मुंबई : भारतीय संघ आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेतून अव्वल १२मध्येच बाद झाला. तर दुसरीकडे रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपताच भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आणि विराटने टी - २० संघाचे कर्णधारपद सोडले. अशामध्ये आता आगामी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, रोहित शर्माकडे भातीय टी २० संघाचे कर्णधारपद आणि के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. अशामध्ये आता चाहत्यांकडून सोशल मिडियावर संघ व्यवस्थापनावर टीका करण्यात येत आहे.
असा असेल संघ...
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
सोशल मिडीयावर चालवला #JusticeForSanjuSamson
भारतीय संघाची निवड होताच सोशल मिडीयावर संजू सॅमसनसोबत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संजूने आयपीएल २०२१मध्ये १४ सामन्यात १३९च्या स्ट्राईक रेटने ४८४ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक तर २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज आहे. "चांगली कामगिरी असतानाही त्याचा संघात समावेश का नाही केला गेला?" असे काही चाहत्यांनी विचारले आहे. तर, यावरून आता सध्या #JusticeForSanjuSamson असा हॅशटॅग चालवला जात आहे. एवढेच नव्हे तर संघ व्यवस्थापन भेदभाव करते, असेदेखील आरोप चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
१६०० धावा करणाऱ्या खेळाडूकडे निवड समितीचे दुर्लक्ष : हरभजन सिंग
न्यूझीलंड विरुद्धच्या ३ टी२० सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंडिया 'ए' संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, या दोन्ही संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने अधिक धावा करणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हरभजनसिंगने आपली खंत व्यक्त केली.
"२०१८-१९च्या रणजी हंगामात ८५४ आणि २०१९-२० च्या हंगामात ८०९ धावा काढून त्याने संघाला ' चॅम्पियन' बनवलं. तो या हंगामातही फॉर्मात आहे. तरीही इंडिया 'ए' च्या संघामध्येही त्याची निवड झाली नाही. जॅक्सनने अजून काय केले पाहिजे हे निवड समिती त्याला सांगेल का?" असे म्हणत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगने निवड समितीवर टीका केली.