पालघर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. डहाणूच्या वणई मतदारसंघात शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित राजेंद्र गावित यांचा मोठा पराभव मानला जात आहे. शिवसेनेसाठी ही जागा प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, सत्तेत असूनही शिवसेनेला ही जागा राखता आलेली नाही. मतदारांनी मतपेट्यांतून शिवसेनेला आस्मान दाखवलं आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर किमान ओबीसी उमेदवार द्यावा, असे आवाहन सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेने ओबीसी उमेदवाराला डावलून खासदार गावित यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. एकनाथ शिंदे आणि खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. मात्र, भाजपनेही या वेळी ताकद लावत जोरदार प्रचार केला. भाजपच्या प्रचारामुळे खासदारांचे पुत्र थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. वणई १८ येथून काँग्रेसच्या वर्षा धनंजय वायडा विजयी झाल्या. भाजपा उमेदवार पंकज दिनेश कोरे दुसऱ्या स्थानी आहेत.
कुणाला किती मतं ?
वर्षा धनंजय वायडा (काँग्रेस)3242
पंकज दिनेश कोरे (भाजप)3654
रोहित राजेंद्र गावित (शिवसेना) 2356
विराज रामचंद्र गडग (राष्ट्रवादी) 2251
सारस शशिकांत जाधव(बविआ) 983
प्रितेश परशुराम निकोले (अपक्ष) 437
हितेश शंकर पाटील (मनसे) 223
नोटा - 383
मताधिक्य - 412