नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीपासून श्रीरामचरणांपर्यंत ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प प्रस्तावित केला असून ‘गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान’अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यामुळे देशाची राजधानी ते अयोध्या हे अंतर अवघ्या तीन तासांमध्ये पार करता येणार आहे.
देशभरामध्ये दळणवळणाच्या वेगवान सुविधा निर्माण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात संपूर्ण जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होणार्या अयोध्येतील श्रीराम मंदिरापर्यंत कमीत कमीत वेळात पोहोचता यावे, यासाठी दिल्ली ते अयोध्येपर्यंत ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प राबविला जाणार आहे. सध्या अयोध्या ते दिल्ली दरम्यान ६७० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दहा ते १२ तास लागतात. परंतु, सरकारच्या नवीन योजनेमुळे रामनगरी आता थेट राजधानीसोबत जोडली जाईल.
प्राप्त माहितीनुसार, ८६५ किलोमीटरच्या या ‘हाय स्पीड’ रेल्वे नेटवर्कने अनेक शहरे जोडली जातील. यात लखनौ, अयोध्या, मथुरा, इटावा, कन्नोज, प्रयोगराज सह १२ स्थानके असतील. अयोध्येला लखनौसोबत जोडण्यासाठी १३० किलोमीटर लांब रेल्वेट्रॅक टाकण्यात येणार आहे. यामुळे दिल्ली-लखनौ दरम्यानचा प्रवास केवळ १ तास ३८ मिनिटांवर येईल. ‘बुलेट ट्रेन’च्या ‘नेटवर्क’सोबत अनेक धार्मिक शहरे जोडली जातील. योजनेच्या प्रस्तावित रेल्वेमार्गावर बांधकाम क्षेत्राचा मोठा विकास साध्य होणार आहे. ताशी ३५० किलोमीटर वेगाने चालणार्या या ट्रेनची प्रवासी क्षमता जवळपास ७५० एवढी राहणार आहे. यामुळे अयोध्येच्या विकासालाही मोठी गती येणार आहे.