बुद्धविहार समन्वय समितीचे अखिल भारतीय चर्चासत्र, नाशिक येथे दि. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या चर्चसत्रात सहभागी होण्यासाठी आलेल्या १२ राज्यांमधील प्रतिनिधींनी आपापल्या प्रांतांतील धम्मकार्याची माहिती यावेळी दिली. तेव्हा, एकूणच या चर्चासत्रांतील काही प्रमुख मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख...
भारतात विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्धदीक्षा घेतल्यावर प्रथम महाराष्ट्रात, नंतर इतर प्रांतातील दलित समाजाने मोठ्या संख्येने धम्मदीक्षा घेतली. ज्या वस्त्यांमधून धम्मदीक्षितांची संख्या मोठी होती, तिथे धम्म उपासना करण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असावे, या दृष्टिकोनातून बुद्धविहार बांधण्याकडे कल राहिला आहे. या सर्वच विहारांमधून दोन्ही उद्दिष्टे साधण्याचे काम योग्य रितीने होत नाही, हे लक्षात आल्यावर सर्व बुद्धविहारांमधून योग्य प्रकारे काम सुरू राहण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची आवश्यकता लक्षात आली. तो उद्देश ठेऊन समन्वयाचे काम २०१४ साली काही कार्यकर्त्यांनी सुरू केले. नाशिक येथे नुकतेच संपन्न झालेले हे अधिवेशन कार्यकर्त्यांनी बुद्धविहारांसंदर्भातील प्रश्न अखिल भारतीय स्तरांवर नेण्यासाठी हा उपक्रम होता. बुद्धविहार समन्वय समितीचे अखिल भारतीय चर्चासत्र, नाशिक येथे दि. १३ आणि १४ नोव्हेंबरला पार पडले. या चर्चसत्रात सहभागी होण्यासाठी १२ राज्यांमधून प्रतिनिधी आल्याचे सांगितले गेले. त्या प्रतिनिधींनी आपापल्या प्रांतांतील धम्मकार्याची माहिती दिली. त्यात कर्नाटकातून आलेल्या, तिबेटी मुळाच्या दोलमा दिदी होत्या.
या दोन दिवसांच्या चर्चासत्रात सकाळी ११ पर्यंत धम्मसाधनेचे कार्यक्रम, त्यानंतर विषयवार चर्चासत्रे अशी आखणी होती. चर्चासत्रांच्या प्रारंभी कार्यकर्त्यांचा सत्कार, स्मरणिका, दैनंदिनी आणि दिनदर्शिका यांचे प्रकाशन आणि अंतिम सत्रात राष्ट्रीय स्तरापासून तो तालुकास्तरापर्यंत काम करणार्या समित्यांच्या पदाधिकार्यांच्या नेमणुका जाहीर करण्याचा उपक्रम झाला. बुद्धविहारांच्या बरोबरच बौद्धलेण्यांच्या संरक्षण आणि देखभालीबाबत, तसेच तेथे अतिक्रमणे होऊ नयेत, यावरील चर्चासत्र दि. १४ नोव्हेंबरला दुपारी पार पडले.
बुद्धविहार रचना आणि कार्य
बुद्धविहार बांधताना त्याची एक विशिष्ट बांधकाम शैली असावी, यावर चर्चा झाली. त्या संदर्भात उदाहरण दिले गेले की, मंदिरांवर कळस, मशिदींशेजारी मिनार, चर्चवर ‘क्रॉस’ तसे विहारांचे बांधकाम करताना त्यांचे वेगळेपण लक्षात येण्यासाठी ‘चैत्या’चा आकार असावा. बुद्धविहारात ‘बोधीवृक्ष’ लावण्यात यावा. बुद्धमूर्ती ही ध्यानमूर्ती असावी. उपासकाला बुद्धत्त्व प्राप्त करण्याची प्रेरणा विहारातील वातावरणातून मिळावी. भगवान बुद्धांची मूर्ती कशी असावी, या संदर्भात डॉ. बाबासाहेबांनी स्वत:च्या नजरेखाली करवून घेतलेल्या भ. बुद्धांच्या मूर्तीचा उल्लेख झाला. मला त्या मूर्तीविषयी उत्सुकता होती. चौकशी केल्यावर कळले की, ती मूर्ती संभाजीनगरच्या मिलिंद महाविद्यालयात आहे. ती पाहण्याची मला आता उत्सुकता आहे. यापुढे बुद्धविहारांमधून स्थापन केल्या जाणार्या मूर्ती त्या मूर्तीच्या आधारे केल्या जातील, असे वाटते. बुद्धविहाराला जोडून धम्माविषयी माहिती देणारे वाचनालय असावे. भ्रमंतीवर असलेल्या भिख्खूंच्या निवासासाठी वेगळी खोली असावी.
सर्वच धर्मांतील अग्रणी लोकांच्या तक्रारींचा पुनरुच्चार याही सत्रांमधून झाला. अनुयायी-उपासकांना धम्म, धम्माचरण आणि धम्मसंस्कारांची माहिती नसते. धम्मशिक्षा देण्यासाठी आलेले बौद्धभिख्खू त्यासाठी योग्य पात्रतेचे नसतात. धम्मसंस्कारांच्या पद्धतींमध्ये एकवाक्यता नाही. ती आणण्याची आवश्यकता आहे, हे अनेक वक्त्यांनी अधोरेखित केले. त्यासाठी सर्वांना मार्गदर्शक आणि देशपातळीवर एकसूत्रीपणा आणण्यासाठी विशेष पुस्तिका काढण्याची आवश्यकता सांगितली गेली. धम्मशिक्षा योग्य तर्हेने व्हावी, यासाठी पाली भाषा प्रचाराचे प्रयत्न करण्याचे आवाहन झाले. इस्लाममध्ये शुक्रवारी, ख्रिश्चन रविवारी प्रार्थना दिवस पाळतात. त्याच धर्तीवर शनिवार आणि नमाजाच्या प्रमाणे, ठरलेली एक वेळ धम्मप्रार्थनेसाठी ठेवावी.
अगदी छोट्या विहारांमधून इतक्या सर्व गोष्टी शक्य नसल्याने सुविधा आणि वाचनालये असलेले महाविहार अनेक ठिकाणी बांधावे, त्या विहारांमध्ये विद्वान भिख्खू तयार होऊन ते धम्मप्रसाराचे काम योग्यरितीने करतील, अशी अपेक्षा. गोव्यात असा पहिलाच महाविहार बांधण्याचे काम सुरू झाले आहे. काही भिख्खू वयोवृद्ध झाल्याने त्यांच्या उत्तरायुष्यासाठी निवास बांधण्याची आवश्यकता आहे.
काही वक्त्यांनी हेही सांगितले की, काही बौद्धभिख्खूच मनुवादी विचारधारा पसरविताना दिसतात. त्याचा परिणाम म्हणून अनेक नवबौद्ध परत हिंदू धर्माकडे वळतात. दलितांच्या काही जिव्हाळ्याच्या प्रश्नांचाही उल्लेख झाला. त्यात आरक्षण हटविण्याची मागणी अयोग्य कशी, ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्याची वाढती मागणी आणि घटनादुरुस्तीतून घटनेच्या मूळ आंबेडकरी स्वरूपाला बदलण्याचे प्रयत्न, यावर काही वक्त्यांनी मतप्रदर्शन केले. ही चर्चा करताना एक बंधन पाळले गेले. चर्चेला धरून कोणताही धर्म अथवा राजकीय पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे टाळण्यात आले. धम्मप्रसार चळवळ राजकीय हस्तक्षेपांपासून दूर राखली, तरच ती दीर्घकाळ चालेल यावर अनेकांनी भर दिला. कुठल्याही क्षेत्रात, विशेषकरून राजकीय क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांनी शील सोडून आचरण करू नये, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बौद्धलेण्यांच्या परिस्थितीसंदर्भात झालेल्या चर्चासत्रात त्यांची शासन योग्यप्रकारे निगा राखत नसल्याने अशा ठिकाणी उपासकांनी जाऊन श्रमदान करावे, ती ठिकाणे जतन होऊन त्या ठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत, यावर भर देण्यात आला. काळाराम मंदिरासकट इतर अनेक मंदिरे पूर्वी बौद्धविहार होते. त्यातील काही ठिकाणी बुद्धमूर्ती अथवा विहारांचे अस्तित्वदर्शक अवशेष बाहेर विखुरलेले दिसतात. ते योग्यपणे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यांच्या देखभाली संदर्भात पुरातत्त्वखात्याबरोबर संपर्कात राहावे लागेल, असे काही वक्त्यांनी सांगितले.
क्षणचित्रे
चर्चासत्रातील उपस्थिती दरम्यान काही गोष्टी आपसूकच नजरेत भरल्या. चर्चासत्रात सहभागी झालेल्या बहुसंख्य प्रतिनिधींनी गणवेश असावा तसा पांढरा बुशशर्ट आणि पांढरी पॅन्ट आणि महिलांचे पांढरे परिवेश होते. सहभागी होणार्यांमध्ये पन्नाशी अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेले लोक होते. तरुणांचा सहभाग नगण्य असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्व लोक मध्यम अथवा उच्च मध्यम वर्गातील होते. उण्यापुर्या सहा दशकांत घडून आलेल्या या सामाजिक बदलाची प्रेरणा डॉ. बाबासाहेबांची होती, हे तेथे सादर केल्या गेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून क्षणोक्षणी जाणवत होते.काही लोकांशी छान संवाद साधता आला. एक ‘आयआरएस’ आयुक्त भेटले. ते पाच वर्षे गुजरातमध्ये होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील दलितांमध्ये सामाजिक जागरणाचा आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा धडाक्याने प्रचार केला. ते स्वत: निरीश्वरवादी असून २२ प्रतिज्ञांचा आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या प्रचाराचे काम सातत्याने करतात. ‘डार्विन’, ‘आईन्स्टाईन’, ‘कार्लसॅगन’ यांच्या वैज्ञानिक पुस्तकांची माहिती देणारे परिपत्रक त्यांनी मला दिले. ते निरीश्वरवादावर सुमारे ८०० पृष्ठांचे पुस्तक लिहत असून मी त्यांचे आणि त्यांनी माझे अध्यात्माचे विज्ञान आणि गणित हे पुस्तक वाचून अभिप्राय देण्याचे त्याच वेळी ठरले. त्यांच्या कामाची दखल संयोजकांनी व्यासपीठावरून घेतली. तिबेटी दोलमा दीदींनी माहिती दिली की, त्या दलाई लामांच्या अनुयायी असून त्या तांत्रिक बुद्धधम्माचे पालन करणार्या आहेत. आसाम-बांगलादेश सीमेवरील चकमा समाज ७५० वर्षांपूर्वी बौद्ध झाला. त्यांनी नवबौद्धांचा स्वीकार केला नसून ते स्वत:ला वेगळे समजतात.
नवबौद्ध समाजातील जाती-उपजाती अजून मिटलेल्या नाहीत. त्याचा अनुभव पूर्वाश्रमीचे ‘ओबीसी’ असलेल्या, प्राथमिक शिक्षण आर्यसमाजाच्या शाळेत शिकल्यावर अभ्यास करून बौद्धधम्मदीक्षा घेतलेल्या गृहस्थांना आला. त्यांच्या एका मुलीशी माझे सविस्तर बोलणे झाले. ती ‘फॅशन डिझायनर’ आहे. मी दिलेली बौद्ध परिवेश तयार करण्याची आणि तो घालून बौद्ध मुलींनी ‘कॅटवॉक’ करण्याची कल्पना तिला आवडली. त्यांच्या दोन्ही सुविद्य मुलींशी लग्न करायला बौद्ध तरुण तयार नाहीत. त्यांना जातीतील नव्हे, तर उपजातीतीलच मुलगी पाहिजे. व्यासपीठावरून त्यांच्या या अडचणीची घोषणा झाल्यावर ती मला भेटली. मी तिला गमतीने म्हटले की, मला बुद्ध विवाह संस्कार पाहण्याची शक्यता किती आहे? तसा कोणी तरुण तोवर आला नव्हता. सागर भगवान कांबळे या तरुणाचे मला कौतुक वाटले. तो गेल्या तीन वर्षांपासून ठिकठिकाणच्या गुंफा आणि बौद्धलेण्यांची माहिती संकलित करून ‘बोधिसत्त्व’ टीव्ही माध्यमातून, ‘युट्यूब’वर टाकतो आहे. त्याने या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्याचा तेथे सन्मानही झाला. दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रातील इतर अनेक गोष्टींची नोंद नंतर घेण्याचा मानसआहे.
- डॉ. प्रमोद पाठक
९९७५५५९१५५