काँग्रेसची कुठली विचारसरणी?

    16-Nov-2021
Total Views | 175

congress_1  H x
 
 
काँग्रेसचे ‘राष्ट्रीय’ म्हणविले जाणारे नेते राहुल गांधी यांनी संघ-भाजप हे काँग्रेसची विचारसरणी नष्ट करत असल्याचे म्हटले असल्याचे नुकतेच वाचनात आले. तसा हा वरवरचा विचार वाटू शकतो. पण, नुकत्याच झालेल्या नेहरु जयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांचे विधान मात्र नक्कीच विचार करण्याजोगे आहे.
एका इंग्रजाने स्थापन केलेल्या काँग्रेसला भारतीयांनी आपले साधन बनवले व ब्रिटिशांच्या बरोबर राहून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली हे खरे असले, तरी महात्मा गांधींनी ‘चले जाव’ चळवळ पुकारेपर्यंत काँग्रेस ‘ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य’ अशीच भाषा करीत होते, हे विसरता येत नाही. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तेत राहिलेली काँग्रेस विचारसरणीबाबत कधी निश्चित होती, असेही म्हणता येणार नाही. म्हणूनच निवडणुकांचे राजकारण करत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची नेमकी कुठली विचारसरणी संघ-भाजप नष्ट करीत आहे, हे पाहणे क्रमप्राप्त ठरावे.
 
कॉँग्रेसच्या विचारसरणीचे धागेदोरे
 
काँग्रेसची स्थापना १८५७च्या स्वातंत्र्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने ब्रिटिश राज्याला भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ब्रिटिश शिक्षण पद्धतीने तयार झालेल्या व त्यांच्या आश्रयाने वाढत असलेल्या वर्गाच्या साहाय्याने केली, हा स्पष्ट इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये असा एक वर्ग होता, जो ब्रिटिश पद्धतीने शिकला होता व त्यांच्या विचाराच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे काँग्रेस ही महात्मा गांधी पटलावर येईपर्यंत अशाच लोकांच्या ताब्यात होती. त्यांची विचारसरणी ब्रिटिशांपासून स्वतंत्र होण्याची नव्हती, तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याची होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये काही मंडळी जसे की, लोकमान्य टिळक खऱ्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे होते, नाही असे नाही; पण कॉँग्रेसचा मूळ विचार हा ब्रिटिशांना व त्यांच्या विचारसरणीला अनुकूल असलेला असाच होता. ब्रिटिशांच्या विचारसरणीत राजनैतिक तोडफोड व आर्थिक लूट केंद्रस्थानी होती. हेच संस्कार काँग्रेसच्या पिढीवरदेखील होत आलेले आहेत व तीच काँग्रेसची मूळ विचारधारा आहे, हे समजून घ्यावे लागेल. भाजप-संघ ही सामाजिक तोडफोडीची राजनीती व आर्थिक लुटीचे अर्थशास्त्र नष्ट करणार असेल, तर त्याचे स्वागतच व्हावे.
 
कॉँग्रेसचा स्वातंत्र्यानंतरचा विचार व्यक्तिवादी
 
स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसचा विचार व्यक्तिकेंद्रित होत गेला, हे विशेष करून सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर जे मोठे नेते झाले, त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व वल्लभभाई पटेल मुख्य होते. यात महात्मा गांधी व सरदार पटेल यांचा लवकर मृत्यू झाल्याने नेहरूंची विचारसरणी हीच कॉँग्रेसची विचारसरणी झाली. तेव्हापासूनच खरंतर काँग्रेसची वैचारिक म्हणवली जाणारी शकले होत गेली व सर्वच व्यक्तीज्यांचे व्यक्तिनेतृत्वाशी जमले नाही, ते स्वतंत्र झाले व बहुतेकांनी आपला स्वतंत्र पक्ष उभा केला. यात उल्लेखनीय म्हणजे, नेहरूजींची निश्चित विचारसरणी होती, असे म्हणता येते. बाकीच्यांची मात्र फक्त निवडणूकप्रधान धोरणे होती, असे म्हणावे लागेल.
 
