युद्ध केवळ वैभवशाली इतिहासाच्या जोरावर जिंकता येत नाही, तर त्यासाठी मनगटात ताकद असावी लागते. दुबईतील ‘टी २०’ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमच्या पराभवास हीच मनगटातील ताकद कमी पडली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची अंतिम ११ खेळाडू निवडतानाची फसलेली गणिते हेच सिद्ध करतात.
खेळाडूची निवड ही त्याच्या चालू ‘फॉर्म’वर व्हावी की, त्याच्या इतिहासातील वैभवशाली कामगिरीच्या जोरावर, हा अनादीकालापासूनचा प्रश्न आहे. योग्य उत्तर सोपे असले, तरी तो घेण्याचे जो धाडस दाखवतो तोच विजेता असतो! कधी कधी हे सोपे उत्तर प्रस्थापितांना दुखावणारे असू शकते. पण, क्रिकेट हा ‘टीमगेम’ आहे. येथे एखाद्याच्या वैयक्तिक हितापेक्षा संघहित सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते आणि येथेच विराट कोहलीची पहिली गफलत झाली.
हे मान्य आहे की, या दुबईतील स्टेडियमवर रात्री पडणारे दव या मॅचमध्ये निर्णयाक ठरत होते. विशेषत: दुसर्यांदा गोलंदाजी करणार्या संघासाठी ही विषाची परीक्षा होती. संपूर्ण स्पर्धेतदुसरी फलंदाजी करणार्या संघाने दणक्यात विजय मिळवले. अगदी दोन्ही ‘सेमी फायनल’चा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आणि न्यूझीलंडने इंग्लंडचा शेवटच्या चार ‘ओव्हर’मध्ये जवळपास ५० धावांचा पाऊस पाडून विजय मिळवला. आपण पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध ‘टॉस’ हरलो, तेथेच ‘बॅकफूट’वर गेलो होतो. दोन्ही सामन्यात आपली गोलंदाजी निष्प्रभ ठरली. त्यात पडलेल्या दवाचा हात होताच. पण, हा विचार करूनच तुम्हाला संघ निवडला पाहिजे ना आणि येथेच कोहलीची खरी गफलत झाली.
सगळ्यात पहिली गफलत म्हणजे हार्दिक पांड्याचा टीममधील समावेश. ‘वर्ल्डकप’च्या आधी दुबईतच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये हार्दिकने बॉलिंग केली नव्हती. दुखापतीवर शस्त्रक्रिया करून पुनरागमन करणार्या हार्दिकला अजूनही सूर सापडलेला नाही. असे असताना केवळ बॅटिंगच्या जोरावर त्याचा अंतिम ११ खेळाडूंतील समावेश असमर्थनीय होता. केवळ ‘फलंदाजी’ हाच निकष असेल, तर त्याच्याऐवजी ईशांत किशन हा ‘फॉर्म’मधील खेळाडू होता. पण, विराट हार्दिकच्या इतिहासातील वैभवशाली खेळावर विसंबून राहिला. इशांत किशनने दुबईतील ‘आयपीएल’च्या शेवटच्या सामन्यात ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळताना ३२ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे, तर या ‘टी २०’ वर्ल्डकपच्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध इशांतने ४६ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या होत्या. याउलट हार्दिक पांड्याची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी होती, आठ चेंडूंमध्ये ११ धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध २४ चेंडूंमध्ये २३ धावा आणि गोलंदाजीमध्ये दोन ‘ओव्हर’मध्ये एकही विकेट न घेता १७ धावा.
हेच भुवनेश्वर कुमारच्या निवडीबाबत. दुखापतीतून सावरलेला भुवनेश्वरकुमार यंदाच्या वर्षात ‘आयपीएल’मध्ये फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. एकीकडे पाकिस्तानचे गोलंदाज १४० किमी प्रतितासाने ‘बॉलिंग’ करत असताना भुवनेश्वरची सरासरी १२० किमी प्रतितासाची ‘गोलंदाजी’ कितीशी प्रभावी ठरणार? खरंतर भुवनेश्वर आणि शार्दूल ठाकूर या दोन्ही गोलंदाजांची मदार ही ‘स्विंगबॉलिंग’वर! असे असताना ‘आयपीएल’मध्ये तब्बल २१ बळी घेणार्या शार्दूलऐवजी भुवनेश्वरला पहिली पसंती देण्यात आली. त्यातही पाकिस्तानविरुद्ध या महत्त्वाच्या मॅचमध्ये ‘गोलंदाजी’ची ‘ओपनिंग’ ‘फॉर्म’ नसलेल्या भुवनेश्वरच्याद्वारे करणे म्हणजे आत्मघात होता. त्यामुळे हुकमी ‘विकेटटेकर बॉलर’ बुमराला तिसरी ‘ओव्हर’ टाकावी लागली. पहिल्याच ‘ओव्हर’मध्ये दुसर्या चेंडूवर पाकिस्तानच्या रिझवानने भुवनेश्वरला ‘मिडऑन’वरून वसूल केलेला चौकार आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर ‘डीपस्केवर’वरून मैदानाबाहेर फेकून देत ठोकलेला षट्कार भारताचे उरलेसुरलेले मनोधैर्य खच्ची करणारे होते. त्यात पाकिस्तानच्या ‘तेजतर्रार बॉलर’ शाहीनशाहीद आफ्रिदीने पहिल्याच ओव्हरमध्ये १४० च्या वेगाने यॉर्करलेंग्थवर रोहित शर्माला ‘एलबीडब्ल्यू’ केले. जगातील कोणत्याही फलंदाजाला बाद करण्याची ताकद त्या चेंडूमध्ये होती. तेथून जे पाकिस्तानी ‘गोलंदाजी’चे भूत आपल्या मानगुटीवर पूर्ण ‘मॅच’ बसले ते पराभवानंतरही खाली उतरले नाही.
अगदी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरला नारळ देऊन त्याच्याऐवजी शार्दूल ठाकूरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले, पण तोवर बराच उशीर झाला होता. भारत त्या सामन्यात पराभूत मानसिकतेतूनच खेळला. येथेच भारताचा ‘टी २० ’ क्रिकेट वर्ल्डकपमधील खेळ खल्लास झाला! त्यानंतर बांगलादेश, नामिबिया आणि स्कॉटलंड या दुबळ्या संघाविरुद्ध जिंकणे म्हणजे आपल्याच मनाची आपण समजूत काढण्यासारखे होते. अर्थात, बांगलादेशने न्यूझीलंडला पराभूत केले असते, तर वेगळी गोष्ट होती. कारण, याच बांगलादेशने २००७ च्या विंडीजमधील ‘वन डे वर्ल्डकप’मध्ये भारताचा पराभव करून खळबळ माजवली होती. भारताचे त्या स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. गंमत पाहा, तेव्हा राहुल द्रविड हा टीमचा कॅप्टन होता आणि त्यानंतर धोनीकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्याच धोनीने मग ‘टी २० ’ वर्ल्डकप आपल्याला जिंकून दिला होता. १४ वर्षांनंतर हाच धोनी या ‘टी २० ’ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमचा ‘मेंटॉर’ होता. पण, निकाल मात्र २००७ चाच होता, भारताचे आव्हान संपुष्टात आणि हो जाता जाता या सामन्यानंतर विराट कोहलीनेही ‘टी २० ’ मधील कर्णधारपद सोडले आणि हो राहुल द्रविड आता टीम इंडियाचा प्रशिक्षक होतोय. इतिहासातून आपण कधी शिकणार ? खेळाडूंच्या पूर्वपुण्याईपेक्षा त्याची आताची गुणवत्ता आपण कधी तोलणार? धोनी महान कर्णधार होता, पण संघात एक कर्णधार आणि कोच असताना ‘मेंटॉर’ची भानगड हवीच कशाला होती? द्रविडला प्रशिक्षक करायचे होते, तर मग वर्ल्डकपच्या आधीच का केले नाही? प्रश्न खूपच आहेत, कधीही न सुटणारे...