अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि भविष्यातील रणनिती याविषयी चर्चा करण्यासाठी ‘दिल्ली डायलॉग’ परिषद बुधवारी पार पडली. बैठकीत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ न देणे आणि तेथे स्थैर्य येण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यावर एकमत झाले. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.
अफगाणिस्तानविषयी तिसरा प्रादेशिक सुरक्षा संवाद ‘दिल्ली डायलॉग’ पार पडला. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे संचालन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले. परिषदेस ईराण, कझाखस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार / राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव सहभागी झाले होते.
बैठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थिती, प्रामुख्याने सुरक्षेच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे प्रादेशिक आणि जागतिक पडसाद यावरही चर्चा झाली. अफगाणिस्तानमधील सध्याची राजकीय परिस्थिती, दहशतवादाचा धोका, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थ तस्करीसह अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यावर एकमत झाले.
अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्यावर भर देण्यात आला. त्याचवेळी शांत, सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानसाठी पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले. अफगाणिस्तानचा भूभाग कोणत्याही दहशतवादी कृत्यांसाठी आश्रय, प्रशिक्षण, नियोजन किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी वापरला जाऊ नये तसेच प्रदेशातील कट्टरतावाद, दहशतवाद यांच्या विरोधात सामूहिक सहकार्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारची स्थापना, महिला, लहान मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण यासाठी जागतिक सहकार्यावरदेखील बैठकीत एकमत झाले.