
एखाद्या गोष्टीचा उलगडा जर होत नसेल, तर त्यासाठी त्याचा शोध घेणे भाग पडते. शोधप्रक्रिया सुरू होताच त्या गोष्टीचा उलगडा होण्यास सुरुवात होते. ‘शोधले तर सापडतेच’ हा कानमंत्र सध्या भारताच्या क्रिकेट संघाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. खेळ म्हटले तर हार-जीत होणारच. रोमहर्षक सामन्यात पराभव झाल्यास मानहानी होत नाही. परंतु, प्रतिस्पर्धी संघांकडून सातत्याने एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कितीही मोठे खेळाडू, प्रशिक्षक का असेना, प्रत्येकाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच जाते. भारतीय संघ सध्या काहीसा याच परिस्थितीचा सामना करताना दिसतो. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंड अशा दोन्ही सामन्यांमध्ये मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. जिंकले तर चाहत्यांकडून प्रशंसा आणि हरले तर टीका होणे, हे अगदी स्वाभाविक. परंतु, प्रशंसा आणि टीका यापलीकडे जाऊन सध्या विचार करण्याची वेळ सध्या भारतीय संघावर आली आहे. आपण कुठे कमी पडलो, पराभवाची कारणे काय, आदी मुद्द्यांचा विचार तर भारतीय संघाकडून निश्चितच केला जात आहे. मात्र, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी जे कौशल्य हवे, यासाठी खरेच प्रयत्न झाले का, याचा विचार होणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तरी या मुद्द्यावर भारतीय संघाकडून गांभीर्याने विचार केला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु, खेळाडूंची कामगिरी पाहता, याचा कोणताही विचार तरी भारतीय संघाकडून झालेला दिसला नाही. ‘युएई’च्या मैदानांवर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणे फायदेशीर असते. दवबिंदूमुळे (ड्यू फॅक्टर)नंतर फलंदाजी करणे सोपे जाते, हे जरी खरे असले तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज या दोघांचीही कामगिरी झाली नसल्याचे दिसून आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य न दाखविल्याचे फलितच ‘पुनश्च पराभव’ आहे. त्यामुळे याचे उत्तर आधी शोधण्याची गरज भारतीय संघाला आहे. एकदा का याचे उत्तर मिळाले तर प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय संघासाठी विजय काही दूर नाही.
...तर निश्चितपणे विजय!
केवळ संघातील खेळाडू बदलणे आणि फलंदाजांच्या क्रमवारीत बदल करणे म्हणजे मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य नव्हे, हे आधी भारतीय संघाने लक्षात घेतले पाहिजे. मैदानावरील परिस्थितीनुसार आपल्या संघातील खेळाडूंमध्ये आवश्यक खेळाडूंमध्ये बदल करणे, तसेच फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत बदल करणे, हा संघाच्या रणनीतीचा एक भाग जरूर आहे. मात्र, हे प्रयोग फसले तर परिस्थिती अंगलट आल्याशिवाय राहत नाही, याचाही विचार करणे खरे तर भारतीय संघाने गरजेचे होते. त्यामुळेच सध्या भारतीय संघ दडपणाच्या ओझ्याखाली वावरत आहे. मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे आणि प्रतिस्पर्ध्यांना नमवणे, हे काही भारतीय संघासाठी नवीन नाही. याआधी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हे करून दाखवल्याचा इतिहास आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात तर त्याने मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची किमया तर केलीच होती. मात्र, केवळ दुबईच्याच धर्तीवर नाही तर २०१३ साली इंग्लंडच्या धर्तीवर झालेल्या ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या अंतिम सामन्यातदेखील धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तत्कालीन भारतीय संघाने मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य दाखवले होते. या स्पर्धेतही प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच अनेक सामन्यांमध्ये विजय मिळत होता. दवबिंदू आणि नाणेफेक निर्णायक ठरत होती. परंतु, अशा परिस्थितीतही भारतीय संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध महेंद्रसिंह धोनी नाणेफेक हरला. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मैदानावरील अनुकूल परिस्थितीचा फायदा पाहता इंग्लंडचाच संघ विजयी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, भारतीय संघाने अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या कमजोर बाबी अचूकपणे हेरत भारतीय संघाने इंग्लंडच्या एकेका खेळाडूंना बाद केले आणि अवघ्या पाच धावांनी विजय साकारत ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या जेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे केवळ मैदानावरील परिस्थितीला दोष देऊन चालणार नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे उत्तम कामगिरीच्या जोरावर निश्चितपणे विजय साकारता येतो.
- रामचंद्र नाईक