पंडित नेहरू व इंदिरा गांधी
 
नेहरूजींच्या विचारसरणीशी फारकत होऊन निवडणूकप्रधान धोरणाला महत्त्व येण्याचा काळ इंदिरांजींच्या काळापासूनच सुरू झाला, असे म्हणायला जागा आहे. नेहरूजींची विचारसरणी लोकशाहीचे महत्त्व जाणत होती. कारण, त्यांच्याच काळात देश स्वतंत्र झाला होता व राज्यघटना ही स्वीकारली गेली होती. पण, इंदिराजींनी तिथेच फारकत घेतली व लोकशाही नेतृत्वाला तिलांजली देत हुकूमशहाप्रमाणे वागत पक्षातील सर्वच ज्येष्ठ-श्रेष्ठांना आपली जागा दाखवली व पुढे तर देशात आणीबाणी लादली गेली. निवडणुका जिंकण्यासाठी धोरण आणण्याचा बदलही त्यांच्याच काळातील. ‘गरिबी हटाव’पासून याची सुरुवात झाली, असे म्हणता येते. सर्वसामान्यांना आवडतील, असे निर्णय घेण्याचा व धोरणाचा काळ हाच म्हणता येईल. बँकांचे राष्ट्रीयीकरण, कर्ज वाटण्याच्या प्रकारांची सुरुवात याच काळातील. ‘आयआरडीपी’सारखे कार्यक्रम याच काळातले. दीर्घकालीन वैचारिक भूमिकेपेक्षा निवडणुकीत यश मिळवून देणारी धोरणे महत्त्वाची, हाच काँग्रेसचा विचार झाला. हा विचार जर कुणी नष्ट करत असेल, ते योग्यच म्हटले पाहिजे.
 
विचारातील गोंधळ
 
काँग्रेसच्या विचारात जो गोंधळ आढळतो, त्याचे कारण महात्मा गांधी हे आहे. स्वातंत्र्यानंतरचा कॉँग्रेस जरी नेहरूजींचा व नंतर इंदिराजींचा व आता राहुलजींचा असला, तरी भारतीयांच्या दृष्टीने तो महात्मा गांधींचा काँग्रेस होता. नेहरू गांधीवादी नव्हते पण भारतीय गांधीवादी होते, हे जर लक्षात आले तर विचारातील गोंधळ समजेल. काँग्रेस नेतृत्वाची ही एक अडचण राहिली आहे की, ते गांधींना व त्यांच्या विचारसरणीला मानत नसले तरी ते तसे म्हणू शकत नाहीत आणि हेच काँग्रेसच्या वैचारिक गोंधळाला कारणीभूत आहे. काँग्रेसची विचारसरणी व धोरणे कधीही गांधीवादी नव्हती, पण गांधींचे नाव घेणे मात्र त्यांना गरजेचे होते. कारण, सामान्य भारतीय गांधीवादी होते. गांधीवादी असण्यासाठी भारतीय संस्कृती स्वीकारावी लागते. रामाला भारताचा महापुरूष मानावे लागते व रामराज्याचे स्वप्नही पाहावे लागते. तेच काँग्रेसच्या नेतृत्वाला मान्य नाही त्यामुळे काँग्रेस वैचारिकदृष्ट्या गोंधळलेली असते आणि हे उघड करण्याचे काम कुणी करत असेल तर उपयोगीच आहे.
 
लोकशाहीविरोधी व भ्रष्टाचारी काँग्रेस
 
काँग्रेस पक्षाची वैचारिकता या पक्षाने स्वीकारलेल्या धोरणावरून ओळखणे जास्त चांगले. कारण, वैचारिक भूमिका पंडित नेहरूंबरोबरच संपली असे म्हणता येते. नेहरूजींची लोकशाही विचारसरणी काँग्रेस पक्षाने कधीच सोडून दिली असल्यानेच आज तो एक कौटुंबिक पक्ष झाला आहे. जिथे एका घराण्यातील व्यक्तीशिवाय पक्षाचा अध्यक्ष दुसरा कुणी होऊ शकत नाही, त्यावरून हे लक्षात येते. अशा पक्षाची विचारसरणी नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती विचारानुसार बदलत जात असतात, हे सांगायला कुणा विचारवंताची गरज नाही. काँग्रेसने लोकशाही प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार काही कुटुंब, त्यांचे मदतनीस व साहाय्यक यांच्यापर्यंत मर्यादित ठेवला आहे. लोकशाही प्रतिनिधित्वाचे अधिकार म्हणजे सर्व लुटीचे अधिकार हे गृहित झाले. त्याचे कारण राजकीय व प्रशासनातील भ्रष्टाचार अशा विषयाबद्दल काँग्रेस कधी गंभीर नव्हती. भ्रष्टाचाराचे मोठमोठे घोटाळे या पक्षाच्या सत्तेचे वैशिष्ट्य राहिले आहे. आणीबाणी लादली तेव्हाही काँग्रेस सदस्य व पक्ष आणीबाणीच्या बरोबर होता, हे लक्षात घेतले तर मूळ विचारच कधी लोकशाही व भ्रष्टाचारविरोधी नव्हते हेच दिसून येते.
 
काँग्रेसचे राजकीय विचार निवडणुकांपर्यंत मर्यादित
 
काँग्रेस निवडणुकांना जिंकणे महत्त्वाचे मानते. लोकशाहीत ते आवश्यकही आहे. भारताचे वैशिष्ट्य हे की, येथे लोकशाही विचारधारेशी काहीही संबंध नसणाऱ्या साम्यवाद्यांनाही लोकशाही मानावी लागते व नाईलाजाने निवडणुकीत भाग घ्यावा लागतो. तीच परिस्थिती काँग्रेसची म्हणता येईल. निवडणूक सुधारणा टाळण्याबद्दलचे धोरण काँग्रेसचे विचार स्पष्ट करणारे आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जर उपयोग झाला असता, तर हिंदुत्वाचा स्वीकार व आधार काँग्रेसने आधी घेतला असता, हे समजून घेतले तर काँग्रेसची विचारसरणी समजून घेण्यास वेळ लागणार नाही. परिस्थिती व क्षेत्रांनुसार समुदायांचा उपयोग होईल, अशाच भूमिका निवडणुकीत घेतल्या जातात. भारतीय मुस्लीम समाजाचा निवडणुका जिंकण्यात उपयोग होतो म्हणून त्यांचे तुष्टीकरण होते, हे लक्षात घेतले पाहिजे. एकंदरीतच काँग्रेसची वैचारिकता निवडणुका जिंकण्याशी संबंधित असते व क्षेत्रांनुसार बहुसंख्य असलेल्या समुदायाला अनुकूल असते. त्यामुळे ‘तोडा-फोडा व मत मिळवा’ हेच मुख्य धोरण असते. त्यामुळे काँग्रेसची वैचारिकता ही निवडणुका जिंकण्यापुरती मर्यादित असते, असे म्हणता येते.
 
काँग्रेसचा विचार अनिश्चित
 
काँग्रेसचा विचार मूळ पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित असल्याने तो भारतीय विचाराशी जुळत नाही. नेहरू याबाबत स्पष्ट होते. त्यांच्यावर पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव होता व त्यांची धोरणेही त्यास अनुकूल होती. त्यामुळेच ते गांधीवादी होऊ शकले नाहीत. भारताच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक धोरण त्यामुळेच पाश्चात्त्य मॉडेलवर आधारित होती. या धोरणाचा परिणाम भारतीय आपल्या संस्कृती पासून तुटण्यात झाला व आज एकाकी झाला आहे. त्याला मूळ सोडता आले नाही व पश्चिमी होता आले नाही. काँग्रेसच्या आर्थिक धोरणाची दुर्दशा तर पहिल्या ५० वर्षांतच पाहायला मिळाली व विचारसरणीला ‘यु-टर्न’ द्यावा लागला. आज ही काँग्रेस आपली आर्थिक विचारसरणी नेमकी कुठली आहे, ते सांगू शकणार नाही.
 
काँग्रेस कार्यकर्ता संभ्रमात
 
या देशाला एक सांस्कृतिक विचार व इतिहास असल्याने त्याला नाकारण्याचे धोरण काँग्रेसलाही आखता आले नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारताच्या राज्यघटनेनेही भारतीय संस्कृतीच्या मूळ भावनेचा व इतिहासाचा सन्मानच केला आहे. नेहरूजींची इच्छा नसताना म्हणूनच सोमनाथ मंदिर उभे राहिले व आता काँग्रेसच्या नेतृत्वाची इच्छा नसतानाही राम मंदिर उभे राहत आहे. प्रत्येक वेळी भारतीय संस्कृतीची हेटाळणी करून व येथील बहुसंख्याक समाजाचा अपमान करण्याचे धोरण काँग्रेस नेतृत्व सोडत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ता काँग्रेसला सोडून जात आहे. यातून काँग्रेस नेतृत्व काही शिकले, तर काँग्रेस विचारात स्पष्टता येईल व भाजपला काही करण्याची गरज राहणार नाही.
- अनिल जवळेकर
 
अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121