मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी हा संघ असून कर्णधारपदाह्ची धुरा ही मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली आहे. तर, रोहित शर्माला २ कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असून विराट कोहली हा दुसऱ्या कसोटीपासून संघात येणार आहे. चेतेश्वर पुजाराची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडचा संघ हा भारत दौऱ्यावर आहे. यादरम्यान ३ टी २० आणि २ कसोटी सामने होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरपासून जयपूरमध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कोहलीने आपली रजा वाढवली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या अनुपस्थितीत रिद्धिमान साहा यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल तर केएस भरत हा या मालिकेतील दुसरा यष्टिरक्षक असेल. ३ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या कसोटीपासून विराट कोहली पुन्हा संघाचे नेतृत्त्व सांभाळणार आहे.
असा आहे भारतीय कसोटी संघ
अजिंक्य रहाणे (कर्मधर), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा , उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
राहुल द्रविडची नवी सहाय्यक सेना
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून राहुल द्रविड हा त्याच्या नव्या सहाय्यक सहकाऱ्यांसोबत उतरणार आहे. पारस महांबरे हे भरत अरुणच्या जागी नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. विक्रम राठोर यांनी या पदासाठी अर्ज केल्यामुळे फलंदाजी प्रशिक्षकपद कायम ठेवले आहे. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडले गेले आहेत.