हिंदुत्वाची तुलना दहशतखोर ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’शी करत सलमान खुर्शिदांनी काँग्रेसी हिंदूद्वेषाच्या परंपरेचे ते पाईक असल्याचेच पुनश्च सिद्ध केले. पण, आता हिंदूंनी ही असली अवमानजनक विधाने मुकाट्याने सहन करण्याचा जमाना कधीच गेला. त्यामुळे आपले सेक्युलॅरिझम सिद्ध करण्यासाठी सलमान मियांनी दिलेल्या या हिंदूद्वेष्ट्या बांगेला हिंदू समाज जशास तसे उत्तर देईलच!
'पद्मश्री’ नौफ मरवाई. इस्लामी राजवटीचे केंद्र असलेल्या सौदी अरबची पहिली योग प्रशिक्षक. २०१८ साली भारतातील प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित नौफने सौदी राजवटीत योगाला अधिकृत दर्जा प्राप्त होण्यासाठी भरपूर खटाटोप केला. सौदी राजघराण्याने अखेरीस योगाला राजमान्यताही दिली. परिणामी, आज सौदीमध्ये असंख्य मुस्लीम नागरिक योगसाधना करताना दिसतात. तत्पूर्वी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीला मान देत २०१५ पासून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ही जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी उत्सवासारखा आज साजरा होताना दिसतो. वरील दोन्ही उदाहरणांतून सांगायचे तात्पर्य इतकेच की, हिंदू संस्कृती आणि हिंदुत्वाचा ‘सर्वेीपि सुखिन: सन्तु’चा वारसा हा भारतभूमीपुरताच मर्यादित नसून जगानेही त्याची उचित दखल घेतली. मोदी सरकारच्या राष्ट्राभिमानी, संस्कृतीरक्षक नीतींमुळेच विश्वपटलावर हिंदू संस्कृतीचे विविध स्वरुपात अशाप्रकारे पुनरुज्जीवन झाले. ‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय’ या अटलजींच्या काव्यपंक्ती मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ध्येय-धोरणांतून प्रत्यक्षात साकारल्या. एकीकडे देशविदेशात अशाप्रकारे हिंदू नवजागरणातून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना सर्वव्यापी होत असताना, गलितगात्र झालेली काँग्रेस मात्र अद्याप हिंदूद्वेषाची बांग देण्यातच धन्यता मानताना दिसते. दहशतवादी संघटना असलेल्या ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’शी चक्क हिंदुत्वाची तुलना करण्याचा सलमान खुर्शिदांचा पुरोगामी उद्दामपणा हा या पक्षाच्या आजवरच्या हिंदूविरोेधी नीतींचाच परिपाक म्हणावा लागेल.
खुद्द खुळचट खुर्शिद असतील किंवा काँग्रेसमधील अन्य अडगळीतले दिग्विजय सिंह, चिदंबरम, सिब्बल, अन्सारी यांच्यासारख्या नेत्यांनी गांधी घराण्याची जी-हुजुरीच केली. हिंदूद्वेष हा (अव)गुण अंगाशी असणे हीच तर काँग्रेसमधील या नेत्यांची सर्वोच्च पात्रता. म्हणूनच अधूनमधून या काँग्रेसी कुबड्यांना हिंदूंवर, हिंदुत्वावर टीका करण्याची अशी उबळ येते. खोडसाळ खुर्शिदांचीही तीच कथा. खरंतर देशाचे कायदामंत्री, परराष्ट्रमंत्री, अल्पसंख्याकमंत्री यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर सत्ता उपभोगलेल्या नेत्याने याच देशातील बहुसंख्याकांच्या भावना अशी विधाने करून पायदळी तुडवणे हा समस्त हिंदू बांधवांचा अपमान. पण, खुर्शिद मियांना असे वादंग पेटविण्यात जणू पीएच.डीच प्राप्त! म्हणूनच काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या प्रचारसभेत खुर्शिद मियांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र कोट्याचीच घोषणा करुन टाकली होती. काँग्रेसच्या मुस्लीम अनुनयाचे आपण कसे आज्ञाधारी पालक आहोत, हेच सिद्ध करण्याची त्यांची ती एक केविलवाणी धडपड होती. पण, अशा एक ना अनेक हिंदूविरोधी उचापतींनी खुर्शिद यांचे ‘हात’ आधीच बरबटले आहेत. ‘सिमी’ या भारतात २००२ साली बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेवरील बंदी उठवावी म्हणून २००६ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या चढून तोंडघशी पडलेले हेच ते ख्यातमान खुर्शिद! अशा या ‘ल्युटन्स दिल्ली’त शेकी मिरवणाऱ्या खुर्शिदांवर त्यांच्याच ‘झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्ट’मधील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणही चांगलेच शेकले होते. ‘ऑपरेशन धृतराष्ट्र’ या नावाखाली एका हिंदी वृत्तवाहिनीने खुर्शिदांच्या दुष्कृत्यांचा तेव्हा पर्दाफाश केला होता. पण, खुर्शिदांची मती खुंटली ती खुंटलेलीच! म्हणूनच ‘सन्स ऑफ बाबर’ हे नाटक अभिनेता टॉम अल्टरला सोबत घेऊन रंगभूमीवर सादर करण्याची वेळ या ‘कायदेपंडित’ मियांवर ओढवली. आताही आपल्या ‘सनराईझ ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना चक्क इस्लामिक दहशतवादी संघटनांशी करून खुर्शिदांनी प्रसिद्धीझोतात येऊन आपल्या पुस्तकविक्रीचा मार्गच जणू प्रशस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, त्यांच्या या पुस्तकावर अनेक भाजपशासित राज्यांनी बंदी घालणार असल्याचे जाहीर करुन खुर्शिदांना त्यांची जागाच दाखवून दिली आहे.
मुळात हिंदू धर्म, हिंदुत्व या दोन भिन्न संकल्पना असून त्यांचा परस्परांशी संबंध नसल्याचा बुद्धिभ्रम अशा शब्दच्छलाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षं काँग्रेसने तर अगदी नित्यनेमाने केला. शशी थरुरांसारख्या मंडळींनी तर हिंदुत्वावरील पुस्तकांची मालिकाच सुरू केली. काँग्रेसच्या अन्य नेत्यांमध्ये तर जणू हिंदूंच्या भावना दुखावण्याची एकच चढाओढ रंगली होती. म्हणूनच काश्मिरी पंडितांच्या पलायनासारख्या भीषण प्रसंगीही त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष कधीच नव्हता. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी षड्यंत्राखाली अडकवून नऊ वर्षं काँग्रेसमुळेच तुरुंगात खितपत काढावी लागली. भगवा दहशतवाद, संघाला दहशतवादी संघटनेचे लेबल चिकटवून दिग्विजय सिंहांसारख्या नेत्यांनी तर पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळला. ओसामापुढे ‘जी’ लावून दहशतवादाच्या उदात्तीकरणाचा देशद्रोही प्रकारही याच काँग्रेसने केला. दहशतवादी अफझल गुरु, इशरत जहाँ यांच्यासाठी आसवे गाळणारी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी पोटतिडकीने बोलणारी ही मंडळी मात्र हिंदूंवरील अत्याचारावर कायमच मूग गिळून बसली. आजही जेव्हा जेव्हा विषय पाकिस्तान असो वा बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराचा येतो, तेव्हा या मंडळींच्या तोंडून एक चकार शब्दही फुटत नाही. परंतु, निवडणुका आल्या की, हिंदू मते पारड्यात पाडण्यासाठी गांधी कुटुंबीयांना ते ‘जनुवेधारी’ असल्याचा मात्र एकाएकी साक्षात्कार काय होतो आणि ते मंदिरांमध्ये देवपूजा करत सैरावैरा गळ्यात पुष्पमाळा घालून पळत सुटतात. पण, सत्य हेच की काँग्रेसला हिंदू, हिंदुत्व, हिंदूंच्या भावनिक नव्हे, तर विकासारख्या ऐहिक गोष्टींशी काहीही देणेघेणे कधीच नव्हते. त्यातच ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या पथावर भारतीय जनता पक्षाने दमदार वाटचाल केल्याने राजकारणाचा खेळ काँग्रेसच्या हातून कधीच निसटला आहे. कारसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेले आंदोलन असेल, हिंदूंनी राम मंदिरासाठी लोकशाही मार्गाने, न्यायव्यवस्थेकडे केलेला पाठपुरावा असेल, काँग्रेसच्या शासनकाळात मात्र हिंदू अभिव्यक्तीला कस्पटासमान लेखले गेले. पण, लोकशाहीत अपेक्षित असलेला राजकीय न्याय मात्र हिंदूंना मिळाला नाही. परंतु, २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदूंच्या राजकीय अभिव्यक्तीचे जे प्रकटीकरण झाले, त्याचा नैसर्गिक आविष्कार म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आरुढ झाले आणि देशाच्या राजकीय समीकरणांनी कूस बदलली. मुसलमानांचे लांगुलचालन करण्यातच धन्यता मानणारे आपण कसे आणि किती हिंदू आहोत, याची केविलवाणी धडपड करताना दिसले. पण, आता या मंडळींनी ओढूनताणून हिंदूहिताचे कितीही मुखवटे चेहऱ्यावर चढवले, तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, हेही तितकेच खरे! त्यामुळे काँग्रेसचा हा सगळा डाव आता कितीही कुचकामी झाला असला, तरी तपशीलात समजून घेतलाच पाहिजे.
आपण हिंदू धर्माविषयी काहीही बोललो, हिंदूंशी कसेही वागलो तरी हिंदू सहिष्णू असल्याने आपले शंभर गुन्हे माफ होतील, हा जमाना आता हद्दपार झाला आहे. हिंदू त्यांच्या धार्मिक, सामाजिक भावना, अभिव्यक्तींबद्दल कमालीचा जागृत झाला असून दिवाळीपूर्वी उभ्या राहिलेल्या ‘नो बिंदी नो बिझनेस’ या ऑनलाईन चळवळीने हिंदूंची संघटनशक्ती काय करू शकते, त्याची प्रचिती आली. तत्पूर्वीही ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचा बुरखा जागतिक पातळीवर हिंदूंनीच टराटरा फाडला. अमेरिकेसारख्या देशातील राज्यांमध्ये ‘हिंदू हेरिटेज मंथ’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. या सगळ्या घटना जागतिक हिंदू नवजागरणाच्याच द्योतक आहेत. त्यामुळे सलमान खुर्शिद, जावेद अख्तर आणि त्यांच्यासारख्या नतद्रष्ट मंडळींनी हिंदुत्वावर कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला, तर तो तेजस्वी सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार ठरेल, हे लक्षात घ्यावे!