसोपचार (Psychiatry), होमियोपॅथी आणि बालरोग (Pediatrics), होमियोपॅथी आणि स्त्रीरोग (Gynecology & Obstetrics) इत्यादी सर्व उपशाखांमध्ये संशोधन कार्य चालू आहे. काही असाध्य वाटणारे आजारही होमियोपॅथीमुळे बरे होतात, हे लक्षात आल्यावर अशा आजारांवर संशोधन कार्य सुरू आहे. ‘होमोफिलीया’सारखा आजार जो असाध्य मानला जातो, त्यावरही होमियोपॅथीच्या काही अनुभवी डॉक्टरांनी प्रयोगांसहित प्रबंध लिहिले आहेत व सरकारला होमियोपॅथीची उपयुक्तता दाखवून दिली आहे. कर्करोगासारख्या आजारावरही होमियोपॅथीने यशस्वी उपचार करता येतात, हे अनेक अनुभवी होमियोपॅथीक डॉक्टर्स जगाला दाखवून देत आहेत. मायोस्थेनीचा ग्रेव्हीससारखा असाध्य आजारही होमियोपॅथीने बरा करता येतो, हे जगाने आता पाहिले आहे. त्याचबरोबर वंध्यत्व, ऑटिझम, यकृताचे विकार, किडनीचे विकार, फुप्फुसाचे विकार, Auto immune disorders , आर्थरायटीस, थायरॉईड, कोड, सोरायसीस, लायकेन प्लॅनस, एसएलई इत्यादीचा यशस्वी उपचार हा होमियोपॅथीनेच होऊ शकतो, हे आता राज्यमान्य जरी नसले तरी लोकमान्य झालेले आहे. यातूनच मग होमियोपॅथीक डॉक्टरांना संशोधनाची ऊर्मी मिळते व त्यावरच जगात होमियोपॅथीक सिस्टीम खंबीरपणे पाय रोवून उभी आहे व सतत प्रगती करतेच आहे.
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅॅथी आहेत.